Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; जिल्‍हा पंचायत निवडणुकीतही फॉरवर्ड?

Khari Kujbuj Political Satire: एका बाजूला प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभला गोव्यातील मंत्रिगण काही दिवसांपूर्वी जाणार होते, पण तो दौरा पुढे ढकलला.

गोमन्तक डिजिटल टीम

जिल्‍हा पंचायत निवडणुकीतही फॉरवर्ड?

गोव्‍यात जिल्‍हा पंचायतीच्‍या निवडणूका लवकरच होणार असून त्‍यासाठी कित्‍येक राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्‍यात भाजप आघाडीवर आहेच. मात्र या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत यावेळी गोवा फॉरवर्ड पार्टीही आपले उमेदवार उतरविण्‍याची तयारी करत आहे. ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे उपाध्‍यक्ष मोहनदास लोलयेकर यांनीच याबद्दल सूतोवाच केले. यापूर्वी मागच्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपले उमेदवार उतरविले होते आणि आपला पहिला राजकीय अकाऊंट त्‍यांनी या निवडणुकीतून उघडला होता. आता गाेवा फॉरवर्डही तीच वाट चोखाळू पहात आहे, असे वाटते. जिल्‍हा पंचायतीच्‍या मार्गातून गोवा फॉरवर्ड येत्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी करू पहात आहे हे त्‍यातून स्‍पष्‍ट होते. ∙∙∙

मॅडमचा वाढदिवस प्रयागराजला?

आपला वाढदिवस कोणी कसा साजरा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न व अधिकार. मात्र राजकारणात व सामाजिक कार्यात वावरणाऱ्या लोकांचा वाढदिवस वेगळ्या थाटात साजरा होतो किंवा केला जातो. तेव्हा लोक बोलणारच व चर्चा तर होणारच. एका माजी मंत्र्याने आपल्या पत्नीचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेत साजरा केला होता. त्या मंत्र्याने म्हणे खास विमानाने आपल्या मित्रमंडळींना दक्षिण आफ्रिकेत नेले होते.आज आपल्या राज्याच्या मॅडमचा वाढदिवस. आपल्या राज्याचे मंत्रिमंडळ आजच खास विमानाने कुंभमेळ्याला पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहे, म्हणजे मॅडमचा वाढदिवस कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पोहोचल्यावर होणार तर. मॅडमने आधीचा वाढदिवस म्हणे अयोध्येला साजरा केला होता. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा उडपी दौरा

एका बाजूला प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभला गोव्यातील मंत्रिगण काही दिवसांपूर्वी जाणार होते, पण तो दौरा पुढे ढकलला आणि आता तो दौरा सत्यात उतरणार असल्याने अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वेळ मिळालाच तर कोणत्या ना कोणत्या देवतांचे दर्शन घेऊन येतातच. गुरुवारी त्यांनी उडपी गाठली. त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. गुरुवारी सकाळी बयंदूर रेल्वे स्थानकावर पोहोचले, त्यानंतर ते कोल्लूरच्या मुकांबिका मंदिरात गेले, जिथे त्यांनी विशेष प्रार्थनेत भाग घेतला. त्यांच्या स्वागताला आमदार गुरुराज गंटीहोळे तयार होतेच, या दौऱ्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने छायाचित्रासह प्रसिद्ध केलेही. गोव्यात सध्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे, भाजपच्याच गोटात ही चर्चा असल्याने त्याला एक महत्त्व आहे. काही मंत्री आवर्जून देवदेवतांचे दर्शन करण्यामागे त्यांचा स्वार्थही असू शकतो. मुख्यमंत्री सावंत यांच्या देव-देवतांच्या दर्शनामुळे राजकीय विरोधकांनाही त्यातून काही ना, काही तरी संदेश मिळत असणार हे स्पष्ट आहे. ∙∙∙

पदके दहा, डुबक्या मात्र पन्नास

क्रीडा क्षेत्रात पदकांची कमाई करून राज्याला नावलौकीक मिळवून दिला जावा, या उद्देशाने खेळाडू आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी पदकांच्या कमाईसाठी काय करतात, यावर चर्चांना उधाण आले आहे. कारण केवळ पदकांच्या कमाईऐवजी हे पदाधिकारी पुण्याच्या कमाईवर भर देत असतील तर चर्चा होणारच ना. उत्तराखंड येथे झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याला १० पदके मिळाली. उत्तरखंडमध्ये यानिमित्ताने गेलेले अधिकारी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कमी पदके मिळाल्याचे काही सोयरसुतक नसावे असे चित्र दिसून आले. त्यांनी सध्या सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात डुबकी मारण्याला प्राधान्य दिले होते. अयोध्या, हरिद्वार येथे धार्मिक पर्यटनाची हौसही त्यांनी भागवून घेतली. खेळाडू निराश होऊन परतीच्या वाटेला लागले तरी अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे धार्मिक पर्यटन मात्र जोरात सुरु होते. ∙∙∙

...मग ५० रुपये कसले घेता?

किनारी भागात लूट चालते, अशा चर्चांमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्यचेही सांगितले जाते. त्यातच कांदोळीत दुचाकी पार्किंगसाठी तब्बल ५० रुपये आकारले जात आहेत, अशी पोस्ट एका पर्यटकाने पावतीसह सोशल मीडियात टाकल्याने पर्यटकांची लूट चालल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. कांदोळी पंचायतीच्या पावतीवर वाहन मालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाहने पार्क करावीत,असे नमूद केले आहे. त्यावर संतप्त नेटकऱ्यांनी मग ५० रुपये कसले घेता, असा सवाल केलाय. ∙∙∙

पंख छाटलेले ‘साबांखा’ खाते

जल पुरवठा खात्याची राज्य सरकार निर्मिती करणार आहे. पाणी पुरवठा विभाग सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. आता या खात्याकडून पाणी पुरवठा करण्याचा हक्क काढून घेतला जाणार आहे. जल पुरवठा खाते निर्माण झाल्यानंतर आणखी एका मंत्र्याची सोय होणार आहे. जल पुरवठा विभाग हा एक महत्त्वाचा आणि दरवर्षी वाढीव आर्थिक तरतूद करावा लागणारा आहे. त्यामुळे या खात्याकडेही अनेक मंत्र्यांची नजर असणार आहे, हे सांगायला काही भविष्यवेत्त्याची गरज नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे खऱ्या अर्थाने पंख कापले ते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांनी गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाची (जीएसआयडीसी) स्थापना केली आणि ‘साबांखा’तील अनेक कामांचे अधिकार ‘जीएसआयडीसी’कडे गेले. जल पुरवठ्याचा हक्कही ‘साबांखा’कडून काढल्यानंतर केवळ रस्ते आणि गटार, मलनिस्सारणाच्या कामांची व सरकारी इमारतींच्या देखभालीची कामे ‘साबांखा’ला पहावी लागणार आहेत. ∙∙∙

‘सोनसोडो’चा वेगळेपणा, पण...

सध्या बायंगिणी येथे होऊ घातलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. तसे पाहिले तर पर्रीकरांच्या काळात या प्रकल्पाचा विचार सुरू झाला पण लोकांच्या, लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे त्याचे घोडे अडले. आता घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सदर प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. आवश्यक ते सर्व परवानेही त्याला मिळालेले आहेत. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी त्याला प्रथम मोडता घातला व आता तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही तोच सूर आळवल्याने या प्रकल्पाचे काही खरे नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.पण मडगावकरांची तक्रार मात्र वेगळीच आहे. तेथे सोनसोडोवर जागा आहे शिवाय तेथे प्रकल्पाला कोणाचा विरोध पण नाही, असे असतानाही सरकार म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती तेथील प्रकल्पाबाबत पावले का उचलत नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मडगाव पालिकेशी संबंधित तिन्ही आमदारही या प्रश्नी मौन बाळगून आहेत हे मात्र खरे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT