पणजी: येत्या २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील युतीवरून काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या तीन पक्षांमध्ये अजूनही ‘तू–तू, मै–मै’ सुरूच आहे. युतीसंदर्भात या तिन्ही पक्षांत शनिवारी बैठक होणार होती. परंतु, आरजीचे अध्यक्ष मनोज परब दारोदारी प्रचारात व्यस्त असल्याने ही बैठक झाली नाही. ती रविवारी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, युतीतील गोवा फॉरवर्ड, आरजीसह स्वतंत्र चूल मांडलेल्या आम आदमी पक्षाने (आप) उमेदवारांचा प्रचारही सुरू केलेला असताना, काँग्रेसमध्ये मात्र सामसूमच आहे.
एकाबाजूला काँग्रेस नेते युतीच्या चर्चेची वाट पाहत असतानाच, युतीतील प्रमुख पक्षांचे नेते विजय सरदेसाई आणि मनोज परब यांनी अगोदरच जाहीर केलेल्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. गोवा फॉरवर्डने पैंगीण, राय, धारगळ, कुंभारजुवे, कारापूर–सर्वण तसेच मयेतील उमेदवार निश्चित केले असून, सरदेसाईंनी कुंभारजुवे आणि जुने गोवेत सभाही घेतल्या आहेत.
‘आप’ ने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करून त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे. अशा स्थितीत मात्र काँग्रेसच्या गोटात अजूनही सामसूमच असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसच्या गट समित्यांनी आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षापर्यंत पोहोचवली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराचा पराभव केला. त्याचाच अंदाज बांधत येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज असल्याचे ओळखून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गेल्या काही महिन्यांपासून युतीची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरुवात केली होती. ‘आप’ने सुरुवातीला युतीत जाण्याचे संकेत दिले होते.
परंतु, काही दिवसांनंतर ‘आप’ने भूमिका बदलत आगामी सर्व निवडणुका वैयक्तिकरित्या लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजीपी’ची युती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळालेले असून, काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही युतीस मान्यता दिलेली आहे. युतीबाबतची चर्चा सफल होईपर्यंत उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेत, काँग्रेसने विजय सरदेसाई आणि मनोज परब यांना शनिवारी चर्चेसाठी बोलावले होते. परंतु, मनोज परब शनिवारीही प्रचारात व्यस्त राहिले. त्यामुळे शनिवारची बैठक रविवारवर ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आणि त्यानंतर इतर नऊ आमदारांसोबत भाजपात गेलेल्या माजी उपसभापती तथा काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना विजय सरदेसाईंनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश दिल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ बनले आहेत. अशा स्थितीत आरजीपीनेही पक्षांतर केलेल्या नेत्यांना युतीतील पक्षांनी प्रवेश देणे चुकीचे असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इजिदोर फर्नांडिस यांच्या विषयावरून काँग्रेस आणि आरजीपी गोवा फॉरवर्डची साथ सोडणार की त्यातून मार्ग निघणार? हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
गोवा फॉरवर्डने कायमच पक्षांतराला विरोध दर्शवला आहे. आपला पक्ष पक्षांतर केलेल्यांना व्यासपीठ देत नाही. परंतु, आम्ही पैंगीणची उमेदवारी पक्षाचे संस्थापक सदस्य तथा सरचिटणीस प्रशांत नाईक यांना दिलेली असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत तेथे विजयी करायचे आहे. गत विधानसभा निवडणुकीत इजिदोर यांना काणकोणमध्ये सहा हजार मते मिळाली होती. ती मते नाईक यांना मिळावी यासाठी इजिदोर यांना गोवा फॉरवर्डमध्ये घेण्याची मागणी काणकोण गटाने केली होती. त्याची दखल घेऊनच आम्ही त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे, असे सरदेसाई म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील युतीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यासंदर्भात विजय सरदेसाईंशी बोलणे झाले. बैठकीनंतरच कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे स्पष्ट होईल.अमित पाटकर, काँग्रेस
युतीबाबतच्या बैठकीसंदर्भात अमित पाटकर यांनी मला फोन केलेला होता. परंतु, मी उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहे. ही बैठक रविवारी होऊ शकते. इजिदोर फर्नांडिस यांच्याबाबतची भूमिका आपण अगोदरच स्पष्ट केलेली आहे.विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.