Goa Politics: खरी कुजबुज; युरीच्या स्वप्नातील ‘गोवा’ अस्तित्वात येणार ?

Khari Kujbuj Political Satire: वास्को येथे सागर नायक यांच्या घरावर दरोडा पडला. त्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. सागर हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

युरीच्या स्वप्नातील ‘गोवा’ अस्तित्वात येणार ?

‘अकेला चना भाड नहीं फोड सकता है’ असे हिंदीत एक बोध वाक्य आहे. देशात एक काळ होता काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधक एकत्र यायचे. आता देशातील स्थिती बदलली आहे. आता भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्ष वा काँग्रेसचे प्रदेश आणि वरिष्ठ पातळीवरील नेते इतर राजकीय पक्षांशी युती करण्याची भाषा करायला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन ‘ग्रॅण्ड ऑपोजीशन अलायन्स’ म्हणजे गोवा(GOA) स्थापन करू पाहत आहेत. मात्र, ज्या प्रमाणे ‘आरजीपी अर्थात रिव्होल्युनरी गोवन्स’ पक्षाने व काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोधी पक्षनेेते युरी आलेमाव यांच्या स्वप्नातील ‘गोवा’ वर ज्या फुल्या मारल्या आहेत, त्या पाहिल्यावर गोवा म्हणजे ‘ग्रॅण्ड ऑपोजीशन अलायन्स’ अर्थात ‘गोवा’ स्थापन होण्यापूर्वीच मृत्यू घंटा मोजावी लागण्याची भीती दिसत आहे. ∙∙∙

पोलिसांसमोर आव्हान

वास्को येथे सागर नायक यांच्या घरावर दरोडा पडला. त्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. सागर हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. आता त्यांना इस्पितळातून घरी पाठवण्यात आले तरी ते घाबरून घरी जाण्यास तयार नाहीत. ते सध्या भावाच्या घरी राहतात. त्यांची भीती घालवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. एकीकडे दरोडेखोरांचा शोध आणि दुसरीकडे नायक यांचे पूनर्वसन असे दुहेरी संकट पोलिसांसमोर आहे. ∙∙∙

उसगावात जिलेटीनचे स्फोट

उसगाव सध्या जिलेटीनच्या स्फोटांनी हादरत आहे. रस्ता तसेच इतर घरकामासाठी दगडांची मोठी गरज भासत असल्याने पारवाडा - उसगावात बेकायदा दगड फोडण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामासाठी डोंगर सपाटीकरण करून उभा डोंगरच पोखरून काढण्याचे काम सुरू आहे. आता या प्रकाराला संबंधित सरकारी खात्यांची मान्यता आहे का, हाही मोठा प्रश्‍न आहे, पण ‘आरजी’वाले अशा बेकायदा कामांबद्दल आवाज उठवत असल्याने असे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. ∙∙∙

उत्पल यांच्यापर्यंत निरोप

पणजी महापालिका निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी ३० उमेदवार उतरवणार हे जाहीर केल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. त्यांनी असे पाऊल उचलू नये यासाठी सत्ताधारी वर्तुळातून संपर्क साधण्यात आला होता. तो निरोप कोणी नेला, याविषयी पणजीत जोरात चर्चा सुरू आहे. उत्पल कोणाच्या संपर्कात आहेत, याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या उत्पल कोणाकोणाला भेटतात, यावरही नजर ठेवण्यात येत आहे. त्यांचे किती उमेदवार जिंकू शकतील, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. विशेषतः उत्पल यांनी उपस्थित केलेल्या विषयावर प्रश्न विचारल्यावर बाबूश मोन्सेरात का चिडतात, याचीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. ∙∙∙

फोंड्यात रितेश की दळवी?

रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघात पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये पोट निवडणूक होणार असली तरी आतापासूनच भाजपची उमेदवारी कोणाला यावर फोंडा शहरात चर्चा सुरू झाली आहे. रवी पुत्र रितेश का दक्षिण गोव्याचे भाजप सचिव तथा फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांना उमेदवारीची संधी मिळणार, यावर तर्क वितर्क करण्यात येत आहेत. मागे रवींच्या निधनावेळी भंडारी समाजाच्या गोवा पातळीवरच्या काही नेत्यांनी रितेशना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असली तरी फोंड्यातील भंडारी समाजाचे स्थानिक नेते मात्र दळवींबरोबर फिरताना दिसत आहेत, त्यांच्या बाजूने कल दाखविताना दिसत आहेत. यामुळे त्यामुळे ‘चक्रे’ कोणाच्या बाजूने फिरतील, हे सांगणे कठीण असले तरी दळवी सध्या भलतेच खूष दिसताहेत, एवढे मात्र नक्की! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

कॅसिनोतून वरकमाईची शक्कल

कॅसिनोंमध्ये दिवसभरात मोठी उलाढाल होते. अशी उलाढाल होणाऱ्या कंपनीला लाखो रुपयांचा चुना पद्धतीशीरपणे लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पणजी पोलिसांतच तशी तक्रार नोंद झाली आहे. वेतन देण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना तब्बल २५ लाख रुपये जादा वेतन अदा केले आणि नंतर त्यांच्याकडून जादाचे पैसे परत घेतले. कंपनीने केलेल्या अंतर्गत लेखा परीक्षणात ही बाब लक्षात आली, ती पोलिसांपर्यंत पोचली. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

पेडण्यातील अलिखित आघाडी

पेडण्याचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांना जिल्हा पंचायत निवडणुकीतच राजकारण म्हणजे काय ते दाखवून देण्यासाठी काही जण एकत्र येऊ लागले आहेत. अलिखित अशी आघाडी पेडण्यात आकाराला येऊ लागली आहे. याला अनेक घटक खतपाणी घालत आहेत. वरकरणी वेगवेगळ्या गटांत दिसणारी माणसे एका ध्येयासाठी एकत्र येत असल्याचे दिसते. २०२७ च्या निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून जिल्हा पंचायत निवडणुकीकडे पाहिले जावे, असे त्यांना वाटते. त्यासाठी साऱ्या हालचाली कोणाच्या नजरेस न येता सुरू आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com