Ponda: सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा जपताना धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगताना झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपल्याचे गौरवोद्गार फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.
फोंड्यातील झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, नगरसेवक शांताराम कोलवेकर, आनंद नाईक, चंद्रकला नाईक, अमिना नाईक तसेच मंडळाचे पदाधिकारी शेखर नाईक, रामदास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
रवी नाईक म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सर्व जातीधर्माला आणि समाजातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवातून एकजूट दाखवण्याची आज खरी गरज आहे. देशाला पुढे नेताना धार्मिक सलोखा अबाधित ठेवून देशाच्या विकासप्रक्रियेत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात भरीव कार्य केलेले आडपई येथील सागर नाईक मुळे तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले कार्य केलेले अमेय कवळेकर यांचा रवी नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील झरेश्वर ते तिस्क-फोंड्यातून ढवळी बगलमार्गापर्यंत नवीन रस्ता सुरू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी केले. ओहोळाच्या बाजूने हा रस्ता जाणार असून त्यामुळे फोंडा शहरातील वाहतूक कोंडीला विराम मिळेल. वाढत्या वाहनांच्या गर्दीत फोंड्यातील रस्ते अपुरे पडत असल्याने हा रस्ता बांधण्यासाठी संबंधित जमीनमालकांनी सहकार्य केलेले आहे.
रवी नाईक, कृषिमंत्री
समाजात चांगले कार्य करणाऱ्याचे नेहमीच कौतुक व्हायला हवे. अशा प्रकारामुळे इतरांनाही चांगली स्फूर्ती मिळते आणि सामाजिक बांधिलकीही जोपासली जाते. झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोविड महामारी तसेच इतर संकटांच्या काळात चांगले कार्य केलेले आहे. सांस्कृतिक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.