Mopa Airport : डिसेंबरअखेर उत्तर गोवा पेडणेमधील मोपा विमानतळ सुरू होणार अशी शक्यता आहे. मात्र, यामुळे दक्षिण गोव्यातील व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. ‘मोपा’ सुरू होऊन दाबोळी विमानतळ नागरी उड्डाणासाठी बंद झाल्यास दक्षिण गोव्यात पर्यटन व्यवसायात सक्रीय असलेल्या किमान 40 हजार लोकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
सध्या दाबोळी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांवर वास्को परिसरातील टॅक्सीवाले व हॉटेल्स उद्योजक असे जवळपास अडीच हजार व्यावासायिक थेट अवलंबून आहेत. संपूर्ण दक्षिण गोव्यातील व्यावसायिक आणि अन्य कर्मचारी लक्षात घेतल्यास हा आकडा 40 हजारांच्या घरात जाऊ शकतो. मोपा विमानतळ सुरू होऊन लगेच दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी नंतर दाबोळी चालू राहणार नाही असेच एकंदर परिस्थिती पाहिल्यास वाटते आणि तसे झाल्यास वास्कोच्या व्यावसायिकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित, असे मत प्रख्यात ट्रॅव्हल एजंट संजय शेट्ये यांनी व्यक्त केले.
सध्या गोव्यात येणाऱ्या विमानांसाठी ‘GOI’ असे तिकिटावर लिहिले जात असले तरी नोव्हेंबरनंतर नोंदणी होणाऱ्या तिकिटांवर ‘GOI’ आणि ‘GOX’ असा पर्याय खुला असेल. ‘GOI’ असे तिकीट देणारे विमान दाबोळीवर उतरणार असून ‘GOX’ तिकीट देणारे विमान मोपावर उतरणार आहे. या संदर्भात दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव म्हणाले, की अजून अशी दोन वेगवेगळी तिकिटे गोव्यासाठी सुरू केलेली नाहीत असे सांगितले. तर वास्को येथील प्रख्यात ट्रॅव्हल एजंट संजय शेट्ये यांनी नोव्हेंबरनंतरच्या बुकिंगसाठी असे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले.
सरकारने आश्वासन पाळावे
‘मोपा’ सुरू होऊन ‘दाबोळी’ बंद होणार, ही भीती वास्कोतील टॅक्सी चालकांना आहे. वास्को विमानतळ काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालक संघटनेचे सरचिटणीस प्रसाद प्रभूगावकर म्हणाले, ‘दाबोळीवर किमान 250 टॅक्सी सुरू असून ही चिंता आता आम्हालाही सतावू लागली आहे. मात्र, येथील विमानतळ बंद करणार नाही, हे आश्वासन सरकारने पाळावे. अन्यथा आम्ही देशोधडीला लागू.’
उपलब्ध एअरस्पेसमध्ये दोन विमानतळ कठीण
लहान व मध्यम हॉटेल्स मालक संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता म्हणाले, ‘मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळाच्या अंतरात एवढा कमी एअरस्पेस आहे की त्यामुळे गोव्यात एकाच बरोबर दोन विमानतळ चालू राहणे शक्यच नाही. त्यामुळे दाबोळी भविष्यात बंद होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.