Panjim : मुक्त सृजन साहित्य पत्रिका औरंगाबाद, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा पणजी, माधव राघव प्रकाशन ताळगाव व मनसा क्रिएशन पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी आयएमबी सभागृहात 11 व 12 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय पहिले मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. संमेलनाचे अध्यक्षपद नागपूर येथील सुप्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे हे भूषविणार आहेत. या संमेलनात महाराष्ट्रातील 200 साहित्यिक सहभाग घेणार आहेत.
रवींद्र शोभणे :
कादंबरीकार, कथाकार व समीक्षक म्हणून रवींद्र शोभणे सुप्रसिद्ध आहेत. समीक्षेची उत्तम जाण आणि वर्तमानाचं पक्क भान त्यांना आहे. मागील वर्षी त्यांची प्रकाशित झालेली ‘होळी’ ही कादंबरी विशेष गाजते आहे. प्रवाह, रक्तधृव, कोंडी, चिरेबंद, सव्वीस दिवस, उत्तरायण, पडघम, पांढर, अश्वमेध, पांढरे हत्ती व होळी या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. वर्तमान, दाहीदिशा, शहामृग, तद्भव, अदृष्टांच्या वाटा, चंद्रोत्सव, ओल्या पापांचे फुत्कार, महत्तम साधारण विभाजक आणि भवताल हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. ऐशा चौफेर टापूत हा ललित लेखसंग्रह, गोत्र हा व्यक्तिचित्रसंग्रह, कादंबरीकार श्री. ना. पेंडसे, सत्वशोधाच्यादिशा, संदर्भासह, महाभारत आणि मराठी कादंबरी, त्रिमिती हे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. महाभारताचा मूल्यवेध हा वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. शिवाय संपादन, अनुवाद अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. सध्या विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी ही पदवी मिळविली.
डॉ. मुरहरी केळे (ठाणे) :
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. मुरहरी केळे हे आहेत. भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी यात असणार आहे. 11 रोजी सकाळी 8:15 वाजता ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रकाश जडे व सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. 8:45 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पद्माकर कुलकर्णी (सोलापूर) व सुनीता दशरथ परब (गोवा) यांच्या हस्ते होणार आहे. 9:30 वाजता या संमेलनाचे उद्घाटन सत्र होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सतीश भाऊ चव्हाण, सरचिटणीस, म. शि. प्र. मंडळ, औरंगाबाद, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, साहित्यिक संजय आवटे, डॉ. यशपाल भिंगे (साक्षेपी समीक्षक) व दशरथ परब (अध्यक्ष आयएमबी गोवा) हे उपस्थित राहणार आहेत. प्रास्ताविक डॉ. महेश खरात करतील.
उद्घाटन सोहळ्यात डॉ. महेश खरात, डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, गोविंद काळे यांच्या ग्रंथांचे प्रकाशन सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे २०२१च्या मुक्त सृजन पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. यशपाल भिंगे (नांदेड), डॉ. मोना चिमोटे (अमरावती), शिवाजी चाळक (चाळकवाडी), गोविंद काळे (सोलापूर), डॉ. रवींद्र श्रावस्ती (सांगली), डॉ. भास्कर बडे (लातूर), ज्योती सोनवणे (औरंगाबाद), संजय चौधरी (नाशिक), व डॉ. स्मिता पाटील (मोहोळ) यांच्या साहित्यकृतींना मुक्त सृजन पुरस्कार देण्यात येणार आहे. या संमेलनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल संतोष विश्वकर्मा, चित्रा क्षीरसागर, प्रिया कालिका बापट यांचा सत्कार करण्यात येईल. या साहित्य संमेलनात तीन परिसंवाद, दोन कविसंमेलने व एक प्रकट मुलाखत होणार आहे.
11 सप्टेंबर : दुपारी 12:30
वाजता ‘आजचे शिक्षण : वास्तव, अपेक्षा आणि साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर डॉ. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली पहिला परिसंवाद होणार आहे. त्यात डॉ. विष्णू पाटील, योगेश खैरनार, प्रा. योगेश्वरी कोकरे, कृष्णाजी कुलकर्णी, प्रा. गणेश बेळंबे, डॉ. लहू वाघमारे, डॉ. शशिकांत पाटील यांचा सहभाग असेल. डॉ. छाया महाजन (औरंगाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2:30 वाजता ‘मी आणि माझे कादंबरी लेखन’ या विषयावर दुसरा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात विजय शेंडगे, सुवर्णा पवार, अविनाश कोल्हे, गोविंद काळे व प्रा. द. तु. पाटील हे सहभागी होणार आहेत. तसेच डॉ. जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4:30 वाजता बा. भ. बोरकर कविसंमेलन होणार आहे.
12 सप्टेंबर : सकाळी 9 वाजता
समकालीन कवयित्रींची कविता स्त्रीवाद आणि स्रीत्वात अडकली आहे का? या विषयावर डॉ. मोना चिमोटे (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली तिसरा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात विश्वास वसेकर, डॉ. जयेंद्रथ जाधव, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. किसन माने, डॉ. मंदा नांदुरकर, डॉ. नीता तोरणे, डॉ. ज्योती धर्माधिकारी यांचा सहभाग असेल. 11 वाजता ‘महात्मा’ कादंबरीचे लेखक डॉ. रवींद्र ठाकूर (कोल्हापूर) यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
डॉ. दत्ता पाटील, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. माधवी देसाई हे डॉ.रवींद्र ठाकूर यांची मुलाखत घेतील. यानंतर डॉ. स्वाती शिंदे-पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12:30 वाजता बहिणाबाई शिऊरकर कविसंमेलन होणार आहे. दुपारी 3 वाजता साहित्य संमेलनाचा समारोप डॉ. विश्वनाथ शिंदे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. इंद्रजीत देशमुख, डॉ. श्रुतीशी वडगबाळकर, संतोष विश्वकर्मा हे या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ठराव वाचन डॉ. संतोष देशमुख करतील, अशी माहिती डॉ. महेश खरात, डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर, चित्रा क्षीरसागर, प्रिया कालिका बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.