खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्षनेते व कुंकळळीचे आमदार युरी आलेमाव यांचे जवळचे दोन समर्थक एकाच प्रभागातून पालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले!

ज्या राजकारण्याला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कला येते व मध्यम मार्ग काढण्याचे ज्या राजकारण्याकडे ‘टॅलेंट’ असते, तो राजकारणी राजकारणात निश्चित यशस्वी होतो. विरोधी पक्षनेते व कुंकळळीचे आमदार युरी आलेमाव यांचे जवळचे दोन समर्थक एकाच प्रभागातून पालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत होते. एक समर्थक गेल्या पंधरा वर्षांपासून त्या प्रभागाचा नगरसेवक होता व पालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. तो आपल्या प्रभागातून पुन्हा निवडणुकीत उतरण्यास सज्ज आहे. तर दुसरा युवा कार्यकर्ता, ज्याच्याकडे युरींनी युवा ब्रिगेडची कमान सोपविली आहे, त्याला त्याच प्रभागातून नगरसेवकाच्या निवडणुकीत उतरायची इच्छा होती. युरींनी जर एका समर्थकाला जवळ केले, तर दुसरा नाराज होता. त्या प्रभागाची उमेदवारी कोणाला द्यावी, या विवंचनेत युरी होते. मात्र, याला उत्तर मिळाले. नव्या प्रभाग पुनर्रचनेत त्या दोघा युरी समर्थकांसाठी दोन वेगळे प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. युरी विरोधात असले, तरी युतीची ताकद मोठी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आता ऑनलाईन पक्षांचा जमाना!

‘काळाप्रमाणे मात्याक कुरपणे’ अशी कोकणीत एक म्हण आहे. समाजाची विचारसरणी काळाप्रमाणे बदलते. एक काळ होता, ज्यावेळी क्रांतीसाठी वर्तमानपत्रांची गरज होती. त्यानंतर न्यूज चॅनेलचा जमाना आला. चोवीस तास चालणाऱ्या लाईव्ह बातम्यांमुळे एक नवी क्रांती आली. आता जमाना आहे तो समाजमाध्यमांचा. आता ऑनलाईनचा काळ आहे. डिजिटल माध्यमामुळे नवी क्रांती येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म ‘सोशल मीडिया’वर झाला व क्रांती सफल झाली. आता आरक्षणविरोधी जनता पक्ष व ई-२० पेट्रोलविरोधी जनता पक्ष नावाचे सोशल मीडिया पक्ष जन्माला आले आहेत. ज्या क्रमाने कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलनात यश मिळाले, तसेच यश आरक्षणविरोधी व शुद्ध पेट्रोल क्रांतीलाही मिळणार का? सोशल मीडिया क्रांती नव्या क्रांतीची नांदी तर नाही ना? ‘लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस’.

पुरस्कारांविषयी घृणा

कोकणी अकादमीचे पुरस्कार कधी नव्हे इतके वादात सापडले आहेत. परीक्षकांची नावे घोषित न करणे यापासून अपात्र लोकांना पुरस्कार देणे अशी कैक छिद्रे त्यात आहेत. सोशल मीडियावर या विषयावर वाभाडे काढले जात आहेत. इतके की जे पात्र पुरस्कारार्थी आहेत, त्यांना ते पुरस्‍कार घ्यायला जाण्यास लाज वाटते, अशी खंत त्यांनीच व्यक्त केली. ज्यांनी टीका केली ते विद्वान, बुद्धिमान व अद्ययावत सजग वाटतात, अभ्यासू दिसतात. कोकणी क्षेत्रात राजकारण, गटबाजी व कारस्थाने वाढत आहेत. खूप लोक या बेबंदशाहीमुळे दूर जातील, अशी स्‍थिती आहे. त्‍याची जबाबदारी अध्यक्ष घेतील काय? किती तरी ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी, लेखक, नाटककार आहेत, त्यांना परीक्षक म्हणून न बोलावता, साहित्य न वाचलेल्यांना का आमंत्रित केले, अशी आगपाखड काहींनी केली. जिथे गुणवत्तेपेक्षा गटबाजीची चर्चा जास्त होते, तिथे पुरस्कारांचा नव्हे तर विश्वासाचा पराभव झालेला असतो, नाही का!

निवेदनाचा सोहळा की छायाचित्राचा?

निवेदन द्यायला गेले की अर्धा डझन हात एकाच कागदाला लागलेच पाहिजेत, अन्यथा निवेदन ग्राह्य धरले जात नाही की काय, असा प्रश्न हे छायाचित्र पाहून पडतो! समोर अधिकारी निवेदन स्वीकारत आहे; पण मागे मोबाईल, सेल्फी, कॅमेरे आणि कार्यकर्त्यांचा असा गराडा की जणू काही निवेदनापेक्षा छायाचित्रात कोण दिसणार, याचीच स्पर्धा सुरू आहे. शेवटी प्रशासनाने निवेदनातील मुद्दे किती गांभीर्याने घेतले, यापेक्षा सोशल मीडियावर फोटो किती व्हायरल झाला, हेच आजच्या राजकारणात अधिक महत्त्वाचे ठरत असल्याची ही बोलकी झलक म्हणावी लागेल.

राधारावांचे व्हिलन

सासष्टीतील काही मतदारसंघांत काँग्रेसविरोधात अन्य असंतुष्ट उभे राहण्याची तयारी करत असल्याने त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर राधाराव ग्रासियस यांनी हे असले व्हिलन भाजपासाठी फायदेशीर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे याआधी त्यांना एल्विस गोम्स यांनी उत्तर दिले होते. अलीकडे प्रतिमा कुतिन्हो यांनीही आपण व्हिलन नसून जिंकणारी उमेदवार असल्याचे म्हटले आहे. राधारावांचा हा बाण आतापर्यंत दोघांना दुखावून गेला आहे. राधारावांच्या यादीत असे किती व्हिलन बाकी आहेत बरे?

खोलकरांचा राजीनामा कधी?

आमदार वीरेश बोरकर यांना रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातून (आरजीपी) बडतर्फ करण्याचा आदेश विश्वेश नाईक यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून सोमवारी जारी केला. परंतु, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण आधीच विश्वेश नाईक यांचे निलंबन केल्याने त्यांचा आदेश अवैध असल्याचा दावा बोरकरांनी केल्याने नाईक यांच्यासह दुसरे निलंबित अजय खोलकर यांच्यातही धास्ती होती. अखेर विश्वेश नाईक यांनी मंगळवारी पक्षाच्या संस्थापक सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यावर शिक्कामोर्तबही केले. पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतरही मौनव्रत धारण केलेल्या आमदार बोरकरांनी पक्षाच्या इतर संस्थापक आणि कायद्याच्या जाणकारांसोबत चर्चा करूनच खोलकर–नाईक गटाविरोधात ‘शड्डू’ ठोकल्यामुळेच नाईक थंड झाले. त्यांच्यानंतर आता खोलकर कधी राजीनामा देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेसचा आक्रमक चेहरा

कांपाल-पणजी येथील क्रीडा खात्याच्या कार्यालयात मंगळवारी जे दृश्य पाहायला मिळाले, त्याची ही फक्त सुरुवात असल्याची कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांत सुरू होती. सध्या काँग्रेस विविध विषयांवर आक्रमक झाली असून, आंदोलनासाठी ओळखली जाणारी जुनी फळी पुन्हा सक्रिय झाल्याने पक्षाचा आक्रमक चेहरा दिसू लागला आहे. जनार्दन भंडारी, प्रतिमा कुतिन्हो, अमरनाथ पणजीकर, अर्चित नाईक, वीरेंद्र शिरोडकर अशी मंडळी आता रस्त्यावर उतरलेली दिसत आहेत. आंदोलन सुरू असतानाच एका सरकारी कर्मचाऱ्याने हळूच कुजबुज केली, ‘निवडणुका जवळ आल्यात, हे दिसतेय!’ याचा अर्थ ज्याने त्याने घ्यावा. मात्र, क्रीडा संचालक अजय गावडे यांच्यावर कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्नांचा भडीमार केला, त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पत्रकार परिषदेत आणखी दोन कथित घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पुढचा मोर्चा आता कोणत्या खात्याकडे वळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारण सुटेना...

राजकारण हे असे व्यसन आहे की, एकदा लागले की सुटता सुटत नाही. राजकारण हे एकच असे क्षेत्र आहे, ज्यात सेवानिवृत्तीचे वय असत नाही. चालता येत नसेल व दोन तास उभे राहण्याची शक्ती नसेल, तरी खासदार, आमदार व मंत्री बनू शकतात. आपले प्रकाश वेळीप हे स्वत:ला ‘एव्हरग्रीन’ राजकारणी समजत असावेत. प्रकाश वेळीप यांनी आमदार व मंत्रीपदाची चव चाखली. राजकारणात तीन वेळा पराभव चाखला, तरी त्यांची हौस पूर्ण झाली नसावी. आता त्यांना म्हणे कुशावती जिल्ह्यात नवीन लोकसभेची जागा झाल्यास खासदार बनण्याची इच्छा आहे. अशी इच्छा त्यांनी व्यक्तही करून दाखवली आहे. गोव्यात एसटी समाजाला राजकीय आरक्षण लागू व्हावे म्हणून प्रकाश सर उतार वयात उगीच घाम गाळत नाहीत. त्यांना चांगलेच माहीत आहे, ‘कुछ पाने के लिये’ परिश्रम घ्यावेच लागतात. बरोबर ना...

‘त्याची’ कारणे जनतेला माहीत!

अखिल भारतीय काँग्रेसने गिरीश चोडणकर यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये जाग आल्याचे दिसून येत आहे. पक्षापासून दुरावलेले पुन्हा पक्षाशी एकरूप होत असून, पक्षाच्या विविध संघटना लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर येत आहेत. मोर्चे, आंदोलने करीत आहेत. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागांतील जनतेला राज्यात काँग्रेस अजून जिवंत असल्यासारखे वाटत आहे. परंतु, विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे विस्मृतीत गेलेले नेते लगेच जागे का होतात, याची कारणे जनतेला सांगण्याची गरजच नाही...

आठवण रवी पात्रांवची...

फोंड्यात कुर्टी भागातील सपना रेसिडेन्सी रहिवाशांना गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या सतावू लागली आहे. या लोकांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला आणि त्यानंतर कार्यवाही सुरू झाली. या लोकांनी पाण्यासाठी खात्याच्या कार्यालयावर मोर्चाही नेला. यावेळी काहीजणांनी त्यांना फोंड्यातील समस्या सोडवणारा कुणी नाही का, असा सवाल केल्यावर, ‘आमचे रवी पात्राव असते, तर ही पाळी आली नसती,’ असे उत्तर या रहिवाशांनी दिले. सध्या फोंडा मतदारसंघ गेले नऊ महिने आमदाराविना आहे आणि ज्या काही समस्या असतील त्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्या लागतात. त्यामुळेच रवी पात्रांवचे नाव या लोकांच्या ओठांवर आले असावे...!

बोरीच्या समांतर पुलाला गती कधी?

बोरीतील मुख्य पुलावरून रोज हजारो वाहने धावत असतात. गेली तीन दशके हा पूल अविरत सेवा देत असला, तरी त्याला समांतर दुसरा पूल उभारण्याचा विषय मात्र अजूनही फाईलींच्याच पुलावरून प्रवास करताना दिसतो. पुलासाठी माती परीक्षण करण्यात आल्याचे ऐकिवात आहे. परंतु, सध्याच्या पुलावरील वाहतुकीचा वाढता ताण पाहता, काही अनर्थ घडण्यापूर्वी सरकारने जरा जागे व्हायला हवे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मांडवीवरील जुन्या पुलाच्या दुर्घटनेची आठवण अजूनही ताजी असताना, बोरीच्या पुलाबाबतही तशीच वेळ येण्याची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘अपघातानंतर जागे हो ∙∙∙

पोलिस निरीक्षकाला नारळ मिळणार?

उत्तर गोव्यातील एका पोलिस निरीक्षकाची बदली करण्याची किंवा त्यांना ठाण्याच्या पदावरून दूर करण्याची चर्चा सध्या पोलिस खात्यात रंगत आहे. गेल्या काही महिन्यांतील या अधिकाऱ्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे काही पोलिस कर्मचारीच सांगतात. पोलिस ठाण्याचा रोजचा कारभार सुरळीत चालवणे असो अथवा गुंतागुंतीची गंभीर प्रकरणे योग्य रीतीने हाताळणे असो; या निरीक्षकाला अपयश आल्याने तक्रारींचा डोंगर साचला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही याबाबत वारंवार तक्रारी पोहोचल्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. कारभारातील गोंधळ आणि वाढती अकार्यक्षमता पाहता, काही दिवसांतच या पोलिस निरीक्षकाच्या हातात नारळ देऊन त्यांची रवानगी ‘रिझर्व्ह लाइन’ किंवा अन्य ठिकाणी केली जाणार असल्याची चर्चा पोलिस ठाण्यांपासून थेट वरिष्ठ कार्यालयांपर्यंत दबक्या आवाजात सुरू आहे.

प्रश्नांची सरबत्ती सुरूच?

सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता असतोच; पण प्रश्न विचारण्यासाठी धाडसाची घंटी वाजवावी लागते. ती घंटी म्हणे, कॉक्रोच जनता पार्टीने वाजवली आणि मग इतर राजकीय पक्षांनाही सरकारी कार्यालयांचे रस्ते आठवू लागले. संचालकांना जाब विचारण्याची नवी ‘फॅशन’ रंगात आली आहे. आता खरी उत्सुकता याचीच की, ही फॅशन निवडणुकीपर्यंतच टिकणार की निकालानंतर जुन्या फाइलप्रमाणे कपाटात धूळ खात पडणार? कारण, निवडणुका जवळ आल्या की प्रश्नांची सरबत्ती सुरू होते आणि निकाल लागताच अनेक प्रश्नही ‘सुट्टी’वर जातात. यावेळी मात्र प्रश्न विचारण्याची ही सवय कायम राहिली, तरच लोकशाहीचे आरोग्य चांगले असल्याचे म्हणता येईल, अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यातच ‘जे झी ’ आता आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडू शकत आहेत.

‘त्या’ जमीन घोटाळ्याचा सूत्रधार कोण?

नावात काय असते, असे म्हणतात खरे. मात्र, नावात बरेच काही असते, हे तितकेच खरे. कुंकळ्ळी मतदारसंघातील अडणे-बाळळी येथे झालेला जमीन घोटाळा सध्या कुंकळ्ळीत चर्चेचा विषय बनला आहे. एका कुटुंबाला जमीन खरेदी प्रकरणी पन्नास लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपींनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप असून, त्यांची नावे छायाचित्रांसह जाहीर करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून ज्यांचे नाव आले आहे, त्यांचा राजकीय पक्षांशी संबंध आहे काय, अशी चर्चाही कुंकळ्ळीत रंगत आहे.

‘बर्थ डे’ कार्यक्रमातही राजकारण

सध्या काले पंचायत क्षेत्रात सुरू असलेली पिगरी हा वादाचा विषय बनलेला असताना, यावरून काही आजी-माजी पंचांमध्येही राजकीय वाद होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टी काले येथील एका अंगणवाडीचे उद्‌घाटन करण्याच्या कार्यक्रमात एका माजी सरपंचांनी हा वाद उरकून काढताना विद्यमान पंच सूरज नाईक यांच्यावर टीका केली. वास्तविक, या पिगरीला पूर्ण पंचायतीने ‘एनओसी’ दिलेली असताना एकट्या सूरज नाईक यांनाच लक्ष्य करण्याचे कारण काय, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. या पिगरीची शेड बांधण्याचे काम कुणाला मिळाले होते, असाही प्रश्न विचारला जात आहे आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा वापर राजकारणासाठी करण्याचे प्रयोजन काय, हाही प्रश्न विचारला जात आहे.

पाठ्यपुस्तकातील मुलाखत

पाठ्यपुस्तकात एक लहान चुकीचाही विद्यार्थी वेगळाच अर्थ लावू शकतात. कोणत्याही भाषेच्या पाठ्यपुस्तकात ज्या लेखकाने पाठ लिहिला आहे, त्याचा परिचय देण्यात येतो. अकरावीच्या कोकणी पाठ्यपुस्तकात कुंकळ्ळीचे स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वैद्य यांची मुलाखत आहे. ही मुलाखत काही विद्यार्थ्यांनी घेतली होती. मात्र, पाठात लेखकाचे नाव म्हणून स्वतः प्रभाकर वैद्य यांचे नाव छापण्यात आले आहे. एवढेच नव्हे, लेखकाचा परिचय म्हणून खुद्द मुलाखत ज्यांनी दिली त्या स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वैद्य यांचाच परिचय देण्यात आला आहे. खाली एका ओळीत मुलाखत कोणी घेतली, त्याची माहिती देण्यात आली आहे. आता मुलांना प्रश्न पडलाय की, लेखकाने स्वतःचीच मुलाखत घेतली काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

SCROLL FOR NEXT