पेडणे: गुळगुळीत रस्त्यावर जीवावर उदार होऊन वाहन चालवून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालणारे महाभाग काही कमी नसतात. त्यात वाहन दुसऱ्याचे असले की कशाचीही पर्वा नसते, केवळ पैशांची मस्तीच असते. असाच अवलीया पर्यटक (Goa Tourist) मोरजी (Morjim Beach) समुद्रकिनाऱ्यावर निदर्शनास आल्यावर पोलिसांनी (Police) त्याला अटक केली व गुन्हा दाखल केला. त्याने रस्त्यावर नव्हे, तर समुद्रातील लाटांवर स्वार होऊन चारचाकी चालविण्याचा जीवघेणा प्रकार मोरजी येथे केला.
मोरजी येथील समुद्रकिनाऱ्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून स्वत:चाही जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली. सदर घटना बुधवारी घडली. निष्काळजीपणे कार चालविल्याप्रकरणी मध्यप्रदेश येथील 25 वर्षीय गौरव बिशवाड नामक युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर नव्हे, तर समुद्रात कार चालविल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या कारनाम्याबद्दलचे किस्से संपूर्ण राज्यभर आज दिवसभरात चर्चिले जात होते.
अतिउत्साह नडला
मोरजी समुद्र किनाऱ्यावर सुसाट वेगात कार चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भा.दं.सं.नुसार कलम 279 व 336 नुसार गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
गौरव बिशवाड (25 वर्षे, मध्यप्रदेश) या पर्यटकाने बुधवारी मोरजी येथील समुद्र किनाऱ्यावर (जी. ए. 11 - टी. 2292) या क्रमांकाच्या रेंट अ बाईक कार अतिउत्साहात थेट समुद्रात घातली. वेगाने किनारपट्टीकडे येणाऱ्या फेसाळत्या लाटांचा सामना करत गौरव पुढे पुढे जाऊ लागला. जसजशी वेगाची नशा डोक्यात चढली, तसा त्याने कारचा वेगही वाढवला. तेथे उपस्थित स्थानिक व पर्यटकांनी आरडाओरड केली व त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.