Goa Assembly Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Election: सावधान! जनता शहाणी झालीय! खरी कुजबूज

मतदारांनी या मंत्र्याला धरल होतं धारेवर

दैनिक गोमन्तक

सावधान! जनता शहाणी झालीय!

मतदार पुन्हा पुन्हा फसू शकत नाहीत. आजचा मतदारराजा तर शहाणा बनला असून आपल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारण्याचे धाडस करू लागला आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री दीपक पाऊसकरांना मतदारांनी धारेवर धरले होते. आता उपाय नसल्याने उमेदवारांना घरोघरी फिरावे लागत असून जनता आमदारांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत आहे. उपमुख्यमंत्री बाबूही संतप्त मतदारांच्या तावडीतून सुटू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी आमदार क्लाफास डायस यांना संतप्त मतदारांचा रोष सहन करावा लागला. बाळ्ळीतील दोघा युवतींनी डायसना आश्वासनपूर्ती न केल्याबद्दल अक्षरश: धारेवर धरले. उमेदवारांनो सावधान! जनता आता शहाणी झाली आहे. जेव्हा जनता शहाणी होऊन आक्रमक बनते, तेव्हा क्रांती होते. लक्षात ठेवा, गाठ मतदारांशी आहे. ∙∙∙

उत्पलची भूमिका

पणजी मतदारसंघातील बंडखोर उमेदवार उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी निवडून आल्यानंतर ते भाजपला पाठिंबा देणार का? या प्रश्‍नाचे सरळ उत्तर अजून दिलेले नाही. ते म्हणतात, ज्या पक्षाने 50टक्क्यांहून अधिक बदनाम आणि विनाचारित्र्याचे उमेदवार दिले, ते जिंकून आले तर आपले काही त्या पक्षाशी पटणार नाही. याचाच अर्थ येत्या पाच वर्षांत तरी उत्पल पर्रीकर भाजपपासून दूर राहणार आहेत. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उत्पलना भाजपविरोधात आणखी कडक भूमिका मात्र घ्यावी लागणार आहे. ते ही भूमिका किती कठोर पद्धतीने मांडतात, त्यावर इतरांचा पाठिंबा अवलंबून असेल हे न कळण्याइतपत ते निश्‍चितच दूधखुळे नसतील. ∙∙∙(Will Utpal Parrikar support BJP in goa Assembly elections)

मीच खरा काँग्रेसमन!

काँग्रेस पक्षाने (Congress Party) एल्वीस गोम्स यांची कुठेतरी सोय करावी म्हणून त्यांना पणजीचा (Panjim) उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे उदय मडकईकर तसेच सुरेंद्र फुर्तादो हे इच्छुक आणि समर्थक खवळणे स्वाभावीक आहे. उदय यांनी तर पणजीमध्ये उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्याचा विचार चालवला आहे. दुसऱ्या बाजूला गोम्स यांनी स्वत:चे समर्थन करताना सच्चे कॉंग्रेसजन आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. गोम्स हे कुठले सच्चे कॉंग्रेसजन? कॉंग्रेसला अक्षरश: बदनाम करीत आम आदमी पक्षाची टोपी घालून फिरत होते. पक्षाने नव्या नेत्यांना दारे खुली करताच त्यांचा तीळपापड झाला. वास्तविक गोम्स यांच्या काळात ‘आप’चे काम थंडावले होते. ते निघून गेल्यावर ‘आप’ला नवी तरतरी आली आणि सध्या आम आदमी पार्टी हा गोव्यातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष बनला आहे. गोम्स यांची कार्यपद्धती सोडून दिल्यामुळे ‘आप’ एवढी भरारी घेऊ शकला. आता गोम्स यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश देऊन काही फायदा झाला का? हे या पक्षाने शोधून काढावे. एक मात्र खरे, पणजीमध्ये गोम्स इतरांपेक्षाही स्वत:ला अधिक कॉंग्रेसमन समजू लागले आहेत, हे मात्र न पचणारे आहे. ∙∙∙

रुसवे-फुगवे

काणकोणातील (Canacona) राजकीय पटलावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. रमेश तवडकर यांना भाजपची उमेदवारी स्थानिक मंडळाला विश्वासात न घेता दिल्याने मंडळाचे बहुतांश सदस्य नाराज आहेत. त्यापैकी मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, सचिव दामोदर च्यारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी, सूरज नाईक गावकर तसेच अन्य सदस्यांचे मन वळविण्यासाठी शुक्रवारी भाजपचे एक वरिष्ठ नेते काणकोणात दाखल झाले. मात्र, पदरी निराशा घेऊन हात हलवित त्यांना परतावे लागले. विजयाची 100 टक्के खात्री असलेल्या इजिदोर फर्नांडिस यांना उमेदवारी डावलून तवडकरांना उमेदवारी दिल्याने मंडळाचे बहुतांश सदस्य फर्नांडिस यांच्या कळपात शिरले आहेत. शुक्रवारी फर्नांडिस यांनी घेतलेल्या बैठकीत ते स्पष्ट झाले. ∙∙∙

देवच धर्मसंकटात

निवडणुका जवळ आल्या, की राजकीय नेतेमंडळींना देव-धर्म आठवतो. त्यामागेही मतांचे गणित असते. हल्ली तर सर्व उमेदवारांना घेऊन मंदिर, मशिदीत जाऊन दर्शन घेण्याची राजकीय पक्षांनी टूमच काढलेली आहे. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे (अक्षरश: कोविड नियम धाब्यावर बसवून) देवदर्शनासाठी मंदिरांच्या दिशेने जाताना दिसताहेत. यात सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते असतात. गंमत म्हणजे, देवाचे पुजारीही ‘बा देवा महाराजा, या पक्षाला यश दे’, असे गाऱ्हाणे घालतात. मग नेते-कार्यकर्तेही प्रफुल्लित मनाने प्रचाराला लागतात. अशाच प्रकारे एका मंदिरात दर्शनासाठी नेते-कार्यकर्ते आल्यानंतर बाहेर काही भक्तांमध्ये चर्चा सुरू होती. ‘हे तर देवालाच संकटात टाकण्यासारखे झाले. देव कोणत्या तरी एका पार्टीला विजय मिळवून देईल. सर्वांनाच आश्‍वासन देऊन बोळवण करायला देव काय राजकारणी थोडाच आहे? ∙∙∙

मतदारांची सत्त्वपरीक्षा

काणकोण मतदारसंघातील निवडणूक यावेळी मतदारांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे. कारण गतवेळेशी तुलना केली तर उमेदवार तेच; पण पक्ष उलटे-पालटे असे चित्र असेल. गतवेळी विजय पै खोत भाजप उमेदवार होते ते आता अपक्ष आहेत, तर अपक्ष असलेले तवडकर यावेळी भाजपचे असतील. गतवेळी हात घेऊन बसलेले इजिदोरही यंदा अपक्ष असतील. तेवढ्यानेच भागत नाही. पूर्वी इजिदोरचे कट्टर समर्थक असलेले जना यावेळी काँग्रेसचा हात घेऊन बसले आहेत. मग कसोटी मतदारांची नव्हे, तर कोणाची लागणार? ∙∙∙

भाजप (Goa BJP) हे धाडस करणार का?

काँग्रेसवर फॅमिलीराजचा आरोप करणारा भाजपही कॉंग्रेसच्याच मार्गाने जात आहे, हे आता सिद्ध झाले आहे. भाजपने ‘जिंकण्याची क्षमता’ या नावाखाली बाबूश व जेनिफर तसेच राणे दाम्पत्याला दोन दोन ठिकाणी उमेदवारी दिलीच. आता भाजपचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री असलेल्या बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी सांगे मतदारसंघात निवडणुकीत उतरणार आहे. बाबूंच्या पत्नीला रोखण्याचे धाडस जर बाबूंना व भाजपला नसेल तर त्याला काय म्हणावे? बाबू तुझ्या पत्नीला माघार घ्यायला सांगा, अन्यथा तुम्ही त्याच मार्गाने जा, असा इशारा बाबूंना देण्याचे धाडस पक्षश्रेष्ठी करणार का? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT