

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या ३० नगरसेवकांच्या निवडीसाठी बुधवारी (ता. ११) मतदान होणार आहे. निवडणूक क्षेत्रातील एकूण ४८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी १७ प्रभागांत दोन-दोन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत, तर १२ प्रभागांत प्रत्येकी एकच मतदान केंद्र आहे. या मतदानासाठी सुमारे ३५० कर्मचारी तैनात आहेत.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीनुसार महानगरपालिकेसाठी एकूण ३२ हजार ४९६ मतदार असून, त्यात १५ हजार २२५ पुरुष आणि १७ हजार २७१ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी आयोगाने मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममधून कर्मचाऱ्यांना मतपेट्या, मतदार याद्या तसेच आवश्यक
साहित्याचे वितरण केले. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या गटासोबत शस्त्रधारी पोलिसांचीही व्यवस्था करण्यात आली होती.नियोजित मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सरकारी वाहनांची सोय करण्यात आली होती. उन्हाळ्याचा विचार करून मतदान कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही देण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६९ उमेदवार आहेत. त्यापैकी २३ ठिकाणी दुरंगी, सहा ठिकाणी तिरंगी आणि एका ठिकाणी पंचरंगी लढत होत आहे. महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनल रिंगणात आहे,
तर उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक आणि सुरेंद्र फुर्तादो यांच्या नेतृत्वाखाली ‘आमी पणजेकार’ पॅनल निवडणूक लढवत आहे. मोन्सेरात यांनी तीसपैकी सर्व ३० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महानगरपालिकेतील एकाच कुटुंबाचे वर्चस्व संपवण्यासाठी ‘आमी पणजेकार’ पॅनल मैदानात उतरले आहे.
महानगरपालिकेच्या सर्व ३० जागांवर ‘आमी पणजेकार’ने उमेदवार दिल्याने ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. उत्पल पर्रीकर यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे कोण बाजी मारणार, याकडे पणजीकरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मतदानातील टक्केवारी निर्णायक ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.