डिचोली: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता अवघेच तास बाकी असल्याने डिचोलीत मतदारांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विविध माध्यम समूहांनी सर्व्हेक्षणानंतर निकालाचा अंदाज बांधला असला, तरी प्रमुख उमेदवारांचे समर्थक आपल्याच उमेदवाराच्या विजयाचा दावा करीत आहेत.
डिचोलीत यावेळी कोण ‘बाजीगर’ ठरणार ते 10 मार्च रोजी सकाळपर्यंत स्पष्ट होणार असले, तरी यावेळी डिचोलीत परिवर्तन होणार असल्याचा राजकीय अंदाज आहे.
यावेळी पालिका क्षेत्रातील मतदारांऐवजी ग्रामीण भागातील मतदान निर्णायक ठरणार असल्याचा अंदाज आहे. तशी चर्चाही आता शेवटच्या क्षणी सुरू आहे. पाचही पंचायत विभागांत मिळून ज्या उमेदवाराला आघाडी मिळणार, त्याचीच सरशी होणार अशीही चर्चा आहे. मतदारसंघाचा कानोसा आणि मतदारांचा कल पाहता, या मतदारसंघात विजयी उमेदवाराला मोठी आघाडी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. भाजपचे राजेश पाटणेकर चौथ्यावेळी निवडून येणार, मगोची ''सिंहगर्जना'' होणार, की अपक्ष उमेदवार ''किमया'' करणार त्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे. मात्र, मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, यावेळी मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट आहे.
या मतदारसंघाचे माजी आमदार नरेश सावळ पुन्हा एकदा मगोपच्या उमेदवारीवर भवितव्य आजमावत आहेत. 2012 साली अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 2017 साली झालेल्या निवडणुकीत नरेश सावळ यांचा विजय अवघ्या 666 मतांनी हुकला होता. मात्र, यावेळी डिचोलीत, ‘सिंहा''ची गर्जना होणार असल्याचा ठाम विश्वास मगोपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
डिचोलीच्या राजकारणातील नवीन चेहरा असलेले शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत डॉ. शेट्ये यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची किमया करून सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का दिला होता. डॉ. शेट्ये यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
भाजपसमोर आव्हान
बेरोजगारी प्रश्नावरून भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांना प्रचाराच्या सुरवातीस ग्रामीण भागात मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सुरवातीच्या काळात भाजप काहीसा ‘बॅकफूट’वर गेला होता. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आणि ‘कमबॅक’ करण्यात भाजपने यश मिळवले. तरीदेखील ग्रामीण भागात भाजप मागे असून, भाजपची सारी मदार पालिका क्षेत्रातील मतदारांवर आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत पालिका क्षेत्रातील आघाडी भाजपसाठी निर्णायक ठरली होती.
काँग्रेस बॅकफूटवर
डिचोलीत काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था मिळवून दिलेले मेघ:श्याम राऊत यांनी काँग्रेसतर्फे डिचोलीतून निवडणूक लढवली असली, तरी ते मोठी किमया करण्यात यशस्वी ठरणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे काँग्रेस पीछाडीवर राहील, असे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.