

Kidney Disease Cases Goa : नीती आयोगाने जाहीर केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात गोव्याने देशात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करतानाच राज्यात किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत त्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. राज्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण निर्मितीचा हाच वेग राहिल्यास राज्याला प्रत्येक पंचायतीसाठी एक डायलेसिस मशीन उपलब्ध करून द्यावे लागेल, असे त्यांचे विधान गांभीर्य सूचित करण्यास पुरेसे आहे.
मुख्यमंत्री म्हणतात ‘पूर्वी गोमेकॉत केवळ एक डायलेसिस मशीन उपलब्ध होते. आता तेथे अनेक मशीन्स आहेत. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक मशीन आहे’. ह्या आरोग्य वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
यकृतविकारासह कर्करोगाची साखळी भेदताना मूत्रपिंड रुग्णवाढीचे हे नवे आव्हान आहे. आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार २०२१- २०२४ या तीन वर्षांत ३,०९८ नवीन किडनी आजाराचे रुग्ण नोंदले गेले. याचाच अर्थ सरासरी दररोज २ ते ३ नवीन रुग्ण आढळतात. राज्यात अंदाजे बारा हजारांच्या घरात रुग्ण आहेत.
सद्य:स्थितीत सासष्टी तालुक्यात सर्वाधिक किडनी रुग्ण, तर फोंड्यात सर्वांत कमी आहेत. एक खरे आहे की, सरकारी इस्पितळांत मोफत डायलेसिस देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. डायलेसिस सुविधा मिळत असल्याने किडनी रुग्णांचे आयुर्मान वाढते. पण, त्याचवेळी नव्या रुग्णांची भर पडत असल्याने संख्या वाढत आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब व अति मद्यपानामुळे किडनी ‘फेल’ होण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षणही डॉक्टर नोंदवत आहेत. महसुलासाठी मद्यविक्रीला चालना देणाऱ्या सरकारचा मद्यामुळे विकारी बनलेल्या रुग्णांवर होणारा खर्चही कमी नाही. मद्याचे सामाजिक परिणामही घातक आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या संदर्भात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही विधानसभेत परखड भाष्य केले आहे. तरुण वयात किडनी बाद होण्याचे प्रमाणही वाढत आहे. या साऱ्याचा विचार करता जागृतीवर भर देणे आवश्यक आहे.
पाच टप्प्यांमध्ये किडनी विकार वाढत जातो. पैकी पहिल्या दोन टप्प्यांवर त्या संदर्भात आकलन झाल्यास रुग्ण औषधोपचाराने वेळीच सुधारतो. परंतु अनेकदा पाचव्या टप्प्यावर किडनी खराब झाल्याचे आढळून आल्यावर डायलेसिस हाच एक उपाय राहतो.
त्यात आयुष्य लांबवता येते, परंतु स्वच्छंदी आयुष्य किती जगता येते हा प्रश्न आहेच. त्याचसाठी ज्या पद्धतीने कॅन्सर तपासणी शिबिर घेतले जाते, त्याप्रमाणे किडनी तपासणी व जागृती शिबिरे आयोजित करण्यावर सरकार भर देऊ शकते.
किंबहुना ती गरज निर्माण झाली आहे. राज्यात आजघडीला किमान नऊ किडनीविकार तज्ज्ञ राष्ट्रीय मानांकन प्राप्त आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करून अशा प्रकारची मोहीम आखता येणे शक्य आहे. अत्यंत दोन साध्या चाचण्यांतून नागरिकांच्या किडनीची स्थिती तपासता येते. केवळ भीती व्यक्त करून उपयोग नाही, उपाययोजना हव्यात.
काणकोण तालुक्यात कित्येक वर्षे ठरावीक आडनावाचे रुग्ण आढळतात, हे गौडबंगाल उलगडायला हवे. अलीकडेच बिट्स पिलानीत अनसूया गांगुली यांनी काणकोणातील किडनी रुग्णांवर संशोधन केले आहे. त्याचा आधार सरकारला घेता येईल का?
काणकोणप्रमाणेच एकाच भागात अधिक किडनी रुग्ण आढळण्याचे प्रकार श्रीलंका, लॅटिन अमेरिका, ओरिसा, तोंडेमंडलम येथे आढळून आले आहेत. सध्या ९०हून अधिक रुग्ण किडनी ट्रन्सप्लान्टसाठी दात्याच्या शोधात आहेत. कुटुंबीयांतून किडनी दानासाठी पुढे येण्याचे प्रमाण गोव्यात कमी आहे. अलीकडच्या काळात ११ जे दाते मिळाले, पैकी केवळ दोघे गोमंतकीय.
बाकी बाहेरील आहेत. उशिरा होणारे विवाह, निरामय आरोग्याचा अभाव, मधुमेह यामुळे किडनी ‘मॅच’ होण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे, रुग्णांची संख्या वाढू न देणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी, वेळचे वेळी तपासणी करून घेणेही गरजेचे आहे.
बदललेली जीवनशैली, नियमित व्यायामाचा अभाव, दारूसारखी व्यसने आणि जोडीला मधुमेहासारखे सुप्त आजार असल्यावर किडनी बिघडण्याचे टप्पे नकळत व वेगाने ओलांडले जातात. लघवीच्या सवयींमध्ये होणारा बदल ही किडनी बिघडल्याची पहिली आणि महत्त्वाची खूण म्हणता येईल.
लोकांचा बेफिकीरपणा जमेस धरूनही सरकारची जबाबदारी यत्किंचतही कमी होत नाही. मद्यविक्रीच्या महसुलापेक्षा जास्त खर्च मद्यामुळे होणाऱ्या मूत्रपिंड विकारांवर करावा लागत असेल तर ते विकतच्या श्राद्धात सव्य-अपसव्य करण्यासारखे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.