Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

फोंड्याचे सहावे नगराध्यक्ष कोण?

कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश हे सहावे नगराध्यक्ष होणार?

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्याचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यावरचा अविश्‍वास ठराव संमत झाल्यामुळे आता फोंड्याला सहावे नगराध्यक्षाचे वेध लागले आहेत. कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश हे सहावे नगराध्यक्ष होणार असे बोलले जात असले तरी सध्या फोंड्यात शह-काटशहाचे राजकारण झाल्याची चर्चा सुरू आहे. सुदिनना मंत्रिपद मिळाल्यामुळे फोंड्यातील मगोपचे हौसले बुलंद झाल्याचे दिसत असून, त्यांनी आपली रणनीती आखायला सुरवात केल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतीत माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांचेही नाव घेतले जात आहे. पण सध्या फोंड्यातील भाजपची दोरी रवींच्या हातात असल्यामुळेच ते यावेळी माघार घेतील, असे बिल्कुल वाटत नाही. ‘समझनेवालों को इशारा काफी होता है’ हे रवींना जेवढे माहीत आहे तेवढे अन्य कोणाला नसेल, असेही फोंड्यात बोलले जात आहे. आपण फक्त ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे म्हणत जायचे. ∙∙∙

बिचारे तरी खमके सगलानी...

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवून साधारण अर्ध्या मतदारांची मते मिळवलेले काँग्रेसचे धर्मेश सगलानी सध्या अडचणीत आले आहेत. कुठल्या तरी पोलिस प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आहे. आता सत्ता तेथे मत्ता असणारच की. त्यामुळे सताधारी सूडबुद्धीने वागणार हे नक्की. पण धर्मेशराव काही कमी नाहीत. मागच्याप्रमाणे ‘किती आणायचे ते आळ आणा मी सक्षम आहे तोंड द्यायला’ असेच त्यांनी ठणकावले आहे म्हणे. वास्तविक निवडणुकीच्या काळातच सगलानी यांना अटक होणार होती, परंतु निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना होऊ नये म्हणून ही अटक टाळण्यात आली असे सांगण्यात येते. एकूण काय ते आधी हस्तक्षेप आणि आताही तेच अशी काहीशी परिस्थिती आहे. हे आव्हान गेली १० वर्षे सगलानी यांनी स्वीकारलेलेच आहे म्हणा.

गणेशभाऊंची संधी हुकली

असे म्हणतात दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद सुभाष फळदेसाई यांना नव्हे तर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना द्यायचे ठरले होते. मात्र, दोन प्रमुख नेत्यांनी आपले वजन ‘मराठा’ समाजाच्या बाजूने टाकल्याने सुभाष यांचे पारडे जड झाले. त्यामुळे गणेशभाऊंचे कार्यकर्ते नाराज होणे साहजिकच. या नाराजीचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीच्या वेळी बसू शकतो असे सांगितले जाते. तमनार प्रकल्पाचे आता भाजपला मार्गी लावायचे आहे. मात्र, त्यावेळी गणेश भाऊंचे कार्यकर्ते त्यात ‘खो’ घालू शकतात असे समजते. तूर्तास हा मंत्रिमंडळ विस्तार भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असेच वाटते.

मडगावचे ‘सोपो’ पुराण

मडगाव नगरपालिकेचा जुन्या ठेकेदाराला सोपो कंत्राट वाढवून देण्याचा निर्णय अनेकांना रुचलेला नाही. नेमके कोणाच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतला गेला, असा सवाल सत्ताधारी नगरसेवक जरी विचारत नसले तरी त्यांचे हितचिंतक विचारू लागले आहेत. खरे तर सोपो ठेका मुदत मार्च अखेरीस संपते व त्यापूर्वी नवे कंत्राट देण्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करायला हवे होते. पण, निवडणूक आचारसंहितेचे निमित्त करून ते केले गेले नाहीत व त्यामुळे ठेकेदाराचे फावले. तीन महिने मुदतवाढीमुळे आंब्यांचा हंगाम, पुरुमेंताचे फेस्त आदींचे लाभ त्याला मिळणार. पण, नगरपालिकेचा फायदा काय होणार हा मुद्दा उरतोच ना!

भाजपचे तृणमूलशी लागेबांधे?

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले म्हापशातील माजी नगरसेवक मायकल कारास्को यांची नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखालील गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणाच्या अर्थांत ‘जी-सुडा’च्या कार्यकारी मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याने प्रमाणिकपणे पक्षकार्य केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया सध्या उंचावलेल्या आहेत. भाजपचे तृणमूल काँग्रेसशी लागेबांधे आहेत, हेच यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा सध्या म्हापशात होत आहे. यासंदर्भात आणखीन एक आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नेहमीच आगपाखड करणारे म्हापशाचे माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा क्रिकेट सामना तिकीट घोटाळा प्रकरणात वादग्रस्त ठरलेले विनोद फडके यांनाही सदस्यपद देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मूग गिळून गप्प बसलेले आहेत, अशीही चर्चा सध्या भाजपविरोधकांत ऐकावयास मिळते. विश्वजित राणे यांनी निष्ठावंत भाजपवाल्यांच्या नाकावर टिच्चून ही कृती केली आहे, असेही ऐकिवात आहे.

‘श्रीफळ हातात घेऊन सांग, मत मारलं?’

गोव्यातील लोक तशे श्रद्धाळू आणि भावूक. कोणीही वाईट केलं, वाईट वागला तर श्रीफळ (नारळ) हातात घेऊन प्रमाण (शपथ) घेण्याची फार जुनी पद्धत आहे. सहजा नारळ हातात घेऊन खोटं बोलण्याचं धाडस कोणी करीत नाही. हाच श्रद्धेचा धागा पकडून गोव्यातील एक राजकारणी आपल्या कार्यालयात नारळ घेऊन बसतो. जो तो येतो तो म्हणतो मी तुम्हालाच मतदान केलं. पण, या मतांची गोळा बेरीज केली तर ती एकूण मतदानापेक्षा अधिक होऊन गेल्याने त्या राजकारण्याने खरंच मत मारलं असेल तर नारळ हातात घेऊन सांग असा प्रकार सुरू केल्याने लोकही बुचकळ्यात पडले आहेत. हे तरी किती सत्य वागणारे म्हणून मत मारले नाही तेसुद्धा ‘देवा पाव रे’ म्हणून खोटी शपथ घेऊन जाऊ लागले असल्यामुळे आजपर्यंतची भेट देणाऱ्यांची संख्या पाहता उमेदवाराशिवाय शिल्लक कोणी राहिले नसल्याने राजकारणी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र, अशा प्रकाराने प्रामाणिक मतदान केलेल्यांना वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ लागल्याने हा पडलेलाच बरा होता अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

ही कसली लोकशाही

निवडणूक काळात प्रत्येकजण आपल्याला जो जवळचा वाटतो त्याला मतदान करतो किंवा सहकार्यही करतो. याचा अर्थ निवडून आलेल्याने विरोधात मतदान केलेल्या किंवा सहकार्य करणाऱ्यावर सूड घेणे म्हणजेच लोकशाही काय? त्यात सरकारी कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील एखादी व्यक्ती असो निवडून आलेल्यांना मतदान केले नाही म्हणून पूर्व दिशेतून पश्चिम आणि दक्षिणपासून उत्तर दिशेला बदली केली की सरकारी कर्मचाऱ्यांवर राजकीय सूड घेतल्याचा आनंद होत असतो. मात्र, अशा राजकारणी लोकांनी विचार करावा की आपल्या विरोधात किती हजार मतदान झाले त्यांच्यावर कोणती कारवाई करणार. मोजकेच सरकारी कर्मचाऱ्यांची बदली करून कोणता पराक्रम गाजविणार आहेत. उलट निवडणूक जिंकले त्यांच्याविरुद्ध मतदान किंवा असहकार्य करूनसुद्धा आपल्याला एका शब्दात विचारले नाही हा पश्चाताप सर्वात मोठी शिक्षा होऊ शकेल आणि पुढील निवडणुकीपर्यंत वातावरण निवळू शकेल हा विचार करणारा खरा राजकारणी असतो. पण, हल्ली त्या पद्धतीने काम करणारा नेता निर्माण न होता सूड घेणारा निर्माण होत असल्यामुळे मतदार दबा धरून पुढील निवडणुकीत घरचा रस्ता दाखवत असतात. याची आठवण ठेवणारा हाच खरा राजकारणी असतो.

चार आण्यांची कोंबडी अन्...

हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी म्हापशाचे माजी नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो तसेच हळदोणे मतदारसंघातील भाजप मंडळाच्या सहकार्याने म्हापशातील तार नदीच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी स्वच्छता मोहीम राबवली. असे असले तरी त्या परिसरात अजूनही कचरा व अस्वच्छता बऱ्याच प्रमाणात आहे. जेमतेम कचरा गोळा करून ‘फोटो सेशन’ घेण्यातच त्यांनी धन्यता मानली व प्रसिद्धीच्या हव्यासातून समाज माध्यमांतून त्यासंदर्भातील वृत्त व छायाचित्रे प्रसृत करण्यात आली, अशी चर्चा सध्या हळदोणे मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आहे. त्यामुळे, ‘चार आण्यांची कोंबडी अन् बारा आण्यांचा मसाला’ अशी टीका यासंदर्भात केली जात आहे. टिकलो व भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा स्वरूपाचे थोडेफार जनहितकारक कार्य निवडणुकीपूर्वी केले असते तर त्यांचा निवडणुकीत पराभव झालाच नसता, असा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.

सभापतींची किमया

यावेळच्या निवडणुकीत काणकोणात रमेश तवडकर यांनी अनेकांचे अंदाज व कयास फोल ठरवून विजय तर मिळवलाच व सन्मानाने मिळालेले सभापतीपद कोणतीच कुरबूर न करता तितक्याच त्वरेने स्वीकारून आपण पक्षाचा शिस्तबध्द सैनिक असल्याचे सिध्द केले. यामुळे पक्षातच नव्हे, तर काणकोणातही त्यांच्याप्रती वेगळा संदेश गेला. तेवढ्याने भागले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची त्यांच्या दुसऱ्या टर्मातील पहिली भेट काणकोणात घडवून आणून सरकार पातळीवरील आपले महत्वही अधोरेखित केले आहे. रमेश यांना उगीच ‘खिलाडी’ असे म्हणत नाहीत, ते यावरून सिद्ध होते.

युरीची ताजपोशी

‘दुधाची तहान ताकावर भागवणे’ अशी एक म्हण आहे. काँग्रेसला सध्या हेच करावे लागत आहे. एका बाजूने भाजपाचे मंत्री व महामंडळ अध्यक्ष आपल्या पदाची शपथ घेतल्यावर ऐटीत फोटो काढून समाजमाध्यमावर व वर्तमान पत्रात शेअर करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सत्तेपासून लांब राहिलेल्या काँग्रेसवाल्यांनाही सेलिब्रेशनचा हुरूप आला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समिती, जिल्हा समिती व विरोधी पक्ष नेत्यांनी मोठ्या भारदस्त कार्यक्रमात शपथग्रहण सोहळा केला. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून ताजपोशी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पांढरी वस्त्रे परिधान केलेले रती महारथीही होते. मंत्रिपद नसले तर काय झाले कार्यकारी अध्यक्षपद काय लहान आहे, असे सांगून युरीची समर्थक युरीच्या शपथ ग्रहणाचे फोटो व्हायरल करीत आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेचा खेळखंडोबा

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या आमसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा राज्य तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. ते प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. माजी क्रीडामंत्री बाबू आजगावकर प्रत्येकवेळी कोणत्याही क्षण गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे ठासून सांगत. साधनसुविधा तयार असल्याचे त्यांचे नेहमीचे म्हणणे असायचे. मात्र सोमवारी नवे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी वेगळाच सूर लावला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अत्यावश्यक साधन सुविधा अद्यापही राज्यात तयार नसल्याचे गावडे यांनी जाहीरपणे सांगितले आणि राज्यातील क्रीडा जगतास आश्चर्याचा मोठा धक्का बसला. खरं कोण बोलतोय मुख्यमंत्री सावंत, माजी क्रीडामंत्री आजगावकर, की आताचे क्रीडामंत्री गावडे?

रेजिनाल्डची मल्लिनाथी

पडलो तरी पाठ जमिनीला लागली नाही असे समर्थन करणारी मंडळी असतात. यावेळी मंत्री झालोच या अविर्भावात वावरणाऱ्या कुडतरीच्या रेजिनाल्डची गत काहीशी तशीच झाली आहे. पहिल्या टप्प्यातच आपला शपथविधी होणार या तयारीने आले होते. पण, त्यांची निराशा झाली. आता तर त्यांना ती संधीच राहिलेली नाही. म्हणूनच कदाचित असेल त्यांनी वेगळा राग आळविताना आपण मंत्रिपदाच्या लालसेने नव्हे तर मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे. बिच्चारे रेजिनाल्ड, दुसरे काय म्हणणार?

मिशन सासष्टी अखेर मोडीत

मनोहर पर्रीकर यांनी 2022 मध्ये हाती घेतलेले मिशन सासष्टी अखेर दहा वर्षांनी मोडीत काढले आहे. त्यामुळे यावेळी सरकारात या तालुक्याचा प्रतिनिधी नाही. गत दोन सरकारात भाजपने पुढील तसेच मागील दाराने प्रवेश देऊन पाहिले, त्यांनी सरकारातील स्थानाचा भरपूर लाभ घेतला व आपल्या भागालाही करून दिला. पण, त्यातून भाजपच्या हाताला काहीच लागले नाही. उलट गमावले व म्हणून भाजपने आता या मंडळींच्या नादी न लागण्याचे ठरविले असावे.

ही कसली चिल्लर खाती...

फोंडा तालुक्याला चारही मतदारसंघातील आमदारांना मंत्रिपदाचा टिळा अखेर लागला. चारपैकी रवी नाईक, सुभाष शिरोडकर व गोविंद गावडे या तिघांना जेमतेम महत्त्वाची खाती देण्यात आली. आता सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेतले आहे, पण अजून तरी ते बिन खात्याचे मंत्री आहेत. इतर तिघांप्रमाणे सुदिनना म्हणे समाजकल्याण व नदीपरिवहन ही खाती देण्यात येणार आहे. याचा अर्थ मंत्रिपदे घ्या पण खाती मात्र आम्ही देऊ तीच घ्या असेच भाजपच्या वर बसलेल्या त्रिकुटाने की चौकडीने ठरवले आहे म्हणायचे तर..! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT