Goa housewives wait for free gas cylinders Dainik Gomantak
गोवा

कधीपासून मिळणार मोफत सिलिंडर: गोव्यातील महिला

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास गोव्यात प्रत्येक कुटुंबाला तीन सिलिंडर मोफत देणार, असे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २७ मार्च रोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा कार्यान्वित करणार असल्याची माहिती दिली. मात्र, ही योजना कशी राबवणार, तीन सिलिंडरचे लाभार्थी कोण असणार, त्याचे निकष काय, त्यासाठी आर्थिक निकष कोणते लावणार, याबद्दल अजून कोणतीही अधिसूचना किंवा परिपत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे या योजनेबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईच्या लाटेत ही योजना लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्यात यशस्वी ठरणार का? हाही प्रश्‍न आहे. तीन सिलिंडर मोफत योजनेविषयी राज्यातील काही गृहिणींच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया...

तीन गॅस सिलिंडर मोफत ही योजना सरकारने मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मदत करण्याच्या हेतूने आखली आहे. परंतु या योजनेमुळे आनंदी व्हायचे, की वाढत्या महागाईमुळे दुःखी व्हायचे, हाच प्रश्न प्रत्येक गृहिणीच्या पडलाय. तरी देखील कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांना तसेच महागाईमुळे सिलिंडर घेणे परवडत नसलेल्या लोकांना या योजनेचा पुरेपूर लाभ होईल. तीन सिलिंडर मोफत मिळाल्याने अनेक कुटुंबांमध्ये चुलीचा वापर कमी होऊन महिलांना होणारा त्रासही कमी होईल.

- अंजली राधाकृष्ण कीर्तनी, बोरी, फोंडा.

एकीकडे दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. सद्यस्थितीत खाद्य तेलाच्या किमती देखील गरिबांना परवडत नाहीत. अशातच भाजप सरकार सत्तेत येताच त्यांनी तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे, ही लोकांची निव्वळ दिशाभूल करणारी गोष्ट नव्हे ना? निश्चितच किती गरीब लोकांना तीन मोफत सिलिंडर मिळणार आहे, हे आधी सरकारने स्पष्ट करावे.

- आशा नाईक, खांडोळा, माशेल.

मी मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी आहे आणि सिलिंडरचे दर वाढत असल्याने गृहिणींना घरखर्चाचे बजेट सांभाळणे कठीण होत आहे. पण अलीकडेच आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांसाठी ही योजना फायदेशीर वाटत असली तरी ही योजना कितपत प्रभावीपणे राबवली जाते, हे काळच ठरवेल. ही योजना अखंडपणे सुरू ठेवावी आणि गरजू लोकांना तिचा लाभ द्यावा.

- रोशन बागकर, हळदोणा.

खरे सांगायचे तर सरकार अशा प्रकारची योजना राबवत आहे, यावर विश्‍वासच बसत नाही. कारण विद्यमान सरकारने अनेक आश्वासने दिली आणि मोडली देखील. सरकारला मनापासून जनतेची मदत करायची असेल, मोफत सिलिंडर देण्याऐवजी सरकारने इंधनाच्या किमती कमी करून संतुलन राखावे. कारण, गोव्यातील संपूर्ण जनता इंधनावरच अवलंबून आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याऐवजी सिलिंडर आणि इंधनाच्या किमतीत घट होणे गरजेचे आहे, जेणेकरून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, असे होईल.

- स्वेता शिंदोळकर, मडगाव.

गॅस सिलिंडरच्या किमती आता हजार रुपयांपर्यंत गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र, ही योजना कशी राबवली जाईल हे अजून स्पष्ट झालेले नाही. या योजनेमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकारला इंधनाच्या किमती कमी करण्याचा अधिकार आहे, हे लक्षात घेता कदाचित नव्याने स्थापन झालेले विद्यमान सरकार सर्वसामान्यांचे त्रास दूर करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करेल, अशी आशा बाळगणे रास्त ठरेल.

- जॉनक्विल सुधीर, पर्वरी.

पूर्वी आम्हाला सिलिंडर खरेदी केल्यावर काही प्रमाणात सबसिडी मिळायची. मात्र, आता तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्यामुळे ही योजना सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीग नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. बदलत्या काळानुसार गरजेप्रमाणे सरकारने तीन सिलिंडर मोफत दिले आहेत, जे गरजूंसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतील. येणाऱ्या काळात आपल्याला आनंदाने मोकळा श्‍वास घेता यावा, यासाठी आम्ही विद्यमान सरकारकडून अशा प्रकारच्या भरघोस मदतीची अपेक्षा करत आहोत.

- रूपा चारी, मडगाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT