गोव्यात पेट्रोल दरवाढ अन्‌ तालांव

'वाहन चालविणे बंद ठेवले की पेट्रोल वाढले किंवा नाही वाढले काही फरक पडणार नाही'
Petrol
PetrolDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात पेट्रोल दरवाढ होत असल्यामुळे वाहनचालक हैराण झाले असताना सरकार दुसऱ्या बाजूने जनतेला तालांव देऊन जखमेवर मीट चोळण्याचे काम करीत आहे अशा भावना जनतेत पसरल्या असून सरकारने एकतर महागाई थांबवावी किंवा बेसुमार तालांव तरी थांबवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. महागाईवरचे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तालांवाचे अस्त्र पुढे करण्यात आले आहे. म्हणजे तालांवच्या भीतीने जनतेने वाहन चालवू नये. याचा अर्थ वाहन चालविणे बंद ठेवले की पेट्रोल वाढले किंवा नाही वाढले काही फरक पडणार नाही असाच सरकारचा डाव असेल कदाचित. अर्थ काहीही असो, पण जनता नवीन सरकारच्या सुरवातीला महागाईच्या आणि अटी नियमांच्या ओझ्याखाली चिरडू लागली हे मात्र खरे. ∙∙∙

Petrol
Goa Congress: 'युवा पिढीकडे नेतृत्व देणे ही स्वागतार्ह बाब'

पाऊस आला तरी घरे नाहीत...

गेल्या जुलै महिन्यात राज्याच्या काही भागात विशेषतः खाणपट्ट्यात उसगाव, गांजे, पाळी व इतर भागात महापूर आला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सरकारने नुकसानग्रस्तांना आपल्यापरीने भरपाई देण्याचा प्रयत्न केला खरा, पण ज्यांची घरे व दुकाने या महापुरात कोसळली, त्यातील बहुतांश आपद्ग्रस्तांची घरे अजून उभी झालेली नाहीत. सरकारने कोणा एका स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून ही घरे बांधून देण्याची हमी दिली होती, त्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले, पण आता पाऊस जवळ आला तरी ही घरे अजून उभी झाली नसल्याने हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार आहे काय, असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे खाणी अजून काही सुरू झालेल्या नाहीत, खाणी सुरू करण्याबाबत सरकार तारीख पे तारीख देत आहेत, तसेच या घरांचे पण नाही ना..! ∙∙∙

ज्यो यांच्यावर कारवाई

काँग्रेस पक्षाने गोव्यात पक्षपातळीवर जे बदल केले आहेत, त्यात कित्येक बुजुर्गांना बाहेरची वाट दाखविणे पसंत केले आहे. यात काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस यांचाही समावेश आहे. डायस यांना स्वतःला काँग्रेसची वेळ्ळी येथील उमेदवारी हवी होती. मात्र, त्यांना डावलून ती सावियो डिसिल्वा यांना देण्यात आली. त्यामुळे डायस यांनी त्यांच्या विरोधात काम केल्याचे सांगितले जाते. यामुळे डिसिल्वा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली हीती. त्याचाच परिणाम म्हणून नव्या समितीत डायस यांना हटवून त्यांच्या जागी सावियो डिसिल्वा यांची वर्णी लावली गेली. मात्र, डायस यांनाही आता काँग्रेसमध्ये फारसा इंटरेस्ट राहिलेला नसावा. कारण डायस यांनी जिल्हा कार्यालयात स्वतःच्या पैशांनी बसविलेले एसीही यापूर्वीच काढून नेले आहेत. ∙∙∙

दवर्ली जिल्हा पंचायत उमेदवार कोण?

दवर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघाचे सदस्य असलेले उल्हास तुयेकर हे आमदार म्हणून निवडून आल्यावर आता ही जागा खाली झाली आहे. वास्तविक उल्हास आमदार म्हणून निवडून आल्यास या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी आके बायशचे माजी सरपंच सत्यविजय नाईक यांना देण्याचे आश्वासन यापूर्वी सदानंद शेट तानावडे यांनी दिले होते. मात्र, आता या जागेवर भाजपचे काँग्रेसमधून आयात केलेले अल्पसंख्याक प्रवक्ते उर्फान मुल्ला हेही दावा करू लागले आहेत. येत्या काही दिवसात याही उमेदवारीवरून भाजपात रण माजणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. ∙∙∙

मायकल यांची गुगली

मायकल लोबोंनी मनोहर पर्रीकरांच्या छत्रछायेखाली राजकारणाचे धडे गिरवले. त्यामुळे वेळ काळ पाहून निर्णय घेण्यात ते तरबेज आहेत. कॉंग्रेस पक्षात नुकताच प्रवेश करून देखील विरोधी पक्षनेत्याची माळ गळ्यात पाडून घेणे तसे सोपे नव्हे. कॉंग्रेसमधील बढती दिल्लीश्‍वरांच्या मर्जीवर अवलंबून असते. एकंदरीत दिल्लीश्‍वरांचा पूर्ण पाठिंबा मायकल लोबोंना असल्याचे स्पष्ट दिसते.

विरोधी पक्षनेतेपदी नाव घोषित झाल्यानंतर बहुमताला लागतील तेवढे आमदार जो घेऊन कॉंग्रेसमध्ये येईल तो मुख्यमंत्री होईल असे विधान करून भाजपच्या गोटात त्यांनी सुरूंग लावला आहे आणि याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्युत्तराने आलाच आहे. भाजपमध्ये एक असा गट आहे जो सावंत मुख्यमंत्री बनल्याने असंतुष्ट आहे. जो त्यांच्या मनासारखी वजनदार खाती न मिळाल्यास कॉंग्रेसमध्ये प्रवेश देखील करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोबोंनी काळवेळ पाहून गुगली टाकल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकंदरीत मायकल यांनी ‘नो बॉल’वर सिक्सर मारला आहे असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

सारा भर दंड वसुलीवर

सुधारित मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिस सरसकट सर्वच भागात भलतेच सक्रिय झालेले दिसतात. शुक्रवारी पहिल्याच दिवशी त्यांनी चार लाखांचा दंड वसुल केल्याचे सांगण्यात आले. त्यावरून त्यांना दंड वसुलीचे उद्दिष्ट तर घालून दिलेले नाही ना असा सवाल केला जाऊ लागला आहे. खरे तर वाहतूक पोलिसांचे काम वाहतुकीत सुसूत्रता आणण्याचे, पण प्रत्यक्षात ते त्याऐवजी चुकार वाहनचालकांना पकडण्यासाठी टपलेले आढळतात व त्यामुळे वाहतूक नाक्यांवरील खोळंबलेल्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होताना दिसते. हा कायदा म्हणजे दुष्काळात तेरावा महिना तर ठरणार नाही ना? ∙∙∙

गुण गावे किती?

चर्चिल आलेमाव सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे खूप गोडवे गात आहेत. चर्चिल हे मुरब्बी राजकारणी असल्याने ते काही कारण असल्याशिवाय कुणाचीच तारिफ करणार नाहीत. मात्र, आता विधानसभा निवडणुका तर झाल्या, मग चर्चिल यांचे मुख्यमंत्र्यांसोबत असे कोणते काम आहे, ज्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करतायेत. हा... शनिवारी चर्चिल यांनी एक घोषणा केली ती म्हणजे गोवा फुटबाॅल संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... आपण ही निवडणूक लढवणार असून गोमंतकीय फुटबॉलसाठी योगदान देत राहणार, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

अध्यक्ष असताना चर्चिल यांनी मुख्यमंत्र्यांना फुटबॉलच्या विकासासाठी 1 कोटी मागितले होते. त्यातील 50 लाख त्यांना मिळाले. मात्र, अजून 50 लाख बाकी आहेत. कदाचित, आणखी एक टर्म मिळाला तर पत्रकार परिषद घेऊन ते मुख्यमंत्र्यांना उर्वरित 50 लाखांची आठवण करून देतील यात शंका नाही... सध्या मुख्यमंत्री बाकी 50 लाख रुपये निश्चितच देतील असे चर्चिल जाहीरपणे सांगत असून सावंत मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद झाल्याचेही ते सांगत आहेत...

Petrol
कार्यकर्त्यांना भाजपमधून फोडण्याचा प्रयत्न: सुभाष फळदेसाई

वायफळ खर्चाला कात्री लावा...

नेहमीच्या वाढत्या महागाईमुळे जनता हैराण होऊ लागली आहे. दर दिवशी यातना देणाऱ्या दरवाढीला लोक कंटाळले असून अतिशय बोथट टीका नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. आता नेहमीच केल्या जाणाऱ्या इंधन दरवाढीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. सरकारला इतकी जनतेची काळजी असेल, तर आमदार, मंत्री म्हणून वारेमाप सवलती त्यात त्यांनाच महामंडळे देऊन अजून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे.

एक व्यक्ती एक पद या तत्त्वाला महत्त्व देणाऱ्या भाजपने एकाच माणसाला दोन दोन ठिकाणी लाभाचे फायदे मिळवून देणे म्हणजे जनतेच्या ताटातील अन्न हिसकावून घेण्यासारखा प्रकार वाटत नाही का. भाजपा सरकारला जनतेची काळजी वाटत असेल तर एका माणसाला कोणताही एकच फायदा द्या अन जनतेच्या पैशाची धुळवड थांबवा अशी कानाकोपऱ्यातून महागाईच्या खाईत होरपळणाऱ्या नागरिकांकडून होऊ लागली आहे. पाहूया गरिबांचे कैवारी सरकार कोणता निर्णय घेते ते. ∙∙∙

संतोष देसाई भाजपात जाणार?

माजी आमदार क्लाफास डायस यांच्या पराभवानंतर कुंकळ्ळी भाजपात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी भाजपा पर्यायी नेतृत्वाच्या शोधात आहे. कुंकळळी मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार उभा करून भाजपाने अनेक प्रयोग केले. मात्र, यशस्वी झाले नाही. आता भाजपाने हिंदू उमेदवारच तयार करावा अशी मागणी भाजप कार्यकर्ते करायला लागले आहेत. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या संतोष देसाईंना भाजपात आणण्याचा प्रयत्न भाजपाचा एक गट करीत आहे. असे झाल्यास कुंकळळीत भाजपा मजबूत होणे शक्य आहे. ∙∙∙

जाणूनबुजून की नजरचूक?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या गोमंतकीय साहित्यिकांचे अभिनंदन अपेक्षीत होते. त्याला एक वेगळे कारण होते. कारण त्यातील एक विजेता मुख्यमंत्र्यांच्या साखळीतील होता, तरीही कोणाला त्यांची आठवण झाली नाही. साहित्य क्षेत्रांत त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, एकाचा संशय वेगळाच होता. त्याच्या मते ही साहित्यिक पुरस्कार मंडळी क्षुल्लक मुद्दा उपस्थित करून कधी पुरस्कार परत करतील सांगता येत नाही व म्हणून त्यांच्या फंदात न पडलेले बरे असे तर ठरविले नसावे ना? ∙∙∙

फोंडा... ये तो होनाही था!

फोंडा मतदारसंघातील कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचावरील अविश्‍वास ठरावानंतर आता फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे. हे साहजिक आहे. कारण ये तो होनाही था..! त्याचं असं आहे जो पक्ष सत्तारूढ होतो, त्या पक्षाचे वर्चस्व संबंधित पंचायती किंवा पालिकेवर असणे हे ओघाने आलेच. कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सोडून द्या हो... पण मागचा बराच काळ सत्तेसाठी हुलकावणी दिलेल्या फोंडा पालिकेवर आता पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. सध्या फोंडा पालिकेवर मगो गटाचे वर्चस्व आहे. आता भाजपने हे वर्चस्व मोडित काढत आपला डाव टाकला आहे. हा डाव यशस्वी झाल्यात जमा असून आता फक्त नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते ते पहावे लागेल. ∙∙∙

असा ही धर्मगुरू!

‘वारे येई तसे सूप धरी’ अशी एक म्हण आहे. असे प्रवाहाबरोबर जाणारे अनेक स्वार्थी लोक असतात. मात्र, धर्मदंड हातात धरून धार्मिक स्थळात राहून सत्य, अहिंसा व निष्ठा याचे प्रवचन देणारे धर्मगुरूच जर चुकीच्या मार्गाने जायला लागले, तर त्याला काय म्हणावे? माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या बरोबर सातत्याने असणारे आपली कामे करून घेणारे बेतुल परिसरातील एका धर्मगुरूंचा खरा चेहरा पाहून बाबूंनीच नव्हे, तर आम जनतेनेही तोंडात बोटे घातली असणार.

कालपर्यत बाबूंना देवदूत म्हणणारा हा धर्मगुरू पर्वा एका कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार एल्टन डिसोझा यांचे गुणगान गात होता. एल्टनना निवडून मतदारांनी पुण्य कार्य केले, बाबूंना पाडून चांगले कार्य केले असे बरेच काही हा धर्मगुरू बोलला. या दलबदलू धर्मगुरूंचा उपदेश ऐकून लोकांवर मात्र तोंडात बोटे घालायची वेळ आली आहे. ∙∙∙

सोपटेंना पुष्पगुच्छ...

मांद्रेचे पराभूत भाजप उमेदवार दयानंद सोपटे यांचा शनिवारी वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांना अनेकजण भेटून गेले. या लोकांनी फुलांचा मोठा ढिग आणला होता. यावेळी भाजपचा एक जण म्हणालाही, की सोपटे पराभूत झाल्यामुळे आम्ही त्यांना भेटलो नाही, असे व्हायला नको, म्हणून आम्ही मुद्दाम त्यांना भेटून गेलो. सोपटे जिंकून आले असते, तर मंत्रीही बनले असते. मात्र, ते पराभूत झाले. सोपटे यांना अजूनही भाजपने वाळीत टाकलेले नाही, परंतु ते लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पंगतीत जाऊन बसतील का, हा खरा प्रश्न आहे. ∙∙∙

तृणमूल अदृश्य

दीदींच्या तीन फुलांनी गोव्यात नवी सकाळ आणण्याची स्वप्ने दाखविली आणि त्यांनीही पाहिली. मात्र, निवडणुकीत नामेनिशान न राहिलेल्या तृणमूलची चर्चाही होताना दिसत नाही. सध्या ‘ती’ काय करते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या काळात विविध भ्रष्टाचार किंवा घोटाळे जनतेसमोर आणणारे तृणमूलचे नेते सध्या गायब आहेत. पक्षाने गोव्यात काम करायला सुरवात केली असेल, तर त्यांनी निदान जनतेच्या समस्या तरी मांडत राहायला हवे. मात्र, पक्षाने गोव्यातून ‘पॅकअप’ केले की काय अशी स्थिती आहे. अखेर गोमंतकीयांना हलक्यात घेणे चुकीचे आहे. त्यांचा अंदाज सहज लावता येत नाही, निदान हे तरी दीदींच्या कार्यकर्त्यांना कळून चुकले असेल, नाही का... ∙∙∙

महात्म्य मुहुर्ताचे

सरकार सर्व काही मुहुर्तावर करत आहे. शपथविधी, मंत्रिमंडळाचे खाते वाटप आदी. मात्र, सर्वसामान्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एखादी गाडी घ्यायचे जरी ठरविले तरी तो घेऊ शकत नाही. कारण सर्वसामान्य जनतेच्या पत्रिकेत माहगाई प्रबल झाली असून जीएसटी आणि सुधारित मोटार कायदे यांची साडेसाती सुरू झाल्याने केवळ सरकारच काही ते मुहुर्तावर करेल बाकी मुहूर्त देखील आता व्ही.व्ही.आय.पी झालाय. ∙∙∙

Petrol
फोंडा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाविरुद्ध आठ नगरसेवकांकडून अविश्‍वास ठराव

बाबा रामदेव यांचा ‘तो’ व्हिडीओ तेजीत...

बाबा रामदेव यांनी 2014 मध्ये एका टीव्ही शोमध्ये तुम्हाला 70-80 रुपयांमध्ये पेट्रोल देणारे सरकार हवे आहे की 35-40 रुपयांमध्ये पेट्रोल देणारे मोदींचे सरकार हवे? असा प्रश्न उपस्थितांना केला होता. सध्या इंधनाच्या किंमतीने कहर केला आहे. या प्रश्नाबाबतच रामदेव बाबांना नव्याने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भडकलेल्या रामदेवबाबांनी ‘हं मैंने बोला था, मेरी पुछ बडेगी’ रामदेव यांना रामायणातील वाढणाऱ्या हनुमानाची गोष्ट माहीत असावी. या शेपटीसारखी इंधन दरवाढ होत आहे. सध्या हे दोन्ही व्हिडीओ जोडून सर्वत्र जोरदारपणे व्हायरल होत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com