डिचोलीतील विठ्ठलभक्त वारकरी Dainik Gomantak
गोवा

पुढच्या वर्षी तरी पायीवारी निर्विघ्नपणे पार पडू दे..!

दैनिक गोमन्तक

डिचोली: पंढरीच्या विठूराया जगावर ओढवलेले महामारीचे संकट एकदाचे लवकर दूर होवू दे, आणि यंदा नाही, तरी पुढच्या वर्षी तरी आम्हाला तुमच्या चरणाची सेवा करण्याचा भक्तीयोग मिळू दे. पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे निःसीम भक्त असलेला डिचोलीतील प्रत्येक वारकरी सध्या पंढरीच्या विठूरायाला असेच साकडे घालीत आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पंढरपूरपर्यंत पायीवारी करण्याचे भाग्य मिळाले नसल्याने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची आस किंवा ओढ लागलेले डिचोलीतील विठ्ठलभक्त वारकरी यंदाही भलतेच निरुत्साही बनले आहेत. (Warkaris of Bicholim visit Vithuraya of Pandhari)

'कोविड' महामारीमुळे यंदाही पंढरपूरला चंद्रभागा तीरी आषाढी एकादशीला विठ्ठलभक्तांचा महामेळा भरणार नाही. त्यामुळे यंदाही डिचोलीहून एकही वारकरी पायी वारी करीत पंढरपूरला गेलेला नाही. महामारीच्या संकटामुळे डिचोलीतील सर्व वारकरी मंडळांनी पायी वाऱ्या रद्द केल्या आहेत. यंदा येत्या मंगळवारी आषाढी एकादशी साजरी होत आहे. डिचोलीतून पायी वाऱ्या निघाल्या असत्या तर एव्हाना वारकरी पंढरपूरजवळ पोचले असते.

पायी वारी रद्द

2009 साली मुळगावहून पहिली पायी वारी पंढरपूरला गेली होती. त्यावेळी केवळ 53 वारकऱ्यांनी पायी वारी केली होती. तद्नंतर वेगवेगळी वारकरी मंडळे स्थापन झाली.

मागील काही वर्षांपासून आषाढी एकादशीला डिचोलीतून दरवर्षी माऊली वारकरी, मुळगाव वारकरी, विठू माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदाय आदी वारकरी मंडळे शेकडो वारकऱ्यांच्या गोतावळ्यासह किमान तेरा दिवस पायी चालत पंढरपूरला जात आहेत. कोविड महामारी संकटामुळे मागील वर्षी आणि यंदाही पायी वारी रद्द करावी लागल्याने वारकऱ्यांची चंद्रभागा तीरी भरणाऱ्या भक्तांच्या मेळ्यात सहभागी होण्याची इच्छा पोटात राहिली आहे. वारकरी मंडळांनी 2019 साली शेवटची पायी वारी केली आहे. त्यावर्षी डिचोलीहून 700 हून अधिक विठ्ठलभक्त वारकरी पंढरपूरला विठूरायाच्या चरणाकडे गेले होते. मागील दोन वर्षापासून हा भक्तीयोग मिळालेला नाही.

मंडळातर्फे कार्यक्रम

आषाढी एकादशीनिमित्त येत्या मंगळवारी अपरान्त सेवा प्रतिष्ठानच्या माऊली वारकरी मंडळातर्फे माऊली तिर्थक्षेत्र, वाठादेव-सर्वण येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत श्रींस अभीषेक नंतर श्री व सौ. पुंडलिक सावंत यांच्या यजमानपदाखाली श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा, तद्नंतर आरती, तिर्थप्रसाद होणार आहे. त्यानिमित्त वारकरी आणि विठ्ठल भक्तांतर्फे रिंगण कार्यक्रम होणार आहे. दुपारी ह.भ.प. श्री विवेक जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता हरिपाठ* पठणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायातर्फेही आषाढी एकदशीला मेणकूरे येथे विठ्ठल पादुका पुजन आदी धार्मिक विधी होणार आहेत.

विघ्न लवकर टळो

पंढरपूरला पायी चालत जाताना एक चैतन्यदायी वातावरण पसरत असते. प्रत्येक वारकरी माउलीला पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते. मागील दोन वर्षांपासून वारी झालेली नाही. त्यामुळे विठ्ठलभक्तांची निराशा झालेली असली, तरी विठूरायावरील श्रद्धा ढळलेली नाही. आता पंढरीच्या विठूरायालाच भक्तांची काळजी. महामारीचे विघ्न तेच दूर करणार आणि पुढील वर्षी आषाढी एकदशीला विठ्ठलभक्तांना आपल्या चरणाकडे नेणार. असा विश्वास आणि श्रद्धा बाळगूया.

-देवानंद नाईक, अध्यक्ष, संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदाय.

भक्ती श्रेष्ठ

पायी वारी करताना मिळणारी अनुभूती वेगळीच असते. प्रत्येक वारकरी विठ्ठलभक्तीने न्हाऊन गेलेला असतो. पायी वारी करायला मिळत नाही, म्हणून माऊली भक्तांनी नाऊमेद होवू नये. श्री विठ्ठलावर विश्वास ठेवा आणि आहात तेथून भक्ती करा. विठूराय भक्तांचे संकट नक्कीच दूर करणार. विठ्ठल कृपेने पुढच्या वर्षी वारी करायला मिळणारच. असा निश्चय बाळगा.

-रघुनाथ (भाऊ) गाड. अध्यक्ष, मुळगाव वारकरी मंडळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT