सांगे: पंचायत निवडणुकीत (Goa Panchayat Election) खरे नुकसान झाले ते माजी सरपंचाचे. सांगे तालुक्यातील सात पंचायतींपैकी सातही माजी सरपंचांचे प्रभाग राखीव झाल्याने काहींना घरची वाट दाखविण्यात आली आहे तर काहींनी आपल्या पत्नींना त्या प्रभागात उभे करून आपण दुसऱ्या प्रभागात नशीब अजमाविण्यास प्रयत्न केला आहे. यंदाची पंचायत निवडणूक म्हणजे प्रस्थापितांवर आलेली राजकीय संक्रात असल्याचे बोलले जात आहे.
भाटीचे माजी सरपंच उदय नाईक हे गेली पाच वर्षे सरपंच म्हणून स्थिर राहिले. पत्नी शालिनी नाईक आणि उदय नाईक हे गेली कित्तेक वर्षे पंचायत राजकारणात सक्रिय आहेत. यंदा उदय नाईक यांचा प्रभाग एसटीसाठी राखीव केल्याने ते आता पत्नी निवडून येत असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. परिणामी दोन पैकी एक जागा गमवावी लागणार आहे.
कुर्डी वाडे पंचायतीच्या माजी सरपंच डोमॅसियो बर्रेटो यांचाही कुर्पे येथील प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने ते निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. पण, त्यांच्या जागी ते आपल्या निकटवर्तीय उमेदवार उभा करणार असल्याचे सांगण्यात आले.
नेत्रावळी पंचायत गेली पाच वर्षे सुरवात ते अखेरपर्यंत सतत वादग्रस्त राहिली आहे. ती सतत बदलणाऱ्या सरपंच पदामुळे. पंचायतीचा कारभार संपण्यास चार दिवस शिल्लक असतानाही सरपंच पद बदलले. अधिक काळ सरपंच म्हणून कारभार पाहिलेल्या माजी सरपंच अर्चना उदय गावकर यांच्या जागी आता त्यांचे पती व माजी उपसरपंच उदय गावकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी सरपंच संदीप पाऊसकर यांचाही प्रभाग यंदा महिलांसाठी राखीव झाला आहे. आता ते आपल्या पत्नीला त्या प्रभागातून निवडणुकीत उतरवित आहेत.
सांगे तालुक्यातील शेवटची पंचायत उगे. या पंचायतीतील माजी सरपंच उदय देसाई यांचाही प्रभाग महिलांसाठीच राखीव झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी रिंगणात उतरणार असल्यामुळे सात पैकी सातही पंचायत माजी सरपंचांना हा राजकीय धक्का बसल्याने काहींना घरी जावे लागले आहे तर काही जण दुसऱ्या प्रभागात जाऊन नशीब अजमावून पाहणार आहेत.
गेल्या पाच वर्षात सरपंचपद बदलण्यात विक्रम केलेल्या काले पंचायतीमधील माजी सरपंच किशोर देसाई यांचाही प्रभाग महिलांसाठीच राखीव झाला आहे. आता त्यांनीही आपल्या पत्नीला आपल्या प्रभागातून निवडणुकीत उतरविले आहे तर ते अन्य प्रभागातून निवडणूक लढवत आहेत.
नेत्रावळी पंचायतीला स्थिर प्रशासन लाभो, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. रिवण ग्रामपंचायत ही नऊ प्रभागाची. गेल्या वेळी नऊ पैकी सहा महिला पंचायत सदस्या या ठिकाणी निवडून आल्या होत्या. सरपंच म्हणून सूर्या नाईक यांनी पाच वर्षे प्रथमच स्थिर पंचायत कारभार दिला. मात्र यावेळी त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी आता दुसऱ्या प्रभागात धाव घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.