सासष्टी, दक्षिण गोव्याचा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख घटक पक्ष कॉंग्रेसची निष्ठावंत कार्यकर्ते व प्रतिनिधी नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कुठल्याही निवडणुकीत बूथ यंत्रणा महत्वाची असते.
तीच नसेल तर मग त्या पक्षाला आपले वर्चस्व राखणे अशक्य होत असते, अशीच काहीशी कॉंग्रेसची स्थिती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कॉंग्रेसची उमेदवार कॅप्टन विरियातो यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर जास्त आहे.
केपेचे आमदार दक्षिण गोव्यातील प्रचार पाहतात. विरोधी पक्ष नेते व प्रदेशाध्यक्ष या नात्याने युरी आलेमाव व अमित पाटकर यांच्यावर उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांच्या प्रचारकार्यातही सहभागी व्हावे लागते.
दक्षिण गोव्यात बाणावलीत व वेळ्ळी येथे ‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांच्यामुळे प्रचाराला थोडी धार आहे. पण इतर ठिकाणी उदाहरणार्थ नुवे, नावेली, मडगाव आमदार नसल्याने सर्व काही कार्यकर्ते व नेत्यांवर विसंबून रहावे लागते. पण या भागात कॉंग्रेसकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अभाव दिसून येत आहे.
एल्टन, युरी व अमित या तिघांनी एकत्रितपणे पक्षाच्या प्रचारकार्यात स्वतःला झोकून दिलेले दिसत आहे. केपे व कुंकळ्ळीत एल्टन व युरी काही प्रमाणात ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देऊ शकेल. अमित पाटकरची जबाबदारी कुडचडे, सावर्डे, सांगे या भागात भाजपची आघाडी कमी करण्याकडे असेल.
भाजपकडे सावर्डे, सांगे, कुडचडे, काणकोण, मडगाव, नुवे, मुरगाव, दाबोळी, वास्को, कुडतरी, फोंडा, मडकई, शिरोडा या मतदारसंघात त्यांचे स्वतःचे आमदार किंवा सरकारला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे पक्षाने या आमदारांवर जबाबदारी टाकली आहे व ते सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचार कार्य करीत आहेत. त्यामुळे या भागात ‘इंडिया’ च्या प्रचार कार्यात उत्साह दिसून येत नाही.
‘इंडिया’ आघाडीची मदार केवळ सासष्टीतील मताधिक्यावर आवलंबून आहे. पण हे मताधिक्य मडकई, फोंडा, शिरोडा, सांगे, काणकोण या भागात भाजपला मिळू शकणारी प्रचंड आघाडी भरून काढण्याइतपत मोठी असेल का, हाही एक प्रश्न इंडिया आघाडीतील युती पक्षांनी चिंता करण्यासारखा आहे.
२०१४च्या पुनरावृत्तीची भाजपला अपेक्षा
भाजपच्या नरेंद्र सावईकर यांना २०१४ च्या निवडणुकीत सासष्टी भागात ४० हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना सासष्टीत ३० हजार मतांची आघाडी मिळूनही काहीच उपयोग झालेला नव्हता. मात्र २०१९ मध्ये भाजपला ही आघाडी कायम ठेवता आली नव्हती.
२०१४ साली नुवेत भाजपला ५,३२१, बाणावलीत ४,४३३, वेळ्ळीत ४,९५९ मते पडली होती. मात्र २०१९ मध्ये या मतदारसंघात अनुक्रमे २,५२५, २,४१४ व ४,१५३ अशी कमी मते पडली होती. याचे कारण तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजप सोबत नव्हता.
ही उणीव भरून काढण्याइतपत मडकई, फोंडा व शिरोडा मतदारसंघात भाजपला अपेक्षित मते पडू शकली नव्हती. यावेळी हा पक्ष भाजप सोबत आहे. त्यामुळे या वेळी २०१४ पुनरावृत्ती होणार,या आशेवर भाजपचे नेते सध्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.