

पणजी: गोवा पोलिसांनी एका मोठ्या बनावट गुंतवणूक घोटाळ्याचा छडा लावला. पणजी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपीला कोल्हापूरमधून अटक करण्यात आली. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुरज एकनाथ सावंत याला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. या आरोपीने बनावट गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून पणजीतील एका वरिष्ठ नागरिकाची फसवणूक केली.
या घोटाळ्याच्या तपासात गोवा पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला. या फसवणूक प्रकरणातील 80 लाख रुपये अनेक खात्यांद्वारे हस्तांतरित करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, या खात्यांचा संबंध इतर राज्यांतील 8 वेगवेगळ्या सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडलेला आहे. या 8 प्रकरणांमध्ये फसवणुकीची एकूण रक्कम 13.10 कोटी रुपये आहे. याचा अर्थ, गोवा फसवणुकीतील रक्कम इतर राज्यांतील सायबर गुन्ह्यांमध्ये वापरली गेली. यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती गोव्याच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये पसरलेली असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण तीन व्यक्तींची ओळख पटवली. त्यापैकी मुख्य आरोपी सुरज सावंतसह दोघांना अटक करण्यात आली. तर एकाला नोटीस बजावण्यात आली. गोवा पोलिसांचे (Goa Police) पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या 80 लाख रुपयांच्या हस्तांतरणामागील संपूर्ण साखळी आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या 13.10 कोटींच्या फसवणुकीत सूरज सावंतची नेमकी काय भूमिका होती, याचा पोलीस शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.