Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजयच्‍या ‘प्रवेशा’चा अर्थ काय?

Khari Kujbuj Political Satire: विधानसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, पण फोंड्यात सध्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Sameer Panditrao

विजयच्‍या ‘प्रवेशा’चा अर्थ काय?

सलग १३ वर्षे राज्‍याच्‍या सत्तेवर असलेल्‍या भाजप सरकारला काही प्रमाणात का असेना, पण जनता कंटाळलेली आहे. त्‍याचा पुढील जिल्‍हा पंचायत, विधानसभा निवडणुकीत आपल्‍याला फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊनच रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सचे (आरजी) संस्‍थापक अध्‍यक्ष मनोज परब सात महिन्‍यांची विश्रांती घेऊन पुन्‍हा राजकीय आखाड्यात उतरले. मनोजनी सद्यस्‍थितीत तरी उत्तर गोव्‍यावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. आता मनोज परब यांच्‍याप्रमाणेच आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनीही दक्षिणेतून आपला मोर्चा उत्तरेकडे वळवला असून, विविध कारणांनी ते उत्तर गोव्‍यातील कार्यकर्ते, मतदारांच्‍या गाठीभेटी घेत आहेत. त्‍यामुळे विजयच्‍या मेंदूत सध्‍या काय सुरू आहे, ते मात्र कळायला मार्ग नाही. पण, विजयनी उत्तर गोव्‍यात केलेला ‘राजकीय’ प्रवेश बघून मतदारांना विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात त्‍यांनी ‘आरजी’च्‍या पोगो विधेयकाला दिलेला पाठिंबाच एकसारखा आठवत आहे.. ∙∙∙

...माळ कुणाच्या गळ्यात!

विधानसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, पण फोंड्यात सध्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः फोंडा मतदारसंघ हा फोंडावासीयांच्याच नव्हे, तर इतरांसाठीही उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक हे यावेळेला निवडणुकीत उतरणार नाहीत, हे नक्की. पण आपला पुत्र रितेश याला निवडणुकीत उतरवून निवडून आणण्याचा चंगच रवी नाईक गटाने बांधला आहे. दुसरीकडे मगोचे फोंड्यातील नेते केतन भाटीकर, भाजपचेच आणखी एक नेते विश्‍वना थ दळवी तर काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनीही देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. सध्या या चारही इच्छुकांकडून आपापल्यापरीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे येणारा काळच ठरवणार आहे. ∙∙∙

आमदारांची वाॅर्निंग

कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून पोलिसांना मात्र चोरटे सापडत नाहीत. रात्रीची गस्त तर जवळपास हद्दपारच झालेली आहे. तक्रारदारांना पोलिस न्यायालयात हेलपाटे घालावे लागतील, असा धाक दाखवून बाहेरचा रस्ता दाखवितात. या सर्व प्रकरणाची स्थानिक आमदार वेन्झी व्हिएग्स यांनी गंभीर दखल घेऊन घरफोड्यांचा तपास करा, अन्यथा आज सोमवारी घेराव घालू असा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम पोलिसांवर होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण या ठाण्यात सध्या जो साहेब आला आहे, त्याला बाणवलीतील एका स्ट्रॉन्ग पॉलिटीशनने आणले आहे. हा राजकारणी कोण आहे, हे व्हेंझी बाबालाही ठाऊक आहे. हीच तर राजकारण्याची खासियत आहे. ∙∙∙

टपाल खात्यात गोमंतकीय पाहिजे!

टपाल खात्यात गोमंतकीयांपेक्षा महाराष्ट्रीयन कर्मचाऱ्यांचा भरणा जास्त झालेला दिसत आहे. टपाल हे सामान्य लोकांकडे जास्त संपर्क येत असलेले माध्यम आहे. पण गोमंतकीय कर्मचारी नसल्याने संवाद साधणे अनेक जणांना कठीण होत आहे. या कर्मचाऱ्यांना काही गोमंतकीय गावांची, वाड्यांची नावेच माहित नाही, त्यामुळे पत्रे वेळेवर पोहोचण्यास खोळंबा होताना दिसत आहे. तरी मोबाईल, व्हॉट्सऍप, ईमेलचा वापर होत आहे. त्यामुळे जास्त काही अडत नाही. तरीसुद्धा टपाल खात्यात गोमंतकीय पाहिजे, या मागणीला आता जोर येऊ लागला आहे. ही मागणी रास्तच आहे. पण स्वतः गोमंतकीय युवक टपाल खात्यात, बॅंकांमध्ये नोकरी करण्यास प्राधान्य देतात का? हा चर्चेचा विषय होऊ शकतो. नोकरीसाठी जसे इतर राज्यातील लोक येथे येतात, तसे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जायला गोमंतकीय तरुण तयार होत असतो का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. गोमंतकीयांनी गोव्याचे पारंपरिक व्यवसाय दुसऱ्यांच्या हाती दिले आहेत, ते आम्ही बघतोच की. आता गोमंतकीय युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न जाता टपाल, बॅंका, खाजगी कंपन्यामध्ये नोकरी करण्यासाठी व पारंपरिक व्यवसाय सुरु करण्यासाठी जागृती आवश्यक आहे. ∙∙∙

पेलेचा चतुर्थी संदेश!

पेले हे केवळ मच्छिमार नसून ते समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात राहणारे एक व्यक्तिमत्त्व आहे. प्रसिद्धीच्या झोतात कसे रहावे, हे पेलेकडून शिकावे. मच्छीमारांचे प्रश्र्न व समस्या राजकारण्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते आपल्या खास शैलीने करतात. त्यासाठी गोव्यात ते बरेच प्रसिद्ध झाले आहेत. बाणावली, वार्का, केळशी किनाऱ्यालगत कित्येक पंचतारांकित हॉटेल आहेत. त्यामध्ये येणारे क्रीडा, राजकारण, चित्रपट या क्षेत्रातील दिग्गजांना पेले सहज आकर्षित करून घेतात. आता त्यांनी याच माध्यमातून चतुर्थीचा संदेश दिला. गणेशाची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची न बनवता मातीची बनवावी. बेतुल येथील हिंदू समाज पूर्वीपासूनच मातीचा गणपती बनवतात, जो पर्यावरण पूरक असतो. कुठल्याही जलस्रोतांमध्ये या मूर्तीचे विसर्जन केले तर त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही, असे तो सांगतो. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. कधी कधी अशा मूर्ती त्यांच्या जाळ्याला लागतात व नंतर ते त्या मूर्ती सन्मानपूर्वक वर ठेवतात. पेले दिसायला अज्ञानी वाटतात पण ‘तकलेन फीन’. त्यांचे विविध क्षेत्रातील ज्ञान अफाट आहे, हे त्यांच्याकडे बोलल्यानंतर लक्षात येते. ∙∙∙

गावे-शहरे कुत्र्यांनी व्यापली!

भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस डोक्यावर चढली आहे. पण सरकारचे काय? ते फक्त आश्वासने देण्यात पटाईत! जणू आश्वासने हीच खरी औषधे आहेत, आणि जनता ती गिळत बसली की सगळे ठीक होईल. निर्बीजीकरणाच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष काम मात्र शून्य. कदाचित फाईलमधल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले असवे, रस्त्यावरील नव्हे! गावे-शहरे कुत्र्यांनी व्यापली आहेत आणि लोक मात्र भीतीच्या सावटाखाली जगताहेत. विदेशी जातींवर बंदी आहे म्हणे, पण त्या जातींनाही सरकारची घोषणाबाजी एवढी आवडते की त्या निर्धास्तपणे घराघरांत वावरतात. आणि मग सामान्य माणूस प्रश्न विचारतो, ‘सरकार नेमकं करते तरी काय?’ ∙∙∙

चमकायची संधी!

जमिनीवरील बेकायदा बांधकामे वाचविण्‍यासाठी राज्‍य सरकारने विधेयक दुरुस्‍ती केले. त्‍यामुळे निर्माण झालेला यक्ष प्रश्‍‍न दूर झाला, असे सध्‍या तरी मानले जात आहे. हे आव्‍हान संपुष्‍टात येतेय, तोवर किनारी भागातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा वर आला आहे. राष्‍ट्रीय हरित लवादाने बेकायदा बांधकामांची यादी संकतेस्‍थळावर जाहीर करण्‍यासाठी किनारी व्‍यवस्‍थापन समितीला अखेरचा इशारा दिला आहे. भविष्‍यात कारवाईसाठी त्‍याचा वापर होईल, हे निराळे सांगायची गरज नाही. आता कुणा राजकीय नेत्‍यासाठी ही चमकायची संधीही ठरू शकते. टॅक्‍सीवाल्‍यांसाठी मायकल लोबो धावून येतात. आता किनारी बांधकामे वाचविण्‍याचा कैवार घेण्‍यास कोण पुढे येतो ते पाहू. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT