Goa Politics: खरी कुजबुज; माविन सुटले, बाबूशचे वाढले टेन्शन!
खरा विरोधी पक्ष कोण?
छोटी छोटी राज्ये जिंकून राजकारणात पुढे जाण्याचे धोरण ठेवलेल्या आम आदमी पक्षाने (आप) गत गोवा विधानसभा निवडणुकीत तीन जागा जिंकल्या. तेव्हापासूनच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेत्या आतिशी यांनी २०२७ च्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे निश्चित केले होते. त्याची सुरुवातही या दोन नेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. आतिषींचे वारंवार गोव्यात येणे, विविध कार्यक्रमांत सहभागी होणे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे हा त्याचाच भाग असल्याचे लपून राहिलेले नाही. एकाबाजूला आतिषींनी आप हाच गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे जनतेच्या मनात रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना मात्र त्याबाबत काडीचेही सोयरसूतक नसल्याचे ‘सुशेगाद’ काँग्रेस नेत्यांच्या वर्तनातून दिसत आहे. त्यामुळे खरेच राज्यात विरोधी पक्ष नेमका कोण? असा प्रश्न जनतेच्या मनात पडला नसेल तर नवलच! ∙∙∙
‘ईडीसी’चा ‘संकल्प’!
प्रदेश काँग्रेसचा आक्रमक नेता अशी ओळख काही वर्षांपूर्वी असलेले संकल्प आमोणकर गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मुरगावातून निवडून आले आणि त्यानंतर सहाच महिन्यांत इतर सात आमदारांसोबत काँग्रेसला ‘हात’ दाखवून ते भाजप सरकारातही सहभागी झाले. मतदारसंघाच्या विकासासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचे आमदार आमोणकर आजही सांगतात. परंतु, त्यांची मंत्रिपदाची आस कधीच लपून राहिलेली नाही, हे त्यांनी बालभवनचे अध्यक्षपद नाकारले त्याचवेळी स्पष्ट झाले होते. मंत्रिमंडळ फेरबदलात निश्चित संधी मिळून आपण मंत्री होऊ असे आमोणकरांना सातत्याने वाटत होते. परंतु, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्याकडे कानाडोळा करीत दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली. त्यामुळे संकल्प कमालीचे दुखावले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. सोबतच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची कला अकादमीच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्याचाही मुख्यमंत्र्यांचा बेत असल्याची चर्चा आहे. पण, संकल्प ‘ईडीसी’चा ताबा घेणार की अजूनही पुढील फेरबदलाची प्रतीक्षा करणार, हे पुढील काहीच महिन्यांत कळेल. ∙∙∙
प्रदेशाध्यक्षांच्या घरी राबता!
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरातील गणरायाचा मुक्काम दीड दिवसांचा असल्याने पहिल्या दोन दिवसांत अनेक महनीय व्यक्ती त्यांच्या घरी भेट देतात. राज्यपाल, मुख्य सचिव, खासदार आणि मंत्री व आमदारांपासून मंडळी त्यांच्या घरी गेले. अशाप्रकारे आता काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांच्या घरीही गणरायाच्या दर्शनालाही अनेक मान्यवर गेले. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याही घरी आता पक्षातील वरिष्ठांचे येणे सुरू झाले आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने राजकीय मंडळी एकत्रित येणार म्हटल्यावर चर्चाही होणारच. महत्त्वाची बाब म्हणजे समाजमाध्यमांमुळे कोण कोणाच्या घरी गणेश दर्शनाला गेला, याची माहिती सहजपणे उपलब्ध होते, त्याशिवाय कधी न जाणारेही अशा उत्सवाचे निमित्त साधून जात असतील, तर त्यामागील संकेतही मिळतात, हे काही न लपण्यासारखे नाही. ∙∙∙
माविन सुटले, बाबूशचे वाढले टेन्शन!
तब्बल पंचवीस एक वर्षे वीजसबसिडी घोटाळ्याच्या ससेमिऱ्यातून मंत्री माविन गुदिन्हो निर्दोष सुटले आहेत. ते दोषी ठरतील व त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल म्हणून अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले होते, पण त्या पेक्षा मावीनची देवभक्ती सरस ठरली खरी. पण तो मुद्दा नाही मावीन या प्रकरणातून सुटले खरे, पण त्यामुळे अशाच एका प्रकरणाचा म्हणजे पणजी पोलिस स्टेशनवरील हल्ला प्रकरणाचा सामना करणाऱ्या महसुलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे टेन्शन म्हणे त्या निकालापासून वाढले आहे. मावीन व बाबूश दोघेही जर दोषी ठरले, तर दोन मंत्रिपदे रिकामी होतील आणि आपणाला संधी मिळेल अशी स्वप्ने भाजपातील अनेक आशाळभूत गेले अनेक महिने पहात होते. त्यांचे नवस फळाला येऊ नये, अशी मागणी बाबूश समर्थक म्हणे माविन निर्दोष ठरल्या दिवसापासून करत आहेत. त्यामुळे बाबूशचे टेन्शन या दिवसांत वाढलेले असावे.∙∙∙
चर्चिलची खेळी!
चर्चिल आलेमाव हे गोव्यातील मुरलेले राजकारणी आहेत. आता त्यांचे वय ७६ वर्षे असले तरी त्यांना अजूनही राजकारणात प्रकाश झोतात राहणे आवडते. त्याच बरोबर बाणावलीतून २०२७ची विधानसभा निवडणूकही लढविण्याचा इरादा त्यांनी अस्पष्टपणे जाहीर केला आहे. त्यांनी अनेक पक्ष पाहिले आहेत. भाजपात त्याने थेट प्रवेश केलेला नसला तरी या पक्षाचा अप्रत्यक्षपणे आसरा घेतलेला आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःचा पक्ष सुद्धा काढला. आमदार, मुख्यमंत्री, खासदार ही पदे त्यांनी भूषवली. तरी ते अजून राजकारणात अतृप्त आहेत. दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळाल्यावर लगेच ते त्यांच्या घरी पोहोचले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे येणेजाणे असतेच. चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. बाणावलीत भाजपचा उमेदवार निवडून येणे कठीणच याचा अनुभव स्वतः भाजपने घेतलाच आहे. जर चर्चिलला अपक्ष ठेवून त्याला आतून पाठिंबा दिला व भाजपाचा नामापुरता उमेदवार ठेवला तर कॉंग्रेस व आप या दोन्ही पक्षाना बाजूला करणे शक्य आहे, असे भाजपचे व चर्चिलचे पण गणित असावे. त्यासाठी त्यांना दिगंबर व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा पाठिंबा गरजेचा आहे. त्याचसाठी का हे हेलपाटे? अशी चर्चा सुरु झाली आहे. पण बाणावलीकरांना हे राजकारण काही माहीत नसेल. ∙∙∙
मंत्री चकित होतात तेव्हा!
मंत्री ही व्यक्ती सर्व ज्ञानी असा समज सध्या समाजात आहे. पण त्याहून हुशार व्यक्ती समाजात दिसून आली तर? असाच एक किस्सा आता समोर आला आहे. गणेशोत्सव दर्शनाच्या निमित्ताने पर्वरी मतदारसंघात फिरताना मंत्री रोहन खंवटे यांची गाठ एका चिमुकल्याशी पडली. त्याने रुबिक क्यूबचे कोडे लिलया सोडवत मंत्र्यांनाच चकीत केले. अखेर त्याला टाळी देत मंत्र्यांना स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. एखाद्या मंत्र्याला चकित करायचं असेल तर त्यासाठी मोठमोठी भाषणं, आकडेवारी वा प्रश्नोत्तरं लागत नाहीत; एक लहानसा मुलगा आणि हातात रुबिक क्यूब पुरेसा असतो! हेच दृश्य घडलं माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या गणेश दर्शन दरम्यान. मंत्री एका घरात बसलेले असतानाच एका छोट्या मुलाने काही क्षणांत रंगीबेरंगी रुबिक क्यूब सोडवून टाकला. नेहमी लोकांना उत्तरे देणारे मंत्री यावेळी मात्र थोडेसे निरुत्तर झाले. अवघ्या काही सेकंदांत कोडे सोडवणाऱ्या त्या मुलाकडे पाहून त्यांनी त्याला टाळी दिली. त्या मुलाच्या हुशारीने मंत्र्यांसकट सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याची आणि आनंदाची छटा उमटली हे काही वेगळे सांगायला नको. ∙∙∙
आतिषीनेही धरला घुमटावर ठेका
सध्या संपूर्ण गोव्यात चतुर्थीचा सण साजरा होत असून सगळीकडेच धुमधडाक्यात आरत्या सादर केल्या जात आहेत. गोव्यातील चतुर्थीची आरती म्हणजे, घुमट आणि शामेळ यांच्याशिवाय अपूर्णच. गोव्यातील या घुमटाचे भल्या भल्यांना आकर्षण वाटते. गोव्याच्या आपच्या प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी याही या आकर्षणातून सुटल्या नाहीत. आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांच्या घरी चतुर्थीसाठी आलेल्या आतिषीने आरतीच्यावेळी घुमटावर ठेका धरला. सध्या हा व्हिडियो सगळीकडे व्हायरल होत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.