Goa Politics: खरी कुजबुज; दामू नाईक चुकले का?

Khari Kujbuj Political Satire: सरकारतर्फे मंत्र्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यात ३० वर्षे आमदार असलेले व मुख्यमंत्रिपदावरही ते काही काळ होते, त्यांना ११व्या स्थानी व तवडकर शेवटच्या म्हणजे १२व्या स्थानी आहेत.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

दामू नाईक चुकले का?

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी एक एक वक्तव्य केले. त्यानुसार २०२७च्या विधानसभा निवडणुकीत काही विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळाली नाही तर आश्र्चर्य वाटून घेऊ नये. उमेदवार निवडताना कार्यक्षमता, जिंकून येण्याची क्षमता, लोकसंपर्क व पक्ष निष्ठा या बाजूंचा विचार केला जाईल. सध्या भाजपचे किती विद्यमान आमदार प्रदेशाध्यक्षांच्या निकषात बसतात हा मोठा प्रश्न आहे. जर ज्येष्ठता यादी लक्षात घेतली, तर दिगंबर कामत, रवी नाईक, सुभाष शिरोडकर यांना उमेदवारी मिळणे कठीण का? वरील तिघेही एक दोन पक्षात फिरून आलेले राजकारणी. गत विधानसभेतील विजयी फरक लक्षात घेतल्यास काब्राल, उल्हास, मोन्सेरात, स्वतः मुख्यमंत्री हे केवळ ५०० ते ६०० मतांच्या फरकाने निवडून आलेले. तसे पाहिल्यास स्वतः दामूबाबचे काय? ते तर तीन वेळा पराभूत झालेले. त्यामुळे स्टेटमेंट करण्यास दामू नाईक चुकले तर नाही ना! अशी चर्चा भाजप गोटातच सुरू झाली आहे. ∙∙∙

...अनुभवी मंत्री!

अखेर दिगंबर कामत मंत्रिमंडळात सामील व्हायला यशस्वी ठरले व सार्वजनिक बांधकाम खाते सुद्धा मिळवू शकले. पण सरकारतर्फे अवर सचिवांनी मंत्र्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यात ३० वर्षे आमदार असलेले व मुख्यमंत्रिपदावरही ते काही काळ होते, त्यांना ११व्या स्थानी व रमेश तवडकर शेवटच्या म्हणजे १२व्या स्थानी आहेत. मंत्र्यांची ही क्रमवारी बरोबर आहे का? ज्येष्ठतेप्रमाणे मंत्र्यांची क्रमवारी ठरवली जाते का? की मंत्रिमंडळातील समावेश लक्षात घेतला जातो. ही क्रमवारी मुख्यमंत्री ठरवतात, की खात्याच्या महत्त्वाप्रमाणे असते? हे प्रश्न कित्येकांच्या मनात घोळू लागले आहेत. हे दोघेही मंत्री अनुभवी आहेत. मंत्रिमंडळात समावेश, खाते वाटप तसेच मंत्र्यांच्या क्रमवारीत सुद्धा बदल होतील, असे संकेत देण्यात आले होते. पण क्रमवारीत बदल झालेला नाही. भविष्यात होणार का? दिगंबरचे निष्ठावंत त्यांना दुसरा क्रमांक मिळेल या आशेवर होते. बघुया काय होते ते! ∙∙∙

सुभाष ‘तहान’ भागवणार?

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍यातील मित्रत्‍व तसे संपूर्ण राज्‍याला माहीत आहे. दोघेही मराठा समाजाचे नेते असल्‍यामुळेच मुख्‍यमंत्र्यांनी फळदेसाईंना मंत्रिमंडळात घेतले, असे खुद्द भाजपचे काही वरिष्‍ठ नेतेही खासगीत बोलतात. आता मंत्रिमंडळात फेरबदल करताना मुख्‍यमंत्र्यांनी फळदेसाईंकडे असलेली पुरातत्त्‍व आणि पुराभिलेख ही दोन्‍ही खाती आपल्‍याकडे घेत, त्‍यांना ‘पिण्‍याचे पाणी’ या नव्‍या आणि सर्वसामान्‍य जनतेसाठी अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या खात्‍याची जबाबदारी दिली. त्‍यामुळे अनेकांना आश्‍‍चर्यही वाटले. स्‍वत:ला कायम ‘सक्रिय’ मानणारे फळदेसाई वर्षातील अनेक महिने पाण्‍यावाचून तळमळणाऱ्यांनी ‘तहान’ भागवणार का? या प्रश्‍‍नाचे उत्तर राजकीय जाणकार शोधत आहेत. ∙∙∙

तवडकर कुठे कमी पडले?

सरकारात सभापतिपद हे घटनात्‍मक असते. विधानसभेतील ते सर्वात मोठे पद असते. अशा पदाचा राजीनामा देऊन मंत्रिपद स्‍वीकारताना आपल्‍या पदरात मोठमोठी खाती पडतील, असा ठाम विश्‍‍वास मंत्री रमेश तवडकर यांना होता. इतकेच नाही, तर आपल्‍याला शिक्षण खात्‍यात रस असल्‍याचे सांगत त्‍यांनी या खात्‍यावर अप्रत्‍यक्षरीत्‍या दावाही केला होता. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्‍वत:कडील शिक्षण खाते तवडकरांना देणार का? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून होते. पण, मुख्‍यमंत्र्यांनी अपेक्षेप्रमाणे स्‍वत:कडील आदिवासी कल्‍याण खात्‍यासह गोविंद गावडेंकडे असलेली क्रीडा आणि कला व संस्‍कृती ही दोन खाती तवडकरांकडे सोपवली. तवडकर यांनी याआधी उपमुख्‍यमंत्रिपदाची मागणी केली होती. त्‍यानंतर त्‍यांनी शिक्षण खात्‍यावर दावा केला. त्‍यासाठी त्‍यांनी केंद्रीय पातळीवर ‘फिल्‍डिंग’ही लावल्‍याची चर्चा होती. तरीही तवडकर कुठे कमी पडले असतील? ∙∙∙

आता लक्ष कला अकादमीकडे!

कला अकादमी म्‍हणजे गोव्‍याच्‍या कला आणि संस्‍कृतीचे माहेरघर. राज्‍याच्‍या राजकारणात आतापर्यंत बहुतांशीवेळा कला अकादमीचे अध्‍यक्षपद हे कला आणि संस्‍कृती खात्‍याच्‍या मंत्र्यालाच मिळाले आहे. त्‍यानुसारच गेली काही वर्षे हे पद खात्‍याचे मंत्री आणि कलाकार म्‍हणून गोविंद गावडेंकडे देण्‍यात आले होते. कलेच्‍या बाबतीत जगभर प्रसिद्ध असलेली ही वास्‍तू नूतनीकरणानंतर भ्रष्‍टाचाराच्‍या फेऱ्यात अडकली. त्‍यानंतर गावडेंना हटवून मुख्‍यमंत्र्यांनी कला अकादमीचे अध्‍यक्षपद स्‍वत:कडे ठेवले. या घटनेनंतर गावडेंना मंत्रिमंडळातून हटवून, त्‍यांच्‍याजागी त्‍यांचे ‘राजकीय विरोधक’ असलेल्‍या रमेश तवडकरांना मंत्री बनवून आणि कला आणि संस्‍कृती खाते त्‍यांच्‍याकडेच देऊन मुख्‍यमंत्र्यांनी गावडेंवरील राग ‘अप्रत्‍यक्षरीत्‍या’ काढलेलाच आहे. यापुढे जाऊन मुख्‍यमंत्री कला अकादमी तवडकरांकडे सोपवतील का? असा प्रश्‍‍न गोमंतकातील तमाम कलाकारांसमोर निश्‍चितच पडला असेल... ∙∙∙

बाबूशचे शुभेच्छा फलक!

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक अनेक आमदार-मंत्री आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मदतीने लावतात. पणजीत आमदार बाबूश यांची आणि त्या-त्या प्रभागातील नगरसेवकाचे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत-प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची छायाचित्र असणारे फलक बुधवारपासून दिसू लागले आहेत. याशिवाय काही स्वतःला समाजसेवक समजणाऱ्यांनीही शुभेच्छा फलक काही ठिकाणी टांगलेले दिसत आहेत. मंत्री बाबूश यांचे फलक ज्यांनी लावले आहेत, त्यांनी किमान झाडे सोडून व्यवस्थितरित्या खांब लावून उभारणे आवश्यक होते, पण तसे न करता ते झाडाला किंवा इतर ठिकाणी बांधण्याचे काम केले आहे. फलक लावायचे झाल्यास किमान त्याचे शुल्क महानगरपालिकेत भरावे लागते, पण आता ज्यांची सत्ता आहे, त्यांच्याच फलकाला महानगरपालिका शुल्क आकारणार का हाही एक प्रश्नच. असो पण सध्या जे फलक तयार करण्यात आले आहेत, त्यातही एकप्रकारचा कंजुसपणा दिसून आला आहे, हे फलक एवढे लहान आहेत की तयार करणाऱ्याने एक-एक पैसा स्वतःच्या खिशातून खर्च केला असावा, असे दिसते..∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: तवडकर, कामत यांना खातेवाटप, मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची जबाबदारी; कोणाकडे कोणती खाती? वाचा संपूर्ण यादी..

सरदेसाई यांच्या वाड्यावर समीरा रेड्डी!

यापूर्वी हिंदी आणि तेलगू चित्रपटात चमकलेली समीरा रेड्डी सध्या गोव्यात स्थायिक झाली असून गोव्यातील सांस्कृतिक संचित गोळा करत राहण्यावर तिचा भर असतो. सध्या समीरा गोव्यातील चवथ ‘एन्जॉय’ करत असून बुधवारी तिने या निमित्ताने सरदेसाई यांच्या सावईवेरे येथील वाड्याला भेट दिली. सकाळपासून सायंकाळपर्यंत तिने तिथे थांबून गोव्यातील चवथ कशी साजरी करतात ते पाहून घेतले. या उत्सवाचे यजमान मंदार सरदेसाई यांच्या बरोबरचे तिचा फोटोही सध्या व्हायरल झाला आहे. याच वाड्याचे सदस्य असलेले आमदार विजय सरदेसाई यांचे घनिष्ठ मित्र फिल्म प्रोड्युसर झेवियर मार्कीस यांच्यामुळे सरदेसाई यांचे पूर्वीपासून बॉलिवूडकडे सख्य आहे, त्यामुळे त्यांच्या वाड्यावर समीरा आली तर त्यात नवल ते काय?∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'लोकांसाठी शांतपणे कार्यरत राहणे हे माझे धोरण'! मंत्री कामतांचे प्रतिपादन; खात्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

गणराया कुणाकुणाला पावणार?

ऐन गणेशोत्‍सवात पावसाने धुमाकूळ घातल्‍याने अनेकांचा हिरमोड झाला खरा; पण विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष शिल्लक असल्याने यंदा गणेश भक्तांची ‘चांदी’ झाली. फोंडा तालुक्यात अनेक इच्छुक उमेदवार असून, त्‍यांच्‍याकडून गणेश भक्तांना अर्थातच मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बऱ्याच जणांना ‘पोटल्या’ पोचल्या. अर्थातच त्यात रोखीचाही छान व्यवहार झाल्याची चर्चा बरीच रंगली आहे. आता गणराय कुणाकुणाला पावतात, ते पाहावे लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com