Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

Khari Kujbuj Political Satire: दूध उत्पादकांना सुभाष भाऊंनी खूष खबर दिली. यापुढे दूध दरफरक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला सरकारकडून अदा होणार आहे.

Sameer Panditrao

जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

राज्‍यात विरोधात असलेल्‍या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांतील धुसफूस वाढत चालली आहे. आगामी निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेसने राज्‍यभर संविधान बचाव रॅली घेण्‍यास सुरुवात केली आहे, तर पावसाळी अधिवेशनानिमित्त गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी जनता दरबार भरवण्‍यास सुरुवात केली आहे. आज (सोमवारी) सरदेसाई यांनी कुडचडेत जनता दरबाराचे आयोजन केलेले असतानाच, प्रदेश काँग्रेसनेही त्‍याच परिसरात रॅली घेण्‍याचे निश्‍चित केले आहे. यामुळे काँग्रेसने हा निर्णय नेमका का घेतला? विजय सरदेसाईंच्‍या कार्यक्रमात खोडा घालण्‍यासाठी की आणखी कशासाठी? असे प्रश्‍न कुडचडेवासीयांना पडले आहेत. ∙∙∙

दूध उत्पादकांचा जीव भांड्यात!

दूध उत्पादकांना सुभाष भाऊंनी खूष खबर दिली. यापुढे दूध दरफरक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला सरकारकडून अदा होणार आहे. त्यामुळे दर फरकासाठी पाच सहा महिने ताटकळत रहायचे कारण नाही. मागच्या काळात हा दर फरक देण्यास बराच विलंब झाला होता, आणि आताही तो झाला आहे, पण येत्या ३० जुलैपर्यंत हा दरफरक दिला जाईल, असे सुभाष भाऊंनी सांगितले आणि दूध उत्पादकांना हायसे वाटले. ∙∙∙

आताही पारोडा पाण्याखाली का?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? या गाण्याच्या ओळी आपण ऐकल्या असणार. सध्या कुंकळ्ळी मतदारसंघात पारोडा पूल पाण्याखाली जातो, त्याला जबाबदार कोण? या वरून भाजप व काँग्रेस समर्थकांत तू तू मैं मैं चालले आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात येणारा व मडगाव केपेला जोडणारा पूल प्रत्येक पावसात पाण्याखाली येतो व प्रत्येक पावसात परोडा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो.मात्र जेव्हा क्लाफास डायस आमदार असताना विद्यमान आमदार युरी आलेमाव यांचे समर्थक पारोडा बदलण्यास क्लाफास डायसवर कठोर टीका करीत होते.आता युरी आमदार असताना पारोडा पाण्याखाली आला याला युरी आलेमाव जबाबदार नाहीत का? असा प्रश्‍न क्लाफास समर्थक विचारायला लागले आहेत.आता सक्षम आमदार व विरोधी पक्ष नेता असताना आता पारोडा पाण्याखाली कसा येतो या क्लाफास समर्थकांच्या प्रश्‍नाला युरी समर्थकांकडे उत्तर नाही. म्हणून म्हणतात उचलली जीभ लावली टाळ्याला, असे झाले म्हणजे आपलीच फजिती होते. ∙∙∙

मांद्रेतले खड्डे चर्चेत

मांद्रेतील रिवा हॉटेलसमोरील रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शनिवारी रात्री एक युवक या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता जुनसवाडा मांद्रे येथील पंचाच्या घरासमोरील खड्ड्यात कुणी पडण्याची वाट प्रतिनिधी पाहतात का, अशी चर्चा आता जोर धरू लागलीय. सोशल मीडियावर या घटनेचे मेसेज वेगाने व्हायरल होत असून चहाच्या घोटासोबत हीच चर्चा सध्या परिसरात रंगतेय. ∙∙∙

पालेकर त्यांच्या मतावर ठाम!

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपासून गोव्यात भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे जे मत व्यक्त केले आहे, त्या मतावर ते अद्यापही ठाम आहेत. ‘आप’च्या आधीच्या प्रभारी आतिषी यांनी त्यांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या दौऱ्यात ‘एकला चलो’चा नारा दिला होता, पण त्यावेळीही पालेकर यांनी विरोधकांनी एकत्रितपणे येणे आवश्यक असल्याचे सांगत आपली भूमिका कायम असल्याचे दाखवून दिले होते. सध्या आम आदमी पक्षाच्या विविध ठिकाणी बैठका सुरू आहेत, त्यांचे दोन्ही आमदार व्हेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा हे या बैठकांतून लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या महिन्याच्या शेवटाला होणाऱ्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात त्यांना जनतेचे प्रश्न मांडावे लागणार आहेत. रविवारी मडगावात झालेल्या ‘आप’च्या कार्यक्रमात पालेकर यांनी भाजपला पराभूत करायचे झाल्यास विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस आणि ‘आरजी‘ची भूमिका अद्यापही सुस्पष्ट नसली तरी पालेकरांनी व्यक्त केलेल्या मताचा विचार त्यांना करावाच लागणार आहे. ∙∙∙

बिलांचा प्रवास अन् खोळंबा

राज्यातील प्रशासन कशाप्रकारे चालतेय त्याची एक छोटीशी झलक सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बोलून दाखवली. आता सरकारी प्रशासन म्हणजे ते नियमानुसारच चालणार, त्यात सरकारी कर्मचारी बिचारे करणार काय.... एखादे बील चुकते करायचे झाले तर वेगवेगळ्या सरकारी खात्याकडून ते जावे लागते, मात्र त्यात वेळेचा होणारा खोळंबा यामुळे नको ते बील असा प्रकार होऊ जातो. गोवा डेअरीतील दूध दर फरकाला उशीर झाला, त्याबद्दल बोलताना सुभाष भाऊ यांनी पणजीला जाताना फातर्पा, मडगाव, वास्को आणि नंतर पणजी असा प्रवास करावा लागत असल्याचे बिलांचा संदर्भ देऊन नमूद केले, आणि हशा पिकला. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

Sanjog Gupta: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! संजोग गुप्ता बनले नवे CEO; 2500 उमेदवारांमधून निवड

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

SCROLL FOR NEXT