खांडोळा: ‘डबल इंजिन सरकार असूनही राज्यात बेरोजगारी व लूट वाढत असून गोंयकारांवर अन्याय होत आहे. गोवा, गोंयकारपण टिकवायचे असेल तर बदल अपरिहार्य आहे. झेडपी निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी खोर्ली-तिसवाडी येथील मेळाव्यात दिला.
खोर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघासाठी गोवा फॉरवर्डतर्फे विक्रम परब यांची अधिकृत उमेदवारी या स्वर्णम सभागृहातील मेळाव्यात जाहीर करण्यात आली. यावेळी महिमा देसाई, गोरखनाथ केरकर, सुप्रिया केरकर, अभय रायकर, काशिनाथ गावकर, अनिल खोलकर, विश्वास बोरकर, संजय नाईक, बाबल कुर्डीकर, रंजिता कोरगावकर, दुर्गादास कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर टीका करताना ते म्हणाले, ‘विरोधात राहूनही विकास करता येतो. पण कुंभारजुव्याचे आमदारही पक्षांतराच्या रस्त्यावर गेले. गोवा चालविण्यासाठी ‘डॉक्टर’ची गरज नसते; सामान्य गोंयकार नेता देखील राज्य उत्तमरित्या चालवू शकतो.
भाऊसाहेबांनी गोरगरीब, कुळ-मुंडकारांसाठी काम केले; बहुजनांच्या कल्याणासाठी झटले. त्याच धर्तीवर आमचा पक्ष मासे, भात, नारळ हे आवश्यक घटक सर्वांना सवलतीत मिळतील, यासाठी काम करणार आहे.’ सरकारच्या सांस्कृतिक धोरणावर टीका करत सरदेसाई म्हणाले, ‘सरकार इफ्फीवर २८ कोटी रुपये खर्च करू शकते, पण गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांकडे दुर्लक्ष करते. हे बहुजनांकडे दुर्लक्ष करणारे शासन आहे.’
‘खोर्ली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विजय सरदेसाईसारखा सिंह माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या साथीमुळे नेमके, धाडसी आणि ठोस काम पुढील काळात घडणार आहे. मतदारसंघात बदल घडवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी,’असे आवाहन उमेदवार विक्रम परब यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.