वास्को: मांगोरहिलहून वास्को शहराच्या दिशेने जाणारी प्रवासी मिनीबस तानिया हॉटेलसमोरील भुयारी रस्त्याच्या प्रवेशद्वारावरील बॅरिअरला धडकून अडकली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत बसमधील प्रवासी सुरक्षित राहिले; मात्र बस अडकल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
झुआरीनगर-वास्को मार्गावरील ही बस मांगोरहिलमार्गे शहरात जात असताना भुयारी रस्त्याच्या उंचीची मर्यादा दर्शविणाऱ्या लोखंडी बॅरिअरला धडकली. बसच्या छतावर कॅरिअर असल्याने ते बॅरिअरच्या खांबाला अडकले आणि बस पुढे जाऊ शकली नाही. तीन मीटरपेक्षा अधिक उंचीची वाहने भुयारी मार्गातून जाऊ नयेत, यासाठी रेल्वेने येथे बॅरिअर बसवले आहेत. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत.
वाहतूक खात्याच्या निर्णयावर प्रश्न : दरम्यान, या घटनेवरून बसचालक अब्दुल जफार यांनी वाहतूक खात्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. बिर्ला-झुआरीनगर मार्गावरील बसगाड्यांना मांगोरहिलमार्गे शहरात जाण्याची परवानगी देण्याऐवजी चिखलीमार्गे वाहतुकीचे नियोजन करायला हवे होते, असे त्यांनी सांगितले. स्थानिक बसचालकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला. भुयारी मार्गातील उंचीच्या मर्यादेमुळे आपण आपल्या बसच्या छतावरील कॅरिअर काढल्याचे जफार यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.