Our Time Will Come Film: सोन्याच्या खाणी असूनही घाना गरीब का? 'अवर टाइम विल कम'मधून विषमतेचा आरसा

Our Time Will Come Ghana movie: सोन्याच्या खाणी असो किंवा सोन्याचा धूर निघणारा काळ असो सामान्यजन सुस्थिती असतील का हा प्रश्न ‘अवर टाईम वील कम’ हा चित्रपट पाहताना येतो.
Our Time Will Come Ghana movie
Our Time Will Come FilmDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधुसूदन जोशी

सोन्याच्या खाणी असो किंवा सोन्याचा धूर निघणारा काळ असो सामान्यजन सुस्थिती असतील का हा प्रश्न ‘अवर टाईम वील कम’ हा चित्रपट पाहताना येतो. जगात वाढत जाणारी विषमता पाहिल्यावर ती वेळ कधी येईल का असा दुसरा प्रश्न मनात येतो. मात्र, उत्तर धूसर होत जाते...

इफ्फी महोत्सवात प्रत्येक चित्रपटाअगोदर इफ्फीचे शीर्षसंगीत येते. सोबत मयूरचे विलोभनीय नृत्य असते. एकंदरीत भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर दिमाखात मिरवतो. इफ्फी मध्ये जे पुरस्कार दिले जातात, त्यात सुवर्ण मयूर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. अशा प्रकारे सोनं व मयूर इफ्फीला जोडलेले आहेत.

Our Time Will Come Ghana movie
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

इफ्फी हा बऱ्यापैकी सरकारी कारभार असल्याने त्यातील चित्रपट हे तत्कालीन सरकारांच्या धोरणानुसार होत असावेत. अर्थात बाबू मंडळींचा वरचष्मा शिवाय राजकीय सोय म्हणून नियुक्त झालेल्या मंडळींची लुडबूड होणं हेही शक्य आहे. ह्या सगळ्या बाबी कधी परस्परांना छेद देत असाव्यात किंवा सहकार्य करीत असाव्यात. त्यातून इफ्फी मध्ये सादर होणाऱ्या चित्रपटांची वर्गवारी ठरते व चित्रपट निवडले जातात. चित्रपटांची निवड व त्यांचे शेड्युल हा पडद्यामागील भाग असतो.

इफ्फीमध्ये जवळ जवळ तीस ते पस्तीस विविध श्रेणीतील चित्रपट असतात. त्यात जागतिक सिनेमा, उदयोन्मुख चित्रपट निर्माते, ॲनिमेशन, जगभरातील महोत्सवांमधून निवडलेले चित्रपट, मिशन लाईफ, मॅकाब्रे सिनेमा, पुनर्स्थापित अभिजात चित्रपट, चित्रपटांविषयी चित्रपट, डॉक्युमाँटाज, प्रायोगिक चित्रपट, गोव्यातील चित्रपट आणि विशेष चित्रपट पॅकेजेस असे विविध अँगल असतात. गोव्यात चालू असलेल्या ५७व्या इफ्फीत प्रतिष्ठित ‘आयसीएफटी-युनेस्को’ गांधी मेडलसाठी एकूण १० चित्रपट स्पर्धेत आहेत. शांतता, सहिष्णुता, अहिंसा, सहानुभूती आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा शोध घेणारे चित्रपट इथे प्रदर्शित होतात. त्यांची स्पर्धा होते, त्यासाठी निवड मंडळ असते व त्यातून त्यांना पुरस्कार प्राप्त होतात. ह्या वर्गात यंदा तीन भारतीय चित्रपट तर सात आंतरराष्ट्रीय चित्रपट आहेत.

भारतीय चित्रपटांत कबीर सर का आखरी लेसन (दिग्दर्शक: सर्फराज आलम), स्क्रोल (दिग्दर्शक: कन्नन एस.), सेव मिक्चर (दिग्दर्शक: मुस्कान अस्थाना) हे चित्रपट आहेत तर आंतराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत एकूण सात चित्रपट आहेत, ते असे : रहमा (दिग्दर्शक: फैसल सोयसल), द फार्म (दिग्दर्शक: एलिफ अदा), कॉल मी क्वीन (दिग्दर्शक: एमिली अटेफ), मेरी मंडेलीन (दिग्दर्शक: जेसिका गेनेस), आवर टाइम विल कम (दिग्दर्शक: अमार्तई आर्मर), स्ट्रॉबेरीज (दिग्दर्शक: लैला मराकची), विल यू स्टिल बी माय फ्रेंड (दिग्दर्शक: लू पो-शुन) आहेत. यातील बरेचशे चित्रपट आफ्रिका व दक्षिण आशियाई देशातील असतात. या स्पर्धेतील चित्रपटांचे परीक्षण अल्जेरियाचे चित्रपट दिग्दर्शक व समीक्षक प्रा. अहमद बेजाओई यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून केले जात आहे.

भारतासह बहुतेकदा हे देश तिसऱ्या जगातील असतात. साहजिकच अशा चित्रपटांमध्ये प्रादेशिक गोष्टी, समस्या व समाज जीवन असते. ते चित्रपट पाहताना आपण भारतात आहोत का असाही प्रश्न पडू शकतो. ‘आमची वेळ येईल’ हा चित्रपट घानामधील अमार्टेई आर्मर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. त्यांच्या कलाकृतींत अनेकदा सांस्कृतिक ओळख, स्थलांतर आणि कोठेतरी आपलेपणाची भावना असण्याची तीव्र गरज यांसारखे विषय हाताळलेले दिसतात. आर्मर यांचा जन्म अमेरिकेत मेरीलँड येथे झाला. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर ते घानाला परतले आणि त्यांनी ‘एकेए एंटरटेनमेंट’ या संस्थेची सह-स्थापना केली. तेव्हापासून, घानायन आणि आफ्रिकन ‘न्यू वेव्ह’ ह्या चित्रपटसृष्टीच्या विकासात त्यांनी अग्रगण्य भूमिका बजावली.

Our Time Will Come Ghana movie
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

चित्रपटाचे स्थळ आणि कलाकार सोडले तर चित्रपट भारतातील वाटेल. भंगार गोळा करणाऱ्यांचे जीवन ह्यात चितारलेलं आहे. ओवुसू आणि अडोबिया ही दोन अनाथ भावंडे आपली ओळख पुन्हा मिळवण्याच्या आशेने, आपल्या एकमेव पालकाच्या शोधात घानाच्या ग्रामीण भागातून प्रवास करत आहेत. अक्रा या गजबजलेल्या शहरात पोहोचल्यावर त्यांची भेट ‘जॅकल्स’नामक टोळीशी होते; ही टोळी तरुण मुलांची असून, ते विविध ठिकाणी घुसून चोरी करून उदरनिर्वाह करतात. या अनपेक्षित भेटीमुळे त्यांच्या प्रवासाची दिशा बदलते व त्यांची मूळ योजना पूर्णपणे विस्कळित होते. चित्रपटाच्या सुरवातीला अमार्टेई आर्मर यांनी छोटेखानी भाषण केलं त्यात त्यांनी ते गोवा विमानतळावर उतरल्यावर आपण घानामध्ये आहे असं वाटल्याचं म्हटलं.

घानाची राजधानी अक्रह इथे ह्या चित्रपटाचे चित्रकरण झाले. ह्याच श्रेणीत ‘कॉल मी क्वीन’ हा केनियन चित्रपट पहिला होता.आफ्रिकेची पार्श्वभूमी असलेले चित्रपट पाहताना त्या देशांची आजची स्थिती व इतिहास आठवणे साहजिक आहे. चित्रपटाचे कथानक बहुतांश रस्त्यावर, झोपडपट्टी व फूटपाथवर घडलेलं आहे. त्या मुले घानामधील यातायात कशी आहे ते कळतं. ऑगस्ट १९७४ पूर्वी येथे डाव्या बाजूने म्हणजे इंग्लंड, भारतासारखी वाहन चालवण्याची पद्धत होती, कारण घानामध्ये ब्रिटीश राजवट होती. मात्र तिथे रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवले जाते. १९७४ साली जनरल आय. के. अचॅम्पॉन्ग यांच्या लष्करी सरकारच्या आदेशानुसार, घानामध्ये ‘ऑपरेशन कीप राइट’ नावाची देशव्यापी मोहीम राबवून, रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवण्याऐवजी उजव्या बाजूने वाहन चालवण्याची पद्धत लागू करण्यात आली. पण अजून काही वाहने डाव्या बाजूच्या स्टेररिंगची आहेत. ही एक मजेची गोष्ट महाजालावरून समजली.

घाना हा देश आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे अटलांटिक महासागराच्या बाजूला आहे. सहारा वाळवंटाखाली असलेल्या आफ्रिकी देशात सर्वात प्रथम म्हणजे १९५७ साली घाना हा देश स्वतंत्र झाला. घानाचे चलन म्हणजे घानेयन सेदी. रुपयाच्या तुलनेत त्याचा आजचा दर आहे जवळ जवळ दहा रुपये. पण ह्यातून काही नक्की कळत नाही. त्यासाठी डॉलर व घानेयन सेदी यांची तुलना करावी लागते. आज दहा घानेयन सेदीना एक डॉलर असा विनिमय दर आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत घानेयन सेदीची किंमत दहापट जास्त आहे. पण सामान्यजीवन भारतीयांसारखे. पूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता असं बऱ्याचदा सांगितलं जातं. श्रीमंत देशातील सरकारी बँकांकडे असणाऱ्या सोन्याच्या तुलनेत भारतीय रिझर्व बँकेकडे सोने तसे कमीच आहे.

Our Time Will Come Ghana movie
Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जगात सोन्याच्या खाणीच्या असलेल्या देशांची क्रमवारी लावायची तर चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया व अमेरिका असा क्रम लागतो. आफ्रिकेत हिरे-सोन्याच्या खाणी आहेत. त्यातील बऱ्याच युरोपीय वसाहतवाद्यांनी लुटून नेल्या. घानामध्ये तुलनेत बऱ्याच सोन्याच्या खाणी आहेत. तरी तो गरीब देश गणला जातो. तेथील एकूण तीस ते पस्तीस टक्क्यांहून जास्त लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. सोन्याच्या खाणी असो किंवा सोन्याचा धूर निघणारा काळ असो सामान्यजन सुस्थिती असतील का हा प्रश्न ‘अवर टाईम वील कम’ हा चित्रपट पाहताना येतो. जगात वाढत जाणारी विषमता पाहिल्यावर ती वेळ कधी येईल का असा दुसरा प्रश्न मनात येतो आणि मग त्याचे ह्याचे उत्तर धुसर बनत जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.