Mahesh Sonak Retirement: 62व्या वर्षी न्यायमूर्ती महेश सोनक निवृत्त; न्यायदानातील असामान्य प्रवासाचा गौरव

Justice Mahesh Sonak Biography: अवघ्या ६२व्या वर्षी निवृत्त होत असलेले न्यायमूर्ती महेश सोनक यांची समाजासाठी योगदान देण्याची वाटचाल येथेच थांबेल, असे वाटत नाही.
Justice Mahesh Sonak Biography
Mahesh Sonak RetirementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ॲड. आयरिश रॉड्रिग्स

अवघ्या ६२व्या वर्षी निवृत्त होत असलेले न्यायमूर्ती महेश सोनक यांची समाजासाठी योगदान देण्याची वाटचाल येथेच थांबेल, असे वाटत नाही. वाचनाची प्रचंड आवड, विपुल लेखन आणि प्रभावी वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतरही ते समाजकार्यात सक्रिय राहतील, अशी अपेक्षा आहे.

न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक यांनी आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान न्यायिक कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. २ जानेवारी २०२६ रोजी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली. येत्या २७ नोव्हेंबर रोजी ते न्यायमूर्ती पदावरून निवृत्त होत आहेत. २१ जून २०१३ रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांच्या कायदेविषयक प्रवासाची सुरुवात त्यापूर्वीच झाली होती. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी, म्हणजे १९८८ मध्ये त्यांनी गोव्यातील तत्कालीन नामवंत विधिज्ञ ॲड. फर्दिन रिबेलो यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला प्रारंभ केला.

Justice Mahesh Sonak Biography
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

ॲड. रिबेलो यांनीही पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना महेश सोनक यांनी कायद्याच्या चौकटीत राहून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान आणि निष्पक्ष ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. न्यायव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या परीने मोलाचे योगदान दिले. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या न्यायप्रिय, निर्भीड आणि विनम्र स्वभावाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

न्यायदान करताना प्रत्येक बाबीचा सखोल आणि बारकाईने विचार करणे, मानवी स्वभावाचे विविध पैलू समजून घेणे आणि न्यायप्रक्रियेत मानवी संवेदनांना महत्त्व देणे, ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये होती. कायद्याचे सखोल ज्ञान, व्यावसायिक कौशल्य, संवेदनशीलता आणि सहानुभूतीची भावना यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. मानवी वर्तनातील गुंतागुंत समजून घेत न्यायाच्या माध्यमातून त्यावर योग्य तोडगा काढण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. न्यायालयीन कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेला संयमी स्वभाव, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आणि प्रसन्न वृत्ती यामुळेही ते वेगळे ठरले.

महेश सोनक हे वकील म्हणूनही अत्यंत प्रभावी आणि आदर्श व्यक्तिमत्त्व होते. कायदे क्षेत्रातील नवोदितांसाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरले. न्यायमूर्ती झाल्यानंतरही त्यांचा विनम्रपणा, साधेपणा, जमिनीशी नाळ जोडलेली वृत्ती आणि तत्त्वनिष्ठ स्वभाव कायम राहिला. मला सोनक कुटुंबाच्या परिचयाचे बालपणापासून भाग्य लाभले. त्यांचे वडील, दिवंगत शरदचंद्र सोनक हे त्या काळातील एक नामवंत आणि अत्यंत मनमिळाऊ वकील होते. बालपणी त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या अनेक आठवणी आजही मनात ताज्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. विभावरी या अत्यंत प्रेमळ, काळजीवाहू आणि संवेदनशील स्वभावाच्या होत्या. त्या रायबंदर येथील रुग्णालयात कार्यरत होत्या.

त्यांचे दिवंगत बंधू ॲड. सतीश सोनक यांच्यासोबत विविध विद्यार्थी चळवळींमध्ये तसेच सामाजिक प्रश्नांवरील उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांची बहीण सुषमा हीदेखील अत्यंत दिलखुलास, प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्ती आहे. सोनक कुटुंबाच्या व्यक्तिमत्त्वात जाणवणारा हा प्रेमळपणा आणि आपुलकीचा गुण त्यांच्या संपूर्ण कुटुंबातच रुजलेला आहे. न्याय आणि कायद्याच्या राज्यव्यवस्थेप्रती त्यांनी दाखवलेली निष्ठा, समर्पण आणि बांधिलकी यामुळे त्यांनी ज्या समाजाची सेवा केली, त्या समाजावर त्यांच्या कार्याचा अमिट ठसा उमटला आहे. त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आणि असंख्यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांची निवृत्ती ही केवळ एका न्यायिक पर्वाची समाप्ती नसून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचीही संधी आहे.

Justice Mahesh Sonak Biography
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

अवघ्या ६२व्या वर्षी निवृत्त होत असलेले न्यायमूर्ती महेश सोनक यांची समाजासाठी योगदान देण्याची वाटचाल येथेच थांबेल, असे वाटत नाही. वाचनाची प्रचंड आवड, विपुल लेखन आणि प्रभावी वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतरही ते समाजकार्यात सक्रिय राहतील, अशी अपेक्षा आहे. गोव्यात जे काही नैसर्गिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव शिल्लक आहे, ते जतन करण्यासाठी माजी वरिष्ठ न्यायमूर्ती फर्डिनो रिबेलो यांनी सुरू केलेल्या व्यापक चळवळीत महेश सोनक सहभागी होतील का? गोव्याचे उर्वरित वैभव वाचवण्याच्या या प्रयत्नांना त्यांच्या अनुभवाची, विचारांची आणि नेतृत्वाची निश्चितच मोलाची जोड मिळू शकेल.

'न्यायाधीश म्हणून आपण चांगल्या उद्याचे शिल्पकार असतो.' 'प्रत्येक न्यायनिर्णयामागे परिवर्तन घडवण्याची प्रेरक शक्ती असते.' या दोन विचारांना न्यायमूर्ती महेश सोनक यांनी केवळ आपल्या शब्दांतूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही सार्थ ठरवले आहे! आपले प्रिय न्यायमूर्ती महेश सोनक एका देदीप्यमान न्यायिक कारकिर्दीनंतर निवृत्त होत असताना त्यांना, त्यांच्या पत्नी डॉ. संगीता आणि पुत्र ॲड. ईशान यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.