वास्को: बारा वर्षांपूर्वी शहरात खासदार निधीतून विविध ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाल्याने शोभेचे बनले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत गरजेचे आहेत. वास्कोचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी उद्योजकांच्या मदतीने सीसीटीव्ही लावण्याचे प्रयत्न केले होते.
पोलिस उपअधीक्षक नीलेश राणेंची येथून बदली झाल्यावर कॅमेऱ्यांबाबतचा प्रयत्न ठप्प झाला. विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे चर्चेत आले आहेत.
याप्रकरणी मुरगाव पालिका, पोलिस खाते वगैरे संबंधितांनी शहर भागात नवीन कॅमेरे लावण्यासाठी समन्वय साधण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
फ्रान्सिस सार्दिन हे दक्षिण गोव्याचे खासदार असताना २०१३ ला वास्को शहर व परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले होते. सार्दिन यांनी कॅमेरे लावण्यासाठी सुमारे ७५ ते ८० लाख रुपये खासदार निधीतून मंजूर केले होते. या कॅमेऱ्याद्वारा नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यात येत होते.
त्यासाठी मुरगाव पालिका इमारतीमध्ये व वास्को वाहतूक कक्षात मॉनिटर्स बसविले होते. नंतर मॉनिटर्स मडगाव येथे हलवले.
नगरसेवक दीपक नाईक यांनी वास्को शहरात नवीन सीसीटीव्हीची सोय करण्यासाठी मुरगाव पालिकेच्या १४ वित्त आयोग निधीचा उपयोग करावा अशी मागणी केली होती. परंतु या प्रश्नावर म्हणावी तशी चर्चा झाली नाही.
सामाजिक कार्यकर्ते किरण नाईक यांनी दहशतवादी कारवाया, कायद्यांचे उल्लंघन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारयाविरोधात कारवाई होण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरयांची सोय करण्यात यावी यासाठी पंतप्रधान कार्यालयाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंबंधी डिसेंबर २०१७ ला एक पत्र लिहिले होते. त्याला डिसेंबर २०१९ ला उत्तर मिळाले होते. किरण नाईक यांनी केलेल्या सूचनांसंबंधी योग्य ती अंमलबजावणी करून माहिती नाईक यांना कळविण्याची सूचना दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना करण्यात आली होती. परंतु त्यासंबंधी कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
कॅमेऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाली होती. नियम मोडणाऱ्यांत भीती पसरली होती. रात्रीच्या वेळी काही गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला होता. परंतु नंतर कॅमेरे नादुरुस्त झाले. त्यांची दुरुस्ती कुणी करायची हाही प्रश्न होता, शिवाय काही ठिकाणचे कॅमेरे तिथून नाहीसे झाले.काही शोभेच्या वस्तू बनले आहेत.
वास्को शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरूस्त झाल्याप्रकरणी मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी डिसेंबर २०१७ मध्ये गंभीर दखल घेतली होती. नागरिकांची सुरक्षितता तसेच वाहतूक नियमांची योग्य अंमलबजावणी व्हावी, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी प्रयत्न सुरू केले होते.
त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने कॅमेरे बसववणाऱ्या संबंधित एजन्सीला त्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून पुन्हा उभारणी करण्याची सूचना केली होती. त्या एजन्सीने पंधरा दिवसांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योग्य दुरुस्ती न केल्यास त्या एजन्सीविरुध्द कारवाई करण्याची सूचना आग्नेल फर्नांडिस यांनी वास्कोच्या पोलिस उपविभागीय कार्यालयाला केली होती. मात्र, काही काळानंतर आग्नेल फर्नांडिस यांची बदली झाली. त्यानंतर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरूस्तीबाबतचा पाठपुरावा कोणीही केला नाही.त्यामुळे सध्या शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.