

वास्को: मुरगाव पालिकेने नव्याने बांधलेल्या मासळी मार्केटात २९ डिसेंबरपासून मासळी विक्री सुरू करण्यासंबंधीचे निर्देश मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिले आहेत. सध्याची जागा २८ डिसेंबरपर्यंत खाली करण्यास सांगितले आहे. ही जागा महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
जीसुडाने नवीन मार्केट सप्टेंबरमध्ये मुरगाव पालिकेकडे हस्तांतरित केले होते. त्यामुळे मार्केटचे उद्घाटन कधी होईल याची प्रतीक्षा होती. आमदार कृष्णा साळकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे मार्केट उभे राहू शकले. येथील जुन्या बसस्थानकासमोर पत्र्याच्या शेडमध्ये मासळी विक्री केली जात असे.
२०२१ साली पालिका व मासळी विक्रेत्यांमध्ये सामंजस्य करार झाल्यावर देव दामोदर ट्रस्टच्या जागेत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये विक्रेत्यांना हलवण्यात आले. तेथे भाजी, फळ, नारळ विक्रेत्यांचीही सोय करण्यात आली. त्यानंतर जीसुडातर्फे मार्केट बांधण्याचे काम सुरू झाले. नव्या इमारतीला बेसमेंट, तळमजला, पहिला मजला व अन्य सुविधा आहेत.
३५० जणांची सोय
विक्रेत्यांना नव्या मार्केटात हलविण्यासाठी मुख्याधिकारी नाईक यांनी आदेश जारी केला आहे. नवीन मार्केटाची देखभाल पालिका करणार आहे. पालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार सोपो गोळा करण्यात येईल. तसेच सोपो दर वेळोवेळी वाढविला जाईल. या मार्केटाच्या आराखड्यात मासे विक्रेत्यांसह फळे, भाजीपाला विक्रेते मिळून ३५० जणांची सोय आहे.
कारवाईसाठी चार पथके
अनेक आस्थापनांकडून थकबाकी भरण्यास प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे मुख्याधिकारी नाईक यांनी चार पथके तयार केली आहेत. गेल्या दीड महिन्यात या पथकाने बरीच थकबाकी वसूल केली आहे. काही आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले, त्यामुळे संबंधितांनी थकबाकी भरली होती. काही बँका व पेट्रोलपंप मालकांकडूनही थकबाकी रक्कम मिळविण्यात पालिका यशस्वी झाली आहे.
नव्या मार्केटमध्ये जागा वाटप करताना लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. जागा वाटपानंतर एखाद्याची जागा रिक्त झाल्यास तिचे वाटप पालिकेतर्फे करण्यात येईल. या मार्केटामध्ये गरजेनुसार बदल करण्याचा अधिकार पालिकेला असेल.
हे मार्केट अधिसूचित करण्यात आल्याने या मार्केटापासून एक किलोमीटरच्या परिघात मासळी विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध असेल. नवीन अधिसूचना काढण्यात आल्याने पूर्वीच्या अधिसूचना रद्द करण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.