वास्को: गोव्यात सध्या कार्निव्हलची धूम सुरु आहे. पणजी आणि मांद्रेनंतर सोमवारी (दि.३ मार्च) वास्कोमध्ये देखील कार्निव्हलचा रंग चढला. गोव्याच्या वेगेवेगळ्या भागातून तसेच देशी आणि विदेशी पर्यटकांकडून गोव्यातील कार्निव्हलला उपस्थिती लावली गेली. गोव्याच्या रस्त्यांवर कार्निव्हलच्या परेडची धूम असल्याने रस्ते गजबजले होते.
सोमवारी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि स्थानिक मान्यवरांनी वास्कोतील कार्निव्हलला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वास्कोत १.५ किलोमीटरपर्यंत वाजतगावात कार्निव्हलचा परेड निघाला. या परेडमध्ये ५० चित्ररथ, पारंपारिक कुणबी नृत्यापासून ते लहरी, पर्यावरणदृष्ट्या जागरूक प्रदर्शनांपर्यंत विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. काही चित्ररथांनी गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवले, तर काहींनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
किंग मोमो आणि त्यांच्या राणीने या देखाव्यांचे अध्यक्षपद भूषवले, आणि त्यांच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांनाही देखील हात हलवत आणि आनंदाने ओरडत प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले, मात्र या परेडमध्ये अनेकांनी विदूषकांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
"कार्निव्हल हा आनंद आणि एकतेचा उत्सव आहे. यामुळे लोकांमध्ये सलोखा वाढतो," असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. आमदार कृष्णा साळकर यांनी कार्निव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळते, असे सांगितले.
सोमवारी मांद्रे येथे देखील कार्निव्हलची जादू पसरली. संध्याकाळी ५ वाजता कार्निव्हलची सुरवात झाल्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता डीजे मस्ती नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यानंतर रात्री ८ वाजता सुखबीर लाईव्ह असा एक कार्यक्रम पार पडला तर सर्वात शेवटी रात्री १० वाजता डीजे हिमानी सिंग हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.