वाळपई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘बाजरी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. बाजरी आणि इतर पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देश-विदेशात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गोव्यातही या तृणधान्यांचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे.
सत्तरीतील शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत विविध उत्पादने आपल्या शेतात घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांचा गुणगौरव करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
न्याय सप्ताहानिमित्त वाळपई येथील आपल्या कार्यालयात आयोजित वाळपई व पर्ये मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभात मंत्री राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष शेहजीन शेख, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
आज दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यातच भरडधान्यांचे पोषण आणि आरोग्यविषयक फायदे यावर आरोग्य मंत्रालय काम करत आहे. सत्तरी हे कृषीप्रधान क्षेत्र आहे. आमच्या या मातीत सोने उगवते आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्राकडे वळले पाहिजे. नाचणी, वरी तसेच इतर कडधान्ये आरोग्यासाठी खूप पौष्टिक व आहारासाठी लाभदायक आहेत. त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असे राणे म्हणाले.विनोद शिंदे यांनी स्वागत केले तर उदय सावंत यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, वर्ग : दिव्या राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ उठविला पाहिजे. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमुळे आज कित्येकजण पुन्हा शेतीकडे वळू लागले आहेत. वाळपई कृषी खात्यात वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यामळे शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येत नाहीत. आता काही दिवसांनी कृषी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, वर्गाची सोय केली जाणार आहे, असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
प्रोत्साहनात्मक सत्कार सोहळा
सत्तरीतील वाळपई व पर्ये मतदारसंघातील दहा शेतकऱ्यांना यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात योगेश देसाई (गुळेली), कमल गावकर (मळपण), लक्ष्मण गावस (साट्रे), महादेव पार्सेकर (नानोडा), भागिरथी पर्येकर (बुद्रुक-करमळी), श्वेता खोत (गोळावली), सुरेश नाईक (ठाणे), मधुराम पवार (मोर्ले), प्रशांत राणे (केरी), दशरथ गावस (चरावणे) यांचा समावेश होता. मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे हा त्यामागचा उद्देश होता.
शेतकऱ्यांसाठी कृषी खात्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्ता प्राप्त करून स्वावलंबी बनावे. बाजरी ही प्रथिने, फायबर, खनिजे, लोह, कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे प्रत्येकाने अशा पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन घेतले पाहिजे.
- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.