Vaibhavi IIT success story Dainik Gomantak
गोवा

Success Story: अपुरे नेटवर्क, आर्थिक अडचणी... तरीही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वैभवीची 'IIT'पर्यंत मजल! राज्‍यातील एसटी समाजातील पहिली पदवीधर

Vaibhavi IIT success story: भाटी ग्रामपंचायत क्षेत्रातील व्हाळशे-सांगे येथील वैभवी रमाकांत गावकर हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयआयटी (संगणकशास्र) शिक्षण पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे : भाटी ग्रामपंचायत क्षेत्रातील व्हाळशे-सांगे येथील वैभवी रमाकांत गावकर हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयआयटी (संगणकशास्र) शिक्षण पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एसटी समाजातून आयआयटीची पदवी मिळविणारी ती राज्‍यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैभवीचे बालपण अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात गेले.

गावातील मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने वाडे-कुर्डी येथील सरकारी हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर तिला काणकोण येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. त्‍यानंतर तिच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळाली.

दरम्यान, कोविड काळात शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. ग्रामीण भागातील अपुरे नेटवर्क आणि मर्यादित सुविधा यामुळे ऑनलाईन शिक्षणात अडथळे आले. मात्र, वैभवीने हार न मानता उपलब्ध वेळेचा योग्य उपयोग केला.

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून धनबाद, झारखंड येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळविला.ग्रामीण भागातून इतक्या लांब जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेताना कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक ताण येणे स्वाभाविक होते. मात्र, वैभवीच्या प्रबळ इच्छाशक्तीपुढे या अडचणी कमी पडल्या. आई-वडिलांनी तिच्या शिक्षणाला भक्कम पाठिंबा दिला. अखेर आयआयटीचे शिक्षण पूर्ण करून तिने आपल्या कुटुंबाचे आणि सांगे भागाचे नाव उज्ज्वल केले.

उच्च शिक्षणानंतर गोव्यातच नोकरी मिळेल याची निश्चितता नसल्याने अनेक तरुणांना मुंबई, पुणे, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांकडे जावे लागते. वैभवीच्या बाबतीतही हेच घडले. मुलीने आयआयटीचे शिक्षण पूर्ण केल्याचा आनंद आई-वडिलांना आहे; मात्र नोकरीसाठी मुलगी घरापासून दूर राहत असल्याची काळजीही त्यांना आहे.

घरात उच्च शिक्षणाची परंपरा नाही, गावात आवश्यक शैक्षणिक सुविधा मर्यादित आहेत आणि ग्रामीण वातावरणही अनेकदा शिक्षणासाठी पूरक ठरत नाही. अशा परिस्थितीत केवळ जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर वैभवीने मिळविलेले यश विशेष कौतुकास्पद आहे.

गावच्या लेकीने गाठले शिखर

ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, अपुरे नेटवर्क आणि आर्थिक अडचणींचे कारण न बनवता वैभवीने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करत तिने आयआयटीपर्यंत मजल मारली. तिचा शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

व्यावसायिक क्षेत्रातही कर्तृत्वाची छाप

धनबाद येथून आयआयटीचे शिक्षण पूर्ण होताच वैभवी गावकर हिला पुण्यातील एका खासगी कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली. ती ऑफर स्वीकारून तिने पुण्यात कामाला सुरुवात केली आहे. उच्च शिक्षणानंतर व्यावसायिक क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT