Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Narendra Modi Gold Purchase Appeal: सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०२६ मध्ये देशवासीयांना ‘गरज नसेल तर वर्षभर सोने खरेदी टाळा’ असे आवाहन केले होते.
Narendra Modi Gold Purchase Appeal
Gold PriceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०२६ मध्ये देशवासीयांना ‘गरज नसेल तर वर्षभर सोने खरेदी टाळा’ असे आवाहन केले होते. त्यानंतर सुमारे साडेसहा महिन्यांनी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मोदी यांच्या आवाहनामुळे भारतीयांची सोन्याची मागणी घटून दर खाली आले की अमेरिकेतील व्याजदरवाढीचे संकेत, डॉलरची मजबुती, अमेरिकी रोख्यांवरील वाढते उत्पन्न आणि जागतिक गुंतवणूकदारांची विक्री यांसारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडी या घसरणीमागे आहेत? भारतातील सोन्याची आयात आणि मागणीतील घट यांचा भावांवर किती परिणाम झाला? मोदी यांच्या आवाहनाचा वाटा नेमका किती आणि जागतिक बाजाराचा प्रभाव किती, याचा घेतलेला आढावा.

उपस्थित प्रश्‍न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा परिणाम किती?

आवाहनातून सरकारला अपेक्षित असलेले आर्थिक उद्दिष्ट साध्य झाले का?

घसरणीमागे जागतिक कारणे किती प्रभावी?

भारतीय मागणी आणि आयातीचा वाटा किती?

पुढील काळात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जाणार?

Narendra Modi Gold Purchase Appeal
Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

एकत्रित विचार आवश्यक

सोन्याच्या दरातील घसरणीमागे जागतिक बाजारातील आर्थिक घडामोडी, डॉलरचे बदलते मूल्य, रुपयाची मजबुती, गुंतवणूकदारांची रोख रकमेची गरज आणि भारतातील ग्राहकांच्या खरेदीच्या बदलत्या पद्धती अशा अनेक घटकांचा एकत्रित प्रभाव दिसून येतो. त्यामुळे सोन्याच्या भावाचे विश्लेषण करताना केवळ एका घटकावर अवलंबून न राहता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

अद्याप अनुत्तरित मुद्दे

१ युद्धात सहभागी असलेल्या काही अरब देशांनी आर्थिक ताण कमी करण्यासाठी आपल्या सोन्याच्या साठ्याची विक्री केली असावी, असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला. हाँगकाँगमधील बँकर्सनी हे सोने खरेदी केले असावे आणि ही खरेदी चीनच्या वतीने झाली असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र, या व्यवहारांबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘ऱ्हेनियम’ धातूवरून संशय

सोन्याचे दर घसरत असताना दागिन्यांत ‘ऱ्हेनियम’ धातूची पावडर मिसळून केली जाणारी अत्यंत क्लिष्ट भेसळ उघडकीस आली आहे. पूर्वी भेसळखोर सोन्यात तांबे वा चांदी मिसळायचे. त्यामुळे दागिन्यांची घनता कमी व्हायची आणि साध्या विशिष्ट गुरुत्व तपासणीत ही भेसळ लगेच पकडली जायची. मात्र, ‘ऱ्हेनियम’ हा धातू पारंपरिक वजन आणि आकारमान तपासणीस चकवतो. नोव्हेंबरमध्ये जोधपूर येथे शोधपत्रकारितेच्या तपासातून दागिन्यांत ‘ऱ्हेनियम’ या सोन्यापेक्षा अधिक घनता असलेल्या धातूच्या पावडरची भेसळ केली जात असल्याचा आरोप समोर आला.

वृत्तानुसार, ७.८३० ग्रॅम सोने, एक ग्रॅम ‘ऱ्हेनियम’ आणि ०.७५ ग्रॅम अन्य धातूंपासून तयार केलेल्या ९.५८० ग्रॅम दागिन्यात प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण ८१.७३ टक्के (सुमारे १९.६२ कॅरेट) होते; तरी त्याला २२ कॅरेटचा शिक्का मिळाल्याचा दावा आहे. ‘एक्सआरएफ’ मशीनने ९३.७० टक्के सोने दाखवून ‘ऱ्हेनियम’ ओळखले नसल्याचेही वृत्त आहे. ‘ऱ्हेनियम’ची घनता सोन्यापेक्षा जास्त असल्याने केवळ विशिष्ट गुरुत्व तपासणी दिशाभूल करू शकते. ‘एक्सआरएफ’ प्रामुख्याने पृष्ठभागाचे विश्लेषण करते.

जागतिक घडामोडींचा प्रभाव

सोन्याच्या किमतीतील घसरणीमागे केवळ एखाद्या व्यक्तीचे आवाहन किंवा देशांतर्गत निर्णय कारणीभूत नसून जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरचे मूल्य, अमेरिकन बाँडचे यील्ड आणि रुपयातील मजबुती अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे.

प्रमुख घटकांचे गणित

सोने दरावर परिणामकारक अमेरिकन बाँडचे यील्ड व डॉलर इंडेक्स.

डॉलर इंडेक्स ९९.५० वरून वाढून १०४पर्यंत पोहोचला

वर्षाच्या अमेरिकन बाँडचे यील्ड ३.८० वरून ४.६० टक्क्यांपर्यंत वाढले

Narendra Modi Gold Purchase Appeal
Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

रुपयाची मजबुती

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी होण्यामागे रुपयाची मजबुती हाही महत्त्वाचा घटक ठरला. डॉलरचा भाव ९७ वरून ९२ रुपयांवर आल्याने रुपया सहा टक्क्यांनी मजबूत झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने किमतीतील घसरण आणि रुपयाची मजबुती या दोन्हींचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. मे २०२६च्या अखेरीस प्रति दहा ग्रॅम एक लाख ५६ हजार ५०० रुपये असलेले सोन्याचे दर ऑक्टोबरअखेरीस सुमारे एक लाख ४० हजार रुपयांपर्यंत खाली आले. या घटीपैकी मोठा हिस्सा रुपयाच्या मजबुतीमुळे झाल्याचे विश्लेषण आहे.

- अमित मोडक, ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ

ग्राहकांची मानसिकता बदलली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन निश्चितच चर्चेचा विषय ठरले. मात्र, सोन्याच्या खरेदीतील घसरणीचे संपूर्ण श्रेय या आवाहनाला देता येणार नाही. यामागे ग्राहकांची बदललेली मानसिकता, सोन्याचे विक्रमी भाव, रुपयाचे अवमूल्यन आणि आयात शुल्कातील वाढ अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे. मे २०२६मध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क सहा टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. त्याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव उच्चांकावर होते आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू होती. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव स्थिर वा कमी झाले तरी भारतीय ग्राहकांना मात्र ते महागच वाटत राहिले. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदी पुढे ढकलणे किंवा गरजेपुरतीच खरेदी करणे पसंत केले.

आकडे बोलतात

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, २०२६च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतातील सोन्याची मागणी १२ टक्क्यांनी घटून ४४४ टनांवर आली.

याच काळात सोन्यावरील एकूण खर्च ३८ टक्क्यांनी वाढला.

म्हणजेच ग्राहक सोन्यावर अधिक पैसे खर्च करत आहेत; परंतु त्याबदल्यात मिळणारे सोन्याचे प्रमाण कमी झाले आहे.

तिसऱ्या तिमाहीत अधिकृत सोन्याची आयात तब्बल ७० टक्क्यांनी घटली; मात्र वाढीव आयात शुल्कामुळे अनधिकृत आयातीला प्रोत्साहन मिळाल्याचे दिसते.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार, या तिमाहीत अनधिकृत आयात सुमारे ५० टनांपर्यंत पोहोचली.

- गौरव बोरा, गुंतवणूक सल्लागार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.