पणजी: पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांवर खरे तर स्थानिक नेतृत्वाचे लक्ष असायला हवे. परंतु ते ‘स्मार्ट सिटी’च्या ‘एमडी’कडे बोट दाखवतात. महानगरपालिकेत सध्या जी बजबजपुरी माजली आहे, ती अशीच राहिली तर लोकांना आणखी त्रास सहन करावा लागेल. ही बजबजपुरी हटवायची झाल्यास पणजीतील नागरिकांना स्वतःहून सत्ताबदल घडवावा लागेल, असे मत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्पल बोलत होते. ते म्हणाले, ‘अंत्योदय’ योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम पक्षातून आलेली व्यक्तीच करू शकते. मी सध्या भाजपच्या बाहेर आहे. जुन्यांना पक्षात घेण्यास वेळ जाईल, त्यानंतर विचार करावा लागेल.
त्यामुळे भाजप प्रवेशावर आता बोलू शकत नाही. २०२२च्या निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांची अट ठेवली होती. त्यामुळेच आपण ती निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यावेळी मला पडलेली मते आणि भाजपची मूळची साडेतीन हजार मते धरली तर मी निश्चित निवडून आलो असतो. माझ्या वडिलांना साडेनऊ ते पावणेदहा हजारांपर्यंत मते पडत होती. ती मते मला पडली असती, असा दावाही त्यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी माझी राजकीय मैत्री नाही, तर त्यापलीकडील मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्याशी मी कधीही जाऊन बोलू शकतो असे सांगून उत्पल म्हणाले, माझे लक्ष केवळ पणजीवर आहे. निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही हा पक्षाचा निर्णय असेल. येथे सध्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ची अंमलबजावणी अशा पद्धतीने होऊच शकत नाही. स्थानिक नेतृत्वाला पणजीकरांचे काहीच पडलेले नाही. पे-पार्किंग सुविधेतील गोंधळ, तसेच मर्जीतील काही लोकांना एफएआर वाढवून दिला जात असल्याचे दिसून येते.
पणजीतील लोकांनी पुढील महानगरपालिका निवडणुकीवेळी विचार करण्याची गरज आहे. कारण झाडांना पाणी घालण्याचेही कंत्राट दिल्याचे ऐकू येतेय. नेतृत्वबदल झाल्याशिवाय कामांत बदल होणार नाही. १८ जून मार्गाच्या बाजूला मसाज पार्लरची संख्या कशी वाढली? तेथे काय चालते? असा सवाल उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केला. पणजीत बदल झालाच पाहिजे. तो झाला नाही तर हे शहर खड्ड्यांत जाईल. पणजीतील सर्व विषय महानगरपालिकेशी संबंधित आहेत. गेली २५ वर्षे मनपाची सत्ता कोणाकडे आहे? असा सवालही उत्पल यांनी उपस्थित केला.
‘स्मार्ट सिटी’च्या कामांवर १३०० कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. पण एवढ्या खर्चाची कामे दिसतात काय? अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे सांगितले जाते. एवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत कोठे? असे सवाल उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केले. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्वयंदीप्तापाल चौधरी यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाली आहे, तर त्यांना पकडून आणावे. बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.