पणजी: पणजी शहराविषयी आमदारांना जर प्रेम असते, तर विधानसभेत पणजीविषयी एक तरी विषय काढायला हवा होता. त्यांना केवळ स्वत:चा रिअल इस्टेट व्यवसाय आणि बाह्यविकास आराखड्यात (ओडीपी) अधिक रस आहे. त्यामुळेच इतर मंत्र्यांबरोबर त्यांचा वाद झाला, हे सर्वांनीच पाहिले असल्याची टीका उत्पल पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांचे नाव न घेता केली.
एका स्थानिक खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्पल यांनी आमदार मोन्सेरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्र सोडले. उत्पल म्हणाले की, स्मार्ट सिटी कामांतर्गत मलनिस्सारणाची वाहिनी टाकली आहे. परंतु ताडमाड देवस्थान येथील चेंबर तसेच तेथून रस्त्याच्या एका बाजूने जी मलनिस्सारण वाहिनी नेली होती, ती तुटली होती.
त्यानंतर त्याचे काय झाले? मलनिस्सारणाची व्यवस्था खरोखरच सुरू झाली आहे का, याची चाचणी झालेली नाही. शिवाय भाटलेतील हॉटमिक्स केलेला रस्ता ५० दिवसांच्या आत वाहून गेला. पणजीतील समस्यांविषयी आमदाराने विधानसभेच्या कामकाजात एक तरी विषय मांडला आहे का, असा प्रश्न उत्पल यांनी केला.
ते सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून सुदिन चांगले काम करीत होते, असे सांगतात. इमारतीचा भाग कोसळला तर महापौर धावतात; पण खराब झालेले रस्ते पाहायला आमदार जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
पणजी महापालिकेच्या मार्केट इमारतीत पाणी गळत आहे. तेथील विक्रेत्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही व्यावसायिकांना वीज उपलब्ध नाही. तरीही त्याकडे आमदार आणि महापौर लक्ष देत नाहीत, अशी टीका उत्पल यांनी केली.
आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत स्मार्ट सिटीसाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा एक कोटी रुपयांचा असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्पल म्हणाले की, जर तो एक कोटी रुपयांचा कॅमेरा असेल तर त्याच्या सुरक्षेसाठी त्याठिकाणी पोलिस ठेवावा लागेल. सार्वजनिक मालमत्ता असल्याने तिची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीचे कामे झाले आहे, त्यात लोकांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा उत्पल यांचा आरोप आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाविषयी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीविषयी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मागितली होती, त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे मी माझ्या विषयांचे निवेदन ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. पावसाळा झाल्यानंतर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याची वेळ मागणार आहे.
उत्पल पर्रीकर
कोण काय बोलतो, त्याकडे लक्ष द्यायला मला मुळीच वेळ नाही. माझ्यापुढे अनेक कामे आहेत. २०२७ सालामध्ये काय बोलायचे ते बोलू. त्यावेळी लोकच काय ते बोलतील. तोपर्यंत मी स्वत: काहीही बोलणार नाही.
बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.