Mopa Link road work start Dainik Gomantak
गोवा

‘लिंक रोड’ चे काम पूर्ण करण्‍यासाठी पोलिसी बळाचा वापर

दैनिक गोमन्तक

पेडणे: मोपा विमानतळ प्रकल्‍पासाठीच्‍या ‘लिंक रोड’ चे बहुतांश काम आज पोलिसी बळावर पूर्ण करण्‍यात आले. त्‍यासाठी सकाळीच तुळसकरवाडी-नागझर येथे जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आणली होती. यावेळी काजू, माड व इतर झाडांची कत्तल करून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. शेतकरीही हतबल दिसले. कारण यापूर्वी त्‍यांच्‍यावर पोलिसांनी लाठीमार करून गुन्हे नोंद केले होते. हा अनुभव गाठीशी असल्‍याने ते गप्‍पच राहिले. मात्र या बळजबरी कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे.

कडक पोलिस संरक्षणात लिंक रोडचे काम करण्याचा निर्णय कालच झाला होता. त्यानुसार आज सकाळी 8 वाजताच जेसीबी, पोकलीन व अन्य सामग्री आणली गेली. बंदोबस्तासाठी पोलिसांना घेऊन सहा बसगाड्या आल्या होत्या. शिवाय जीप, कार व मोटरसायकल आदी वाहनांद्वारे पोलिस फौज दाखल झाली. एकूण 500 च्‍या वर पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात आले होते.

सुकेकुळण ते तुळसकरवाडीपर्यंत नेण्यात येणाऱ्या या यंत्रसामग्रीला संरक्षण देण्यासाठी सशस्त्र पोलिस होते. त्‍या वाटेवरही सर्वत्र पोलिस तैनात करण्यात आले होते. लिंक रोडसाठी सुरू करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी कुणाही शेतकरी किंवा ग्रामस्थांना जाण्याची मुभा नव्हती. इतकी वर्षे काबाडकष्‍ट करून वाढवलेली शेती, बागायती आपल्या काळजावर दगड ठेवून डोळ्‍यांदेखत उद्‌ध्‍वस्‍त होताना शेतकऱ्यांना असह्य स्‍थितीत पाहावे लागले. तर, काहींनी नाईलाजाने घरीच रहाणे पसंत केले.

दरम्‍यान, पोलिसांबरोबरच मामलेदार व अन्‍य प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्‍थित होते

दु:ख अनावर; गावात भयाण शांतता

काजू बागायती, माड, पोफळी आदी झाडांची खुलेआम कत्तल करण्‍यात आली. या प्रकारामुळे आज तुळसकरवाडी व नागझर गावात सन्नाटा पसरला होता. भयाण शांतता होती. सकाळी ८ वाजता पोलिस बंदोबस्तात सुरु झालेले हे काम संध्याकाळी ६ वाजता संपले. मात्र असह्य शेतकरी काहीच करू शकला नाही. प्रतिक्रिया देण्‍याच्‍या स्‍थितीतही तो नव्‍हता. घरातील महिला तर उंबरठ्यावर दु:ख गाळत बसल्या होत्या. संपूर्ण हयात घाम गाळून उभी केलेली बागायती काही तासांतच जमीनदोस्त होताना त्‍यांना पाहावे लागले. या कृत्‍याची जबाबदारी कोणताही अधिकारी घेत नव्‍हता. एकावरून दुसऱ्यावर ती ढकलत होता

सरकारच्‍या कृत्‍याचा तीव्र निषेध

मोपा विमानतळ पीडित पंचक्रोशी जनसंघटनेचे अध्यक्ष भारत बागकर यांनी सांगितले की, हे सरकार हुकूमशाही व निर्दयी आहे. अगोदर लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवून जमिनी बळकावल्या अणि आता ‘लिंक रोड’च्या नावावर शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची साधने सरकारी यंत्रणेचा गैरवापरून पोलिसी बळावर नष्‍ट करण्‍यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून त्यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य या सरकारने केले आहे. पाण्याचा नैसर्गिक स्रोतही हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कॅसिनो जुगार व वेश्याव्यवसायाला प्रोत्‍साहन देणारे हे सरकार भूमिपुत्रांना संपवून संस्‍कृती नष्ट करू पाहत आहे. सरकारच्या कृती व धोरणाचा आम्‍ही धिक्कार करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT