Uday Bhembre Case Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao: धमकी देणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे का? उदय भेंब्रेंच्या समर्थनार्थ मडगावात सभा, संशयितांवर कारवाईची मागणी

Uday Bhembre Case: राज्य सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत भूमिका स्पष्ट करतानाच संशयितांवर कायदेशीर कारवाई करावी. उदय भेंब्रे यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा ठरावही यावेळी घेण्यात आला.

Sameer Panditrao

मडगाव: ज्येष्ठ साहित्यिक उदय  भेंब्रे यांना धमकी देणाऱ्यांवर अजूनही पोलिस कारवाई झालेली नाही. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल भेंब्रे यांना दमदाटीच्या निषेधार्थ आयोजित सभेत उपस्थितांनी केला. याप्रकरणी सखोल चौकशी करून संशयितांवर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव या सभेत घेण्यात आला. भेंब्रे यांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मडगाव येथील चौगुले महाविद्यालयानजीक सेंट सॅबेस्तियन ओपन फ्लोअरवर ही सभा झाली. यावेळी समाजातील विविध स्तरांवरील लोक उपस्थित होते. यात  दक्षिण गोव्याचे   खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार   कार्लुस फेरेरा, आमदार क्रूझ सिल्वा आणि मान्यवर उपस्थित होते.  

समाजात एकजूट राहण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकांना भीती घालण्याचे काम बजरंग दल करत असून त्यांच्या चौकशीची गरज आहे. राज्य सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत भूमिका स्पष्ट करतानाच संशयितांवर कायदेशीर कारवाई करावी. उदय भेंब्रे यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा ठरावही यावेळी  सर्वानुमते घेण्यात आला.    

गोव्यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम असे सर्वधर्मीय लोक आनंदाने नांदतात. गोमंतकीयांना तलवारीची गरज नाही. बंधुभाव हा वाद सोडवण्यास समर्थ आहे. बजरंग दलाच्या लोकांची माहिती गोळा केली जात असल्यानेच पोलिस  अधीक्षक  सुनीता सावंत यांची दक्षिण गोव्यातून तडकाफडकी   बदली करण्यात  आली, असा आरोप प्रशांत नाईक यांनी केला.

बजरंग  दलाचा विराज देसाई स्वतःला कुंकळ्ळीकर  म्हणवतो. तो फातर्पा येथील  आहे. जर तो थोर स्वातंत्र्यसेनानी शाबू देसाई यांच्या गुणांचा पाईक असता, तर त्याने असे कृत्य केले नसते. गोव्यात कायद्याचे  राज्य आहे का? याप्रकरणी जर कारवाई झाली नाही तर विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे, असे नाईक म्हणाले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी आपल्या भाषणात जे काही घडले, ते खरोखरच दुःखदायक असल्याचे सांगितले. उदय भेंब्रे हे वंदनीय व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांनी त्यांना धमकी दिली ते ‘नीज गोंयकार’ नसावे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.   

गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात निष्ठावंत साहित्यिकावर हल्ला होणे दुर्दैवी आहे. सोसून घेण्यालाही काही मर्यादा असतात. याप्रकरणी सहनशक्ती संपण्याआधी कारवाई करण्याची गरज आहे. न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व, समता हे संंविधानाने दिलेले अधिकार अबाधित राखण्याची गरज आहे, असेही  त्यांनी  यावेळी सांगितले.

कोकणी परिषदेचे अध्यक्ष फादर माऊझिन   आताईद  म्हणाले, की आम्ही लोकशाही देशात राहतो. येथे व्यक्तिस्वातंत्र्य  आहे. जर कुणाला कुणाचे म्हणणे पटत असेल तर त्यांनी चर्चा करायला हवी. मात्र, कायदा कुणीही हातात घेऊ नये.   आपण जसे बोलतो, विचार करतो त्याचप्रमाणे दुसऱ्याने वागले पाहिजे, हे मानणे लोकशाहीत चुकीचे आहे. आज जे भेंब्रे यांच्यासोबत झाले, भविष्यात अन्य कुणाबरोबरही होईल. यासाठी वेळीच लोकशाही टिकविण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. आक्रमण झाल्यास आपणही सामोरे जाण्याची गरज असल्याचे  ते म्हणाले.

 विकास भगत यांनी, ‘आम्हीही  जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत’ असे सांगितले.  लोकशाहीत विचार न पटल्यास त्या विचारांना वैचारिक पध्दतीने खोडून काढण्याचा अधिकार आहे. तसे न करता थेट घराबाहेर रात्रीच्या वेळी येऊन धुडगूस घालण्याचा प्रकार घातक आहे.

स्वतंत्रपणे विचार मांडणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ही पद्धत बंद होण्यासाठी राज्य सरकारने या घटकांवर कारवाई करण्याची गरज आहे, असे कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी सांगितले.

  अनंत अग्नी म्हणाले की,  उदय भेंब्रे यांच्या घराबाहेर रात्रीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करणे हा योग्य प्रकार नाही. याप्रकरणी तक्रार करून २४  तास उलटूनही गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आमदार कार्लुस फेरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘भेंब्रे यांना जी धमकी देण्यात आली, तो प्रकार निषेधार्ह  असून, मी हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले.  दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उदय भेंब्रे यांच्या घराकडे जाऊन धुडगूस घातला.   कारवाई न झाल्यास फातोर्डा पोलिस ठाणे तसेच दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेऊ, तसेच लोहिया मैदानावर जनसभा घेण्यात येईल, असे प्रशांत नाईक यांनी सांगितले.

‘दक्षिणायन’कडूनही तीव्र निषेध

एक भारतीय नागरिक या नात्याने भेंब्रे यांना त्यांचा दृष्टिकोन सर्व समाज माध्यमांवर व्यक्त करण्याच्या अधिकार आहे, असे म्हणत अभियानने त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय संविधान त्यांच्या भाषण आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण करते. उदय भेंब्रे यांनी जे वक्तव्य केले ते द्वेषपूर्ण भाषण नाही, तर त्यांचा दृष्टिकोन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध होता. स्वतः कायद्याचे रक्षक असल्याचे भासवून कायदा हातात घेणाऱ्या बजरंग दलाला सरकारच्या संरक्षणामुळेच बळकटी मिळते. दक्षिणायन अभियान अशा घटकांना नियंत्रित करण्यासाठी त्वरित पोलिस कारवाईची मागणी करते. सरकारच्या आशीर्वादाशिवाय काम करू शकत नसलेल्या गुंडांकडून होणाऱ्या दमदाटी विरोधातील उदारमतवादी आवाज दाबला जाऊ नये म्हणून त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे दक्षिणायन अभियानचे अध्यक्ष क्लियोफात आल्मेदा कुतिन्हो यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT