पेडणे: तुये येथे काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या गोमेकॉशी सलग्नित इस्पितळ इमारती समोरील प्रवेशद्वाराजवळच जुनाट व जीर्ण जलकुंभ धोकादायक अवस्थेत असून त्यापासून एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी हा जलकुंभ हटवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामुदायिक आरोग्य केंद्राला पाणी पुरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे २५ वर्षांपूर्वी हा जलकुंभ उभारला होता. हा जलकुंभ सुमारे ३० ते ३५ फूट उंच असून सध्या पूर्णपणे जीर्ण झाला आहे. जलकुंभावर चढण्यासाठी असलेल्या दोन शिड्या व रेलिंग पूर्णपणे गंजून गेले आहेत. सभोवताली झाडे व झुडपे रुजलेली आहेत. त्यामुळे काँक्रीट कमकुवत झाल्याने गळती लागली आहे. या जलकुंभातून दिवसभर पाणी झिरपत असते.
नव्याने सुरू केलेल्या इस्पितळात तपासणीसाठी रोज सुमारे ४०० ते ५०० रुग्ण येतात. हा जलकुंभ नवीन इस्पितळाच्या प्रवेशद्वाराजवळ, तूये ते कोरगाव या मुख्य मार्गाजवळ आहे. या जलकुंभाजवळ नवीन इस्पितळात येणाऱ्यांसाठी दुचाकी पार्किंगची सोय केलेली आहे. अनेक दुचाक्या या ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे सतत येथे लोकांची वर्दळ असते.
हा जलकुंभ कोसळल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे हा जलकुंभ हटवावा व इस्पितळासाठी नवा जलकुंभ उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.