

Israel Defense Forces Chief Warning: पश्चिम आशियात सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एयाल जमीर यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वक्तव्य केले. सातत्याने वाढत जाणारा युद्धाचा दबाव आणि सैनिकांची भीषण कमतरता यामुळे इस्रायली सैन्य आतून कमकुवत होऊन कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत जनरल जमीर यांनी मंत्र्यांसमोर लष्कराच्या सद्यस्थितीबद्दल 10 मोठ्या धोक्यांचा पाढा वाचला. लष्कराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी तातडीने कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
जनरल जमीर यांच्या मते, इस्रायलला (Israel) सध्या भरती कायदा, रिझर्व्ह ड्युटी कायदा आणि अनिवार्य लष्करी सेवा वाढवणाऱ्या कायद्याची नितांत गरज आहे. जर हे कायदे तातडीने मंजूर झाले नाहीत, तर इस्रायली लष्कर आपले सामान्य कामकाजही करु शकणार नाही आणि संपूर्ण रिझर्व्ह सिस्टिम कोलमडून पडेल.
लष्करप्रमुखांनी यापूर्वीही अनेकदा या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले होते. जानेवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पत्र लिहून सैनिकांच्या कमतरतेमुळे लष्कराच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये गाझा युद्ध सुरु झाल्यापासून ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. लष्कराने संसदेला दिलेल्या माहितीनुसार, सध्या इस्रायली सैन्यात सुमारे 12000 सैनिकांची मोठी कमतरता आहे.
या संकटाचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स' समुदायाला लष्करी सेवेतून दिली जाणारी सवलत. इस्रायलमध्ये 18 ते 24 वयोगटातील सुमारे 80000 अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स तरुण लष्करी सेवेसाठी पात्र आहेत, परंतु धार्मिक कारणास्तव त्यांनी अद्याप लष्करात प्रवेश केलेला नाही. 2024 मध्ये इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही सवलत बेकायदेशीर असल्याचे ठरवले होते, तरीही राजकीय दबावामुळे ही सूट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे युद्धाचे ऑपरेशन्स वाढत आहेत आणि दुसरीकडे नवीन सैनिक भरती होत नसल्याने कार्यरत सैनिकांवर मानसिक आणि शारीरिक ताण प्रचंड वाढला आहे.
लष्करप्रमुखांचा हा इशारा इस्रायलसाठी एका मोठ्या अस्तित्वाच्या संकटाचे संकेत मानला जात आहे. जर राजकीय मतभेद बाजूला ठेवून तातडीने भरती प्रक्रियेत बदल केले नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले इस्रायली सैन्य केवळ मनुष्यबळाच्या अभावामुळे कमकुवत होऊ शकते. गाझा आणि लेबनॉनमधील वाढत्या आघाडीमुळे हा दबाव आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्याचे जनरल जमीर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेतान्याहू सरकार या लष्करी पेचप्रसंगावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.