

कळंगुट: गोव्याच्या कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल २०२६’ अंतर्गत भव्य समुद्र महाआरती सोहळा उत्साहात झाला. विश्वस्तरावर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना केवळ पर्यटनस्थळ नव्हे, तर आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून ओळख मिळावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शांतादुर्गा मंदिर येथे महापूजनाने झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, हरिनामाच्या घोषात संत-महंतांच्या सान्निध्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य कार्यक्रमात राजसत्तेकडून धर्मसत्तेचे प्रतीकात्मक संतपूजन, संतांच्या उपस्थितीत भव्य समुद्र महाआरती, तसेच चिराग पासवान यांचा गौरव सोहळा पार पडला.
लोकप्रिय युवा केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल गौमातेच्या इच्छेने झाले. योग, संस्कृती आणि ‘अतिथी देवो भव’ या गोव्याच्या परंपरेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी पासवानसारख्या युवा नेत्याचा आदर्श घ्यावा, असे मत ब्रह्मेशानंदाचार्या यांनी व्यक्त केले.
महंत रवींद्रपुरी स्वामी यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, “गोवा भोगभूमी नव्हे, तर योगभूमी आणि आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख मिळावी, यासाठी ब्रह्मेशानंद स्वामीजी प्रयत्नशील आहेत.
व्यासपीठावर विविध पीठाधीश्वर, महामंडलेश्वर व संत-महंतांची उपस्थिती लाभली. तसेच गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार मायकल लोबो, कृष्णा साळकर, प्रवीण आर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मंत्री नव्हे श्रद्धाळू म्हणून आलोय : पासवान
केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, मी येथे मंत्री म्हणून नव्हे, तर एक श्रद्धाळू म्हणून उपस्थित आहे. भावी पिढीला अध्यात्म व संस्कृतीशी जोडणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. माझ्या उपस्थितीमुळे एक तरी युवा अध्यात्माशी जोडला गेला, तर ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. गोवा हा विविध संस्कृतींनी नटलेला तसेच आध्यात्मिक परंपरेने समृद्ध प्रदेश आहे; येथे येताना या आध्यात्मिकतेचा अनुभव घ्यावा आणि पुरातन मंदिरांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.