सासष्टी: मडगाव शहरात वाहतूक समस्या जटिल होत चालली आहे. रस्त्यांच्या बाजूला झालेली अतिक्रमणे, वाहतूक पोलिसांची कमतरता, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली असून वाहनचालक व नागरिकांसाठी ही समस्या कायमच डोकेदुखी बनली आहे. तसेच शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे.
मडगाव शहर हे सासष्टी तालुक्यासाठीच नव्हे तर केपे, काणकोण व सांगे तालुक्यांसाठीही महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. वास्को, फोंडा, पणजी मार्गाने काणकोण, कारवार जाणारी सर्व वाहने मडगाव शहरातून जातात. आता पश्चिम बगल रस्ता सुरू झालेला असला तरी वाहन चालक अजूनही हा रस्ता जास्त वापरताना दिसत नाहीत.
आनंद सावंत या दुकानदाराच्या मताप्रमाणे बेशिस्त पार्किंग हा मोठा प्रश्न आहे. नगरपालिका व पोलिसांचे वाहतूक सुधारणेकडे लक्ष नाही. नगरपालिकेत लोकांची समस्या सोडविण्यापेक्षा भ्रष्टाचारच फैलावला आहे. जिथे नो पार्किंग आहे तिथे वाहने ठेवली जातात. जिथे दुचाकीसाठी जागा राखीव आहे, तिथे चार चाकी वाहने ठेवली जातात. यावर पोलिसांचे (Police) काहीच नियंत्रण दिसत नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने ठेवली जातात असे सावंत यांनी सांगितले.
दिनेश काकोडकर यांच्या म्हणण्यानुसार पार्किंगसाठी मडगावात जागा उपलब्ध नाही. येथे मोठमोठ्या इमारती आहेत. इमारती बांधताना तळमजल्यावर पार्किंगची जागा दाखवतात व नंतर ती जागा व्यापारासाठी वापरतात. सरकारने (Government) यावर काही तरी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. महेश नायक यांनी सांगितले की, हायड्रॉलिक पार्किंग व्यवस्था सुरू करण्यापूर्वी हा प्रकल्प फायदेशीर ठरू शकेल काय याचा पूर्णपणे अभ्यास करणे तसेच त्याचा अहवाल लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा देखभालीसाठीचा खर्च किती येणार याचा सुद्धा विचार झाला पाहिजे.
हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पाला पालिका मंडळाने मान्यता दिली आहे. केवळ या प्रकल्पाच्या पाया रचण्यासाठी थोडा अवधी लागेल. नंतर तो उभारण्यास वेळ लागणार नाही, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. या हायड्रॉलिक प्रकल्पाला केवळ ४०० चौरस मीटर जागा लागेल. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला तर उर्वरित ६०० चौरस मीटर जागेत हायड्रॉलिक पार्किंगचा दुसरा टप्पा सुरू करता येईल, असेही शिरोडकर यांनी सांगितले. हा प्रकल्प केवळ सहा महिन्यात पूर्ण होईल व पार्किंगची समस्या थोड्याफार प्रमाणात सुटेल अशी शक्यता शिरोडकर यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.