Tourist from UK : ब्रिटन म्हणजेच युकेतून भारतात येणाऱ्या पर्यटकांना पूर्वी देण्यात येणारी ई-व्हिसा पद्धत भारताने बंद केली आहे. आता व्हिसा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष व्हिसा घेण्याची सक्ती केल्याने भारतात येणाऱ्या ब्रिटीश पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. साहजिकच त्याचा विपरित परिणाम गोव्यातील हॉटेल्स व इतर पर्यटन उद्योगावर झाला आहे.
यापूर्वी ज्या पर्यटकांनी आपली गोव्याची सफर बुक केली होती त्यांनी फटाफट बुकिंग रद्द करणे सुरू केले असून दर दिवशी प्रत्येक एजन्सीकडे सात ते आठ बुकिंग रद्द केली जात आहेत. मागची तीन कोविडच्या फटक्याने जाम झालेला गोव्यातील आदरतिथ्य उद्योग या नव्या बदलामुळे पुर्णतः हादरून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एका ट्विटद्वारे यावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना तोडगा काढण्याची विनंती करुया, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केले आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेऊन माझीही तुमच्या बरोबर यायची तयारी आहे असेही विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश पर्यटकांवर गोव्यातील लहान आणि मध्यम हॉटेल्स चालकांचा व्यवसाय चालतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही आमचा राजकीय अहंकार बाजूला ठेवून एकत्र येऊया, असे सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नवीन व्हिसा पद्धतीमुळे ब्रिटिश पर्यटकांना भारतात प्रवास करण्यासाठी युकेत असलेल्या ९ व्हिसा केंद्रापैकी एका केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन व्हिसा घ्यावा लागतो. या सर्व केंद्रातील प्रतीक्षायादी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बुक असल्याने पर्यटकांना भारतीय व्हिसा लवकर मिळणे शक्य होत नाही.
गोव्यात सर्वात जास्त पर्यटक रशियातून येत असतात. त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटक येत असतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे गोव्यात येणारा रशियन पर्यटक याआधीच कमी झाला होता. आता ब्रिटिश पर्यटकही या नव्या धोरणामुळे गोव्यात येणे कमी होणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना पर्यटन उद्योगाशी निगडित असलेल्या एसकेएएल या संघटनेच्या गोवा विभागाचे अध्यक्ष शेखर दिवाडकर यांनी सांगितले की, गोव्यात अजूनही कित्येक हॉटेल्स बंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. या मोसमात चांगला व्यवसाय होईल या अपेक्षेने आता ते ती उघडायच्या प्रतीक्षेत होतें. मात्र या नव्या व्हिसा धोरणामुळे हा मोसमही त्यांच्या हातचा जाईल, अशीच भीती निर्माण झाली आहे.
टुअर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष निलेश शहा यांनी म्हटलंय की, युकेच्या पर्यटकांना ई व्हिसाची सोय करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांना आम्ही तशी पत्रेही पाठविली होती. त्यांनी हा विषय केंद्राकडेही नेला होता. पण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित विषय हाताळणी न झाल्याने असेल कदाचित अजूनतरी आमची ही मागणी मान्य झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.