पर्वरी: गोव्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था हा सध्या एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. चारचाकी वाहनांनाही त्रास होत असताना दुचाकीचालकांना तर या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना प्रचंड अडचणी येत आहेत.
विशेषतः पर्वरी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी, जिथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, तेथील रस्त्यांच्या स्थितीवर अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पर्यटनमंत्री आणि स्थानिक आमदार रोहन खवंटे यांनी जाहीरपणे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंत्री खवंटे म्हणाले की, 'एखाद्या ठिकाणी विकास करायचा असेल तर काही त्रास सहन करावाच लागतो आणि जनता याबाबतीत साथ देत आहे. पण वीज खात्याने राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग हवे तसे फोडून टाकले आहेत.' ढवळीकर यांनी मोठ्या महामार्गांवरील कामे मार्गी लावली असली तरी, राज्यांतर्गत कामे अजूनही रखडली आहेत, अशी टीका त्यांनी केली. ही कामे लवकरच पूर्ण होतील, असे आश्वासनही मंत्री ढवळीकर यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याची राजधानी पणजी आणि म्हापसा शहराला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असलेल्या पर्वरिममधील रस्त्यांची अवस्था सध्या 'दुर्दशा' या एकाच शब्दात मांडता येईल अशी झाली आहे. रस्त्यांच्या या दयनीय स्थितीवर सध्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत, त्यावर लोक मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत पण तरीही खरा प्रश्न कायम आहे.
‘ओ कोकेरो’ ते ‘मॉल द गोवा’ पर्यंतचा रस्ता नुकताच हॉटमिक्स करून नव्याने तयार करण्यात आला होता, मात्र पहिल्याच पावसाने या कामाची गुणवत्ता सिद्ध केली. अवघ्या काही दिवसांतच हा रस्ता खड्ड्यांच्या साम्राज्यात बदलला असून हा प्रवास आता वाहनचालकांसाठी एक परीक्षा बनला आहे. दुचाकी चालवणारे तर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.