
पर्वरी: गोव्याची राजधानी पणजी आणि म्हापसा शहराला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा, म्हणजे पर्वरी पण याच महत्त्वाच्या शहराच्या रस्त्यांची अवस्था सध्या 'दुर्दशा' या एकाच शब्दात मांडता येईल अशी झाली आहे. रस्त्यांच्या या दयनीय स्थितीवर सध्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत, त्यावर लोक मिश्किल प्रतिक्रिया देतायात पण तरीही खरा प्रश्न तरीही कायम राहतो तो म्हणजे कामाचा.
नुकताच, 'ओ कोकेरो' ते 'मॉल द गोवा' पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स करून नव्याने तयार करण्यात आला होता. पण, गोव्याच्या पहिल्याच पावसाने या कामाची गुणवत्ता सिद्ध केली. रस्ता पूर्ण वाहून गेला. काही दिवसांतच तो खड्ड्यांच्या साम्राज्यात बदलला आणि हा प्रवास आता वाहनचालकांसाठी एक परीक्षा बनला आहे. दुचाकी चालवणारे तर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने 'त्याची चांगली परवरिश झाली नाही, त्यामुळे असे झाले,' अशी उपरोधिक टिप्पणी केली तर आणखी एक जण 'वरुणराजाची कृपा बघता रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे,' असे म्हणतोय. पाहायला गेलं तर या प्रतिक्रिया केवळ विनोद नाहीत, तर जनतेच्या असंतोषाचे ते प्रतिबिंब आहेत.
हा प्रश्न केवळ पावसाचा नाही, तर कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जाचा आहे. चांगला जुना रस्ता सोडून, निकृष्ट दर्जाचा नवीन रस्ता का बनवला गेला? 'धन्य तो कंत्राटदार, धन्य तो रस्ता,' असे म्हणत लोक आता संताप व्यक्त करत आहेत. नागरिक अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम मार्गी लावा म्हणून विनंती करत असूनही त्यांचे ऐकून घेणारे कोणी दिसत नाही. पर्वरीतील या रस्त्यांची ही अवस्था 'विकास' की 'दुर्लक्ष' याचा प्रश्न निर्माण करते. लोकांना खड्डेमुक्त प्रवास कधी मिळणार?हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.