Tiger: सत्तरी तालुक्यात (Taluka) म्हादई अभयारण्य क्षेत्रात २०२० साली गोळावली गावात चार पट्टेरी वाघांचा विष प्रयोगाने मृत्यू झाल्यानंतर गोव्यात (Goa) पट्टेरी वाघांचे अस्तित्वच नाही असे मानले जात होते, परंतु सध्या म्हादईत बसविलेल्या कॅमेरा (Camera) यंत्रणेच्या माध्यमातून म्हादई अभयारण्यात तीन पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी सुर्ला गावातील देऊ पिंगळे यांच्या पाळीव जनावरांवर (Animal) हल्ला करून फडशा पाडल्यानंतर पट्टेरी वाघाने आपला मोर्चा गोळावली भागात वळविला आहे. डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील पाळीव जनावरांना मारले आहे. एक नर व दोन मादी असे पट्टेरी वाघ आहेत. सत्तरी तालुक्यात पूर्वापार पट्टेरी वाघाचे अस्तित्व असून इथल्या वाघांचे रक्षण झाले, तरच जंगलाचे अस्तित्व अबाधित राहून गोव्यातल्या बहुसंख्य जनतेला पिण्याचे पाणी मिळत आहे.
अन्न साखळीमध्ये शिखरस्थानी असलेल्या वाघाचे अस्तित्व टिकले, तरच प्राणवायू पेयजलाव्दारे लोकमाणसाचे जीवन समृध्द होऊ शकते. त्यासाठी वाघाच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केले आहे. गोव्यातील ४३ टक्के जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय म्हादई नदी व तिच्या उपनद्यांच्या माध्यमातून होत असते. हे जाणूनच पट्टेरी वाघ जंगलात सुरक्षित राहिले, तर हे जीवनदायिनी अविरत राहणे शक्य आहे. त्यासाठी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन वाघांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
गोळावली येथे गतवर्षी ज्याप्रकारे चार पट्टेरी वाघांची विष प्रयोगाने हत्या करण्यात आली. तशी दुर्घटना पुन्हा सत्तरीत होऊ नये यासाठी वन खात्याने स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्य गतिमान केले पाहिजे. सध्या म्हादई अभयारण्यात व्याघ्र संरक्षणासाठी ज्या प्रकारे दोन पथके कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर अन्य ठिकाणी तशी योजना आवश्यक आहे. वाघांचे प्रजनन होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती केरकर यांनी दिली.
पिंगळे, पावणे यांची पुनर्वसनासाठी तयारी
सुर्ला गावच्या देऊ पिंगळे त्याचप्रमाणे गोळावलीतील मालो पावणे यांनी आपल्याला सरकारने पुनर्वसनाच्या योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास अन्यत्र स्थलांतरित होण्याची तयारी दर्शविली आहे. सुर्लाच्या देऊ पिंगळे यांना नुकसान भरपाई मंजूर झाली असून परवाच्या आणखी एका घटनेनंतर वन विभागाने नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया हाती घेतली आहे, असे केरकर म्हणाले.
‘जीनकारबेट’प्रमाणे नुकसान भरपाई हवी
कोरबीट फाउंडेशन व विश्व प्रकृती निधी भारत यांच्यातर्फे जीनकारबेट व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघाने ठार केलेल्या पाळीव जनावरांच्या मालकाला त्वरित नुकसान भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवर गोव्यात देखील नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रकल्प राबविला पाहिजे, असे केरकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.