सांगे: नेत्रावळी अभयारण्य भागात व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव जागा ठेवण्याच्या शिफारशीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अभयारण्य अधिसूचित झाले त्यानंतर आवश्यक पूर्तता झालेली नसताना आणखी एक नवे संकट उभे ठाकत आहे, अशी जनभावना निर्माण झाली आहे.
पंचवीस वर्षापूर्वी नेत्रावळी अभयारण्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर नागरी जीवनावर विपरीत परिणाम झाला, असा स्थानिकांचा दावा आहे. खाण व्यवसाय बंद झाल्याने रोजी-रोटी गेली. निसर्गाचा वापर करून पोट भरू पाहणारे पर्यटन व्यावसायिक मर्यादित राहिले.
तेथे वन खात्याची दांडगाई सुरू आहे. जंगलात मुक्तपणे फिरणे मुश्कील बनले आहे. जंगल परिघात राहणाऱ्यांना नाकीनऊ होऊ लागले आहे. आता व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर आणखी काय परिणाम होतील याचा स्थानिक विचार करत आहेत.
लोकांना वेठीस धरू नका!
वन खात्याने आपल्या कार्यक्षेत्रात काहीही करावे. परंतु लोकांना वेठीस धरू नका. राखिवता सातत्याने येत गेली; परंतु वाघासाठी गाव खाली करण्याची वेळ येणार असल्यास येथील जनता तयार होणार नाही, असे चित्र आहे.
वन्य जीव उभ्या पिकांची नासाडी करतात म्हणून शेतकऱ्यांनी पोट भरण्यासाठी केली जाणारी शेती सोडून दिली. नारळ, पोफळी आणि अन्य पिकांची नासाडी माकड करू लागले.
बागायतदार हवालदिल बनले पण जनावरांच्या प्रेमापोटी नुकसान झालेल्याना ना सरकार ने मदत केली ना जनावरप्रेमींनी. नेत्रावळी गाव दूध व्यवसायात अग्रेसर. पण, एकामागोमाग एक व्यवसाय बंद पडू लागल्याने नेत्रावळी गाव जंगली जनावरांना देण्याचा विचार सुरू असल्याचा आरोप जनता करू लागली आहे.
नेत्रावळी गावातील लोक कोणत्या परिस्थितीत जीवन जगतात, याचे दर्शन घेण्यासाठी शहरी बाबूंनी वर्षभर थांबून पहावे, अशी मागणी नेत्रावळीतील नागरिक करू लागले आहे.
व्याघ्र प्रकल्पाचे स्वागत; मात्र खोतिगाव रहिवाशांना त्रास नको
व्याघ्र प्रकल्पाचे स्वागतच आहे; मात्र त्यासाठी खोतिगावातील रहिवाशांना वनखात्याने सतावू नये, अशी अपेक्षा असल्याचे खोतिगावातील शेतकरी देविदास गावकर यांनी व्यक्त केली. वाघ हा येथील रहिवाशांचा सांस्कृतिक भाग आहे.
व्याघ्र क्षेत्र कर्नाटकातील दांडेली-काली व्याघ्र प्रकल्पाशी संलग्न असेल. ते क्षेत्र मोले अभयारण्य, नेत्रावळी व खोतीगाव अभयारण्यापर्यंत विस्तारत आहे. खोतिगावात कुस्के, बड्डे, नडके व अन्य भागांचा समावेश आहे. या भागात रहिवाशांची श्रद्धास्थाने आहेत. व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यानंतर येथील रहिवाशांच्या श्रद्धास्थानाला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
वाघांचा हा कॉरिडॉर आहे, हे मान्य करायला हवे. पण, अभयारण्याच्या नावाखाली वन खाते येथील रहिवाशांना सतावीत आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पामुळे भर पडल्यास रहिवासी त्याला विरोध करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.