साकोर्डा येथील रगाडा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे येथे पिण्याचा पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. मात्र, पंचायतीने याप्रश्नी काहीच हालचाल न केल्याने अखेर विपीन नाईक, नीलेश मापारी, हेमंत नाईक, गिरीश नाडकर्णी यांनी स्वखर्चाने गावाला टँकरने पाणीपुरवठा केला.
पंचायत मंडळ पाणी पुरवण्यास असमर्थ असेल तर ग्रामस्थांना स्वखर्चाने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन विपीन नाईक, नीलेश मापारी, हेमंत नाईक आणि गिरीश नाडकर्णी यांनी सभेत दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी टँकरने गावातील लोकांना पाणीपुरवठा करण्यात आला. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आणि 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामस्थांनी पंचायतीला निवेदन देऊन रविवार, 3 मार्च रोजी खास ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. जोपर्यंत ग्रामसभेची जाहीर नोटीस काढत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ मागे हटणार नाहीत, असा हट्ट धरल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी खास ग्रामसभेची जाहीर नोटीस काढली होती.
ठरल्याप्रमाणे ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची पंचायतीने सोय करावी, अशी मागणी केली होती. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपसरपंच शिरीष देसाई म्हणाले की, ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. यावर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पाण्यासंदर्भात पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार करून पंचसदस्यांना त्यांनी जेरीस आणले होते.
अन् पंचायत मंडळ निरुत्तर
पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण मंडळाने ग्रामस्थांना दिले होते. मात्र, रगाडा नदीच्या पाण्याच्या नमुन्याचे 18 हजार रुपये शुल्क देण्यासाठी पंचायतीने निधी कसा काय खर्च केला, असा प्रश्न या सभेत विचारण्यात आला. त्यावेळी पंचायत मंडळ निरुत्तर झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.