Sunburn Festival: वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबरदरम्यान आयोजित केलेल्या ‘सनबर्न’ ईडीएम फेस्टिव्हलच्या काळात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मध्यवर्ती देखरेख नियंत्रण समिती तसेच अन्य तीन उपसमित्या स्थापन केल्या आहेत.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आज कृती योजना (ॲक्शन प्लॅन) गोवा खंडपीठाला सादर केली. या फेस्टिव्हलला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत तसेच १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून न देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतल्याचे खंडपीठात स्पष्ट केले. ‘सनबर्न’ आयोजनासाठी सक्ती केलेले सर्व परवाने घेऊन त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी हमी आयोजकांनी दिली
आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या संयुक्त विशेष विभागाने आज प्रदूषण नियंत्रण व देखरेख कृती योजना सादर केली. या योजनेबाबत खंडपीठाने समाधान व्यक्त करत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या कृती योजनेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कृती योजना, देखरेख कृती योजना व अंमलबजावणी कृती योजना तयार केल्या
आहेत.
या योजनांनुसार फेस्टिव्हलच्या काळात विविध समित्या तैनात करून ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही, यासाठी काटेकोटपणे अंमलबजावणी केली जाणार आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते (आयएएस) यांनी कृती उपाययोजना योजनेत नमूद केले आहे.
सनबर्न महोत्सवात कोरोना प्रसाराची भीती : डॉ. शेखर साळकर
१ भाजपच्या आरोग्य विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर यांनी ‘सनबर्न’मुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या दोन-तीन तासांच्या असतात. त्यामुळे कोविड फैलावाची शक्यता तशी कमी असते.
२ ‘सनबर्न’मध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोक राहात असल्याने तेथे कोविडचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्टीत गर्दी नसते, तर ‘सनबर्न’मध्ये गर्दी असते. तेथे लोकांची संख्या जास्त असते. तेथे कोणावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. त्यामुळे सतर्कता हाच उपाय आहे.
...म्हणून 12 वाजेपर्यंत मुभा नाही!
वर्षभरातील 15 दिवस सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, व्यावसायिक कार्यक्रमांसाठी ती मुभा नाही. यासंदर्भातील अधिसूचनाही सरकारने काढली आहे. त्यामध्ये 24 ते 31डिसेंबर या काळात ही परवानगी देण्याचा अधिकार आहे.
मात्र, ‘सनबर्न’साठी वेळ वाढवलेली नाही तसेच ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असे सरकारने खंडपीठात स्पष्ट केले. आयोजकांनी ३१ रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत परवानगी मागितली होती, ती हणजूण पंचायतीने फेटाळल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
कासव संवर्धित क्षेत्रातही निर्बंध
गावडेवाडा-मोरजी येथील किनारपट्टी भागात पुढील आठवड्यात पार्ट्यांचे आयोजन केले आहे. हा परिसर ध्वनिप्रतिबंधित क्षेत्र तसेच कासव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम कासव संवर्धनावर होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांना त्याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.