Chhatrapati Shivaji Maharaj statue issue Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute News: शिवपुतळ्यावरून तणाव; आक्रमक शिवप्रेमींपुढे कळंगुटचे सरपंच नमले

ग्रामपंचायतीवर संतप्त जमावाचा भव्य मोर्चा; सरपंचांच्या जाहीर माफीनंतर आंदोलन मागे

दैनिक गोमन्तक

कळंगुट-साळगाव रस्त्यावरील जंक्शनवर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासंदर्भात कळंगुट पंचायतीने आदेश जारी केल्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींनी कळंगुट पंचायतीवर आज मोर्चा काढला. तब्बल सहा तास पंचायतीच्या कार्यालयाबाहेर शिवप्रेमींनी ठिय्या मांडल्याने कळंगुट परिसरातील तंग बनलेले वातावरण अखेर सरपंचांनी जाहीर माफी मागितल्यानंतर निवळले.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचायतीसमोर येऊन शिवप्रेमींना उद्देशून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागतो. त्याचप्रमाणे पंचायतीने शिवरायांचा पुतळा हटविण्यासाठी काढलेला आदेश मागे घेतो, असे सांगत शिवप्रेमींच्या आक्रमकतेसमोर नमते घेतले.

सविस्तर वृत्तानुसार, गेल्या ३ जून रोजी कळंगुट-साळगाव या मार्गावरील कळंगुट पोलिस स्थानकाच्या जंक्शनवर ‘शिवस्वराज्य कळंगुट’ या संस्थेमार्फत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभारला होता. त्यासाठीची अधिकृत परवानगी संस्थेने घेतली नव्हती. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना बेकायदा ठरवून कळंगुट पंचायतीने हा पुतळा हटविण्यात यावा असा आदेश काढला. त्यामुळे कळंगुटसह राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त बनले व त्यांनी आज सकाळी ११.३० च्या सुमारास कळंगुट पंचायतीच्या कार्यालयावर चाल करीत मोर्चा काढला.

बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा

घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी., उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, साहाय्यक पोलिस अधीक्षक सचिन यादव, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, जीवबा दळवी, राजेश कुमार, पोलीस निरीक्षक परेश नाईक, सीताकांत नायक, प्रशल देसाई हे स्थितीवर नजर ठेवून होते.

संतप्त शिवप्रेमींकडून दगडफेक; पंचायत कार्यालय, गाड्यांच्या काचा फोडल्या

आंदोलनकर्त्यांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी कार्यालयातून बाहेर येऊन शिवरायांची माफी मागावी अशी आक्रमक भूमिका घेत पंचायत कार्यालयात जबरदस्तीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकवेळी पोलिसांनी पंचायतीला गराडा घालत आंदोलनकर्त्यांना रोखून धरले. यामध्ये काहींनी पोलिसांची नजर चुकवून पंचायत इमारतीवर दगडफेक केली. यात इमारतीच्या काचा फुटल्या. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. आणखी शिवप्रेमी पंचायतीच्या दिशेने येऊ नये म्हणून पंचायतीकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स घातले व कडक पोलिस पहारा ठेवला.

पुतळा हटविण्याचा आदेश मागे

‘जर कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्यास मी जाहीर माफी मागतो. तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्यासंदर्भात काढलेला आदेश मागे घेतो’, अशी भूमिका स्पष्ट करत कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पोलिस संरक्षणात पंचायत इमारतीच्या दारात येत संतप्त आंदोलनकर्त्या शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली. त्यानंतर शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतले.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या. त्यांनी शिवरायांची माफी मागावी. कळंगुटमध्ये जॅक सिक्वेरा, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचेही पुतळे आहेत. मग शिवरायांच्या पुतळ्यास आक्षेप का? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

- राजीव झा, कैसरीया हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष

घटनाक्रम

  • तब्बल सहा तास कळंगुट पंचायतीबाहेर शिवप्रेमींचे आंदोलन. त्यामुळे दिवसभर वातावरण तंग

  • सरपंचांनी पुतळा हटविण्याचा आदेश मागे घेत, शिवरायांच्या पुतळास्थळी भेट देऊन जाहीर माफी मागावी अशी शिवप्रेमींनी घेतली भूमिका

  • तीन तासांच्या आंदोलनानंतर सरपंचांनी आदेश स्थगित ठेवतो असे पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिवप्रेमींना दिले. मात्र, शिवप्रेमींनी हे पत्र अमान्य करीत आदेश रद्द करण्याची मागणी.

  • पुन्हा तासाभरानंतर सरपंचांनी हा आदेश मागे घेतो असे पत्र दिले. तरीही सरपंचांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन महाराजांची माफी मागावी अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली. त्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण बनले.

  • सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचे आठ-नऊ समर्थक पंचायत कार्यालयाबाहेर आले व आम्ही जमावाची दादागिरी खपवून घेणार नाही असे म्हणताच आंदोलन चिघळले. यावेळी शिवप्रेमींनी समर्थकांच्या दिशेने बाटल्या व दगड फेकून मारले.

  • सिक्वेरा समर्थक व शिवप्रेमी यांच्यातील झटापटीमुळे बराचवेळ तणावाचे वातावरण. शिवप्रेमींनी आम्ही संबंधितांना सोडणार नाही म्हणताच समर्थकांनी पळ काढला.

  • दिवसभर सरपंच व इतर पंच सदस्य पंचायतीच्या कार्यालयात अडकून राहिले. पोलिसांनी कार्यालयाचे शटर वाकवून शिवप्रेमींना आत प्रवेश करण्यापासून रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT