Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: 'त्या' मातेच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता

Goa Crime News: मुलगा गतप्राण झाल्यानंतर केला होता आत्महत्येचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सूचना सेठ हिने तान्हुल्याचा जीव घेतल्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार करून शीर कापण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुममध्ये रक्ताचे डाग पडले. मृत मुलाच्या नाकातून रक्त येत होते. तसेच तोंड व छातीवर सूज आली होती.

संशयित सूचनाने अतिशय थंड डोक्याने विचार करून ही हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी, यामागील मुख्य उद्देश जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याच्या पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने सूचना हिला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सूचना हिला म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता, ती सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला. त्यामुळे तिला कमी कोठडी द्यावी याविषयी वैद्यकीय कागदपत्रे सादर करतो, असेही वकिलांनी सांगितले. त्यानुसार, कोर्टाने सूचनाच्या वकिलाला तुम्ही योग्य न्यायालयात दाद मागावी, असे सुचविले.

कारण, हे प्रकरण अल्पवयीन मुलाच्या हत्येशी निगडित आहे. आपण फक्त पोलिस कोठडी किती दिवस द्यावी हेच निर्देश देऊ शकते, असे न्यायाधीशांनी संशयिताच्या वकिलाला सांगितले. न्यायाधीशांनी सूचनाला तुम्हाला याप्रकरणी काही बोलायचे आहे का? असे विचारल्यावर सूचना म्हणाली की, आता मला काहीच बोलायचे नाही.

पोलिसांनी मला इकडे थेट आणले असून आधी मला माझ्या वकिलांशी बोलायचे आहे. त्यानंतरच मी माझी बाजू न्यायालयाला सांगीन, असे तिने सांगितले. तर कळंगुट पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या घटनेतील अनेकांच्या जबान्या नोंदविणे बाकी आहे. तसेच, या हत्येमागील संशयिताचा खरा उद्देश व पुरावे गोळा करायचे असल्याने संशयिताची पोलिस कोठडी महत्त्वाची आहे. त्यानंतर न्यायालयाने सूचनाला तूर्तास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक व पथकाने संशयित सूचना हिला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. इंडोनेशियामध्ये कामाला असलेल्या सूचनाच्या नवऱ्याने कर्नाटकात येऊन मुलाच्या मृतदेहाची अोळख पटवली.

दरम्यान, कळंगुट पोलिसांना संशयित सूचना सेठ हिच्याकडून चौकशीत आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या खूनामागील कारण व इतर माहिती गोळा करणे आव्हानात्मक बनले आहे.

विमान प्रवासाला नकार का?

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिईलेल्या माहितीनुसार, सूचनाने ६ जानेवारी रोजी सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये चेक इन केले. पुढे तिने ७ रोजी मध्यरात्री चेक आऊट केले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याचा आग्रह धरला.

एवढ्या अपरात्री या महिलेला जाण्याची घाई असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला टॅक्सीऐवजी विमानाने जाण्यास सुचवले. तरीही तिने त्या गोष्टीला सपशेल नकार देत टॅक्सीच हवी, असा आग्रह धरला. टॅक्सी आल्यावर ती साहित्य घेऊन बंगळुरूला रवाना झाली. दुसऱ्या दिवशी कर्मचारी त्या खोलीत आवराआवर करत असता त्यांना रक्ताचे डाग आढळून आले. त्यांनी वरिष्ठांना याविषयी माहिती दिली.

मुलाचा पिता भारतात दाखल

त्या मुलाचा पिता वेंकटरमण हा जाकार्ता (इंडोनेशिया) येथून मंगळवारी भारतात दाखल झाला. त्याला या घटनेची माहिती पोलिसांनी दिली होती. आपल्या वकिलासमवेत चित्रदुर्ग गाठून त्याने मुलाच्या मृतदेहाची ओळख पटविली आणि शवचिकित्सेसही परवानगी दिली. यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधण्यास मात्र नकार दिला.

30 हजार रुपयांमध्ये केली टॅक्सी बूक

सूचनाने मुलाचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सांगून बंगळुरूसाठी जाण्यासाठी खासगी टॅक्सी मागविली. त्यानुसार, ३० हजार रुपयांमध्ये टॅक्सी बूक केली आणि ती बंगळुरूकडे निघाली. यावेळी सूचना गाडीत एकदम शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर खून केल्याचा किंवा पश्चातापाचा लवलेशही नव्हता. गाडीमध्ये ती बिनधास्त दिसल्याचे चालकाने पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. पोलिसांनी अद्याप चालकाची जबानी घ्यायची आहे.

कळंगुट पोलिसांचे ‘प्रेझेंस ऑफ माईंड’

  • गेस्ट हाऊसच्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्यानंतर पोलिसांनी तपास गतिमान करीत सूत्रे फिरवली.

  • कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी टॅक्सीचालकाचा मोबाईल नंबर शोधून काढून त्याच्याशी संपर्क साधला.

  • गाडीतील महिलेकडे मोठे लगेज, बॅग आहे का? असे पोलिसांनी चालकास विचारले.

  • त्यानुसार चालकाने सकारात्मक उत्तर दिले.

  • कळंगुट पोलिसांनी नियोजनपूर्वक कर्नाटकमधील चित्रदुर्ग पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली.

  • निरीक्षक परेश नाईक यांनी पुन्हा चालकास फोन केला आणि कोकणी भाषेत सांगितले की, या महिलेवर आमचा संशय आहे.

  • त्यामुळे पुढे जाऊन रस्त्यात स्थानिक कर्नाटक पोलिस तुझी गाडी अडवतील.

  • त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी ती टॅक्सी अडविली आणि ती अयमंगला पोलिस स्थानकाकडे वळविल्यानंतर सूचनाला आपले बिंग फुटल्याचे लक्षात आले.

  • कर्नाटक पोलिसांनी तिची चौकशी करून गाडीमधील सूटकेस तपासली असता बॅगेमध्ये मुलाचा मृतदेह आढळला.

  • तिथे तिने गोव्यात आपल्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले.

  • तसेच सिकेरीमधील गेस्ट हाऊसच्या खोलीत पडलेले रक्ताचे डागही आपलेच असल्याचा दावा तिने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT